काही दिवसांपूर्वी चीनमधल्या एका डिलिव्हरी बॉयचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्याने काळ्या रंगाचे विचित्र कपडे घातले होते. या कपड्यांमुळे त्याचं शरीर संपूर्ण झाकलं गेलं होतं. अगदी त्याचे डोळेही दिसत नव्हते. त्याचा विचित्र पेहराव ज्याने कोणी पाहिल्यांदा पाहिला असेल त्यांना भीती वाटली असेल हे नक्की. त्याच्या बाईकच्या मागे एक बॉक्सही बसवण्यात आला होता ज्यावर ‘मी एकटा आहे’ असं लिहिलं होतं. त्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर तो नेमका कोण आणि असे कपडे त्याने घालून तो का वावरतो याचं अनेकांना कुतूहल होतं. तेव्हा बराच शोध घेतल्यानंतर या डिलिव्हरी बॉयविषयीची माहिती लोकांना समजली.

वाचा : गेल्या पंचवीस वर्षांपासून यांची मैत्री कायम आहे

‘पिअर व्हिडिओ’ला त्याने एक मुलाखत दिली, त्यानं आपलं नाव सांगायला मात्र नकार दिला. त्याच्या चेहरा आणि हात भाजले आहेत. त्यामुळे त्याचा चेहरा विद्रुप झालाय. ‘आपण फूड डिलिव्हरी करायला गेलो आणि असा चेहरा बघून कोणी आपल्याला घाबरू नये म्हणून तो पूर्ण शरीर झाकणारे कपडे घालतो.’ अनेकदा त्याचा विद्रूप चेहरा पाहून लोक घाबरतात, असे अनुभव त्याला बरेचदा आलेत, त्याला याचं दु:खही होतं. तेव्हा जगापासून तो आपला चेहरा लपवण्याचा प्रयत्न करतो. त्याने आपलं घर कधीच सोडलं आहे. सध्या तो पैसे कमावण्याचा प्रयत्न करत आहे , पुरेसे पैसे जमले की सर्जरी करून त्याला आपला चेहरा ठिक करायचा आहे. अनेकदा काळ्या कपड्यात असं अंग झाकून फिरताना खूप त्रास होतो असं तो सांगतो. पण नाईलाजाने त्याला हे करावं लागतं. आपण विद्रुप दिसतो म्हणून कोणी मैत्रीही करायला येत नाही असंही त्याने मुलाखतीत सांगितलं होतं.