जगातील काही देशांमध्ये असणारी भरमसाठ लोकसंख्या आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी आपल्या संगळ्यांना काही नवीन नाहीत. मात्र जगात अशीही काही शहरे आहेत ज्याठिकाणी माणसेच नाहीत. विशेष म्हणजे ओस पडलेल्या या शहरांमध्ये लोकांनी राहायला यावे म्हणून या लोकांना पैसे दिले जातात. आता हे काय नवीनच असा प्रश्न तुम्हाला साहजिकच पडला असेल पण हे खरे आहे. इटलीमधील कँडेला या शहराचीही अशीच काहीशी अवस्था झाली आहे. या शहरात राहणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालल्याने येथील सरकारने या शहरात राहायला यावे म्हणून लोकांना चक्क आर्थिक अमिष दाखवले आहे.

१९९०च्या सुमारास हे शहर अतिशय आनंदात नांदत होते. मात्र त्यानंतर काही दिवसांत शहराचे चैतन्य हरवत गेले. हे जुने दिवस परत यावेत असे सध्याच्या महापौरांना वाटले. त्यांनी त्यादृष्टीने प्रयत्नही सुरु केले. सुंदर इमारती आणि किल्ल्यांसाठी प्रसिद्ध असणारे हे शहर लिटिल नेपल्स या नावानेही ओळखले जाते. अर्थव्यवस्थेतील घसरण आणि बेरोजगारीमुळे अनेक तरुण हे शहर सोडून दुसऱ्या शहरात स्थायिक होत होते. यामुळे कँडेला या शहरात केवळ २७०० लोकच राहिलेत. या शहराची लोकसंख्या ८ हजाराहून अधिक होती. परंतु इतक्यात ती खूपच खालावली. त्यामुळे शहराचा विकास आणि बाकी गोष्टी अवघड झाल्या. एक वेळ अशी आली की शहराचे अस्तित्वच नष्ट होते की काय अशी भिती निर्माण झाली. मात्र महापौरांनी त्यावर वेळीच तोडगा काढायचे ठरविल्याने ही परिस्थिती टळली.

सध्या या शहरातील लोकसंख्या वाढवण्याच्या दृष्टीने महापौरांनी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. ‘सीएनएन’ने दिलेल्या वृत्तानुसार, या शहरात राहण्यासाठी महापौरांकडून लोकांना रक्कमही दिली जाणार आहे. या ऑफरनुसार सिंगल्सना या शहरात राहण्यासाठी ८०० युरो म्हणजेच साधारण ६१ हजार रुपये तर जोडप्यांना १२०० युरो म्हणजेच साधारण ९२ हजार रुपये आणि कुटुंबासाठी २००० युरो म्हणजे १.५ लाख रुपये दिले जाणार आहेत. या नव्या प्रकल्पामुळे शहरात आतापर्यंत सहा कुटुंबे राहण्यासाठी आली आहेत. याशिवाय ५ कुटुंबानी अर्जही दाखल केले आहेत. महापौर निकोला यांच्यामते ही कल्पना त्यांना इटलीमधील बोरमिडा गावातून मिळाली. या गावातही लोकांनी रहावे यासाठी त्यांना पैसे दिले जातात.