ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांची मंगळवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी सारा देश एकवटला आहे. त्यांच्या हत्येमुळे सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. ‘कोणीही कितीही सत्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तरीही आम्ही गप्प बसणार नाही, जे चुकीचे आहे त्यावर खुलेपणाने व्यक्त होतच राहू, ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे’, अशा अनेक प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.

गौरी यांच्या हत्येचा देशभरातून निषेध होत असताना, काहींनी सोशल मीडियावर त्यांच्याविरोधात गरळ ओकली आहे. अशातच गौरी यांच्या विरोधात केलेले एक ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. निखिल दधीच नावाच्या ट्विटर हँडलवरून एक ट्विट करण्यात आलंय, त्यात आक्षेपार्ह भाषा वापरली गेल्याचे दिसून आले आहे.
विशेष म्हणजे ट्विटमध्ये आक्षेपार्ह भाषा वापरणाऱ्या या व्यक्तीला पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील ट्विटरवर फॉलो करत असल्याचे समोर आले आहे. हे ट्विट घेऊनच विरोधकांनी मोदींवर हल्ला चढवला आहे. अशी हीन विचारसरणी असलेल्या लोकांना देशाचे पंतप्रधान कसे फॉलो करू शकतात? असा सवाल विचारत विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. दधीच यांच्या ट्विटवरून वाद निर्माण झाल्यानंतर त्यांनी ते ट्विट आपल्या हँडलवरून डिलिट केलंय पण त्याचे स्क्रिनशॉट मात्र व्हायरल होत आहेत.