दारुविक्रीतून प्रचंड मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो म्हणून दारुविक्री सुरू ठेवावी असे काही जण म्हणत असतानाच दारुड्यांच्या करमतींमुळे इंग्लंडला अब्जावधी पाउंडाचा भुर्दंड सोसावा लागत असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे.

दारु पिऊन धिंगाणा घातल्यामुळे लोकांना नाहक त्रास तर सहान करावा लागत आहेच त्याबरोबरच त्यांना आपल्या उत्पन्नातील पैसे देखील या दारुड्यांमुळे सरकारला द्यावे लागत असल्याचे सर्व पक्षीय संसदीय समुहाने सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे. गेल्या वर्षात इंग्लंडच्या करदात्यांना साडे तीन अब्ज पाउंड किंवा सुमारे पंचवीस हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त भार सहन करावा लागल्याचे अहवालात म्हटले गेले आहे.

स्टॅफर्डशायर येथे एक असे कुटुंब आहे की त्यांच्यामुळे सरकारला एक दशलक्ष पाउंड खर्चावे लागले आहे. असे वृत्त इंग्लंडच्या सन या वृत्तपत्राने दिले आहे.

पती-पत्नी आणि दोन मुले असे हे चौकोनी कुटुंब आहे. पती-पत्नी सतत दारू पिऊन गोंधळ घालतात. त्यामुळे शेजाऱ्या पाजाऱ्या प्रचंड त्रास होतो. इतकेच काय त्यांचा गोंधळ थांबविण्यासाठी सतत पोलिसांना बोलावावे लागते. त्यांच्या या धुडगुस घालण्याच्या सवयीमुळे शेजारी हैराण झाले आहेत. एकट्या याच कुटुंबावर सरकारला १ दशलक्ष पाउंड खर्चावे लागले आहेत.

इंग्लंडमधील मद्यपी केवळ दारूच पीत नाहीत तर त्यानंतर अनेक करामती करतात. रस्ते अडवणे, इमारतीवर जाऊन बसणे, तर कधी-कधी नशेमध्ये आग लावणे असा उच्छाद ते मांडतात. त्यातूनच सरकारी मालमत्तेचे नुकसान होण्याच्या घटना वाढल्या आहेत. एकट्या अग्निशमन दलालाच त्यांच्या या अशा वागण्यामुळे १३१ दशलक्ष पाउंडाचा फटका बसला आहे.