प्रत्येकाची सुखाची व्याख्या वेगळी असते. रात्रन् दिवस मेहनत करून कमावलेले पैसे जर खर्च करायला वेळच नसेल तर राबण्याचा काय उपयोग आहे ? हुबेहूब अमिताभ बच्चन यांच्यासारख्या दिसणा-या एका व्यक्तीचा हा प्रश्न. याच प्रश्नाच्या शोधात निघालेल्या त्याने मोठ्या कंपनीतील आपली चांगल्या पगाराची नोकरी सोडली आणि बनला रिक्षाचालक. ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ या प्रसिद्ध फेसबुक पेजने पुन्हा एकदा नवी गोष्ट आणली आहे. ही गोष्ट आहे सुखाच्या शोधात निघालेल्या एका रिक्षाचालकाची. आता नेहमीप्रमाणे याही गोष्टीची सोशल मीडियावर चर्चा झाली नाही तर नवलच म्हणावे लागले.

‘हिंदुस्तान लिव्हरमधली अगदी चांगल्या पगाराची नोकरी त्याने सोडली. ९ ते ५ नोकरी करणे म्हणजे सुखी आयुष्याला सोडचिठ्ठी देण्यासारखे आहे. त्यामुळे एकदिवस उठून त्याने राजीनामा दिला. खांद्यावर बॅग टाकली आणि निघाला सुखाच्या शोधात. आपल्याला हवे ते करण्याचे धाडस त्याने ४० वर्षांपूर्वी दाखवले त्यावेळी फोटोग्राफीकडे करिअर म्हणून कोणीही पाहत नव्हते त्यावेळी हातात कॅमेरा घेऊन लंडन, दुबई, आफ्रिका ठिकठिकाणी तो फिरला. हाती रिक्षा घेतली. रिक्षा चालवत असताना रोज नवे नवे ग्राहक भेटायचे त्यांच्या सोबत बोलून, त्यांचे अनुभव जाणून घेण्यात त्याला आनंद वाटायचा. बारा बारा तास रिक्षा चालवताना त्याला अनेक लोक भेटले त्यांच्यासोबत केलेल्या प्रवासातून आपल्याला जे सुख आणि समाधान मिळाले ते नोकरी करुन कधीच मिळाले नसते असे तो अभिमानाने सांगतो.

हुबेहूब बच्चन सारखा दिसत असल्याने अनेकांचे लक्ष त्यांच्याकडे जाते विशेष म्हणजे एका रिक्षाचालकाला उत्तम इंग्रजी बोलता येते हे पाहून अनेक जण त्यांना ‘तुम्ही रिक्षा का चालवता ?’ असा सवाल आर्वजून विचारतात. पण आपल्याला हेच करण्यात सुख मिळते असे ते छातीठोकपणे सांगतात. रिक्षा चालवून आणि लोकांशी बोलून आपल्याला जे सुख आणि समाधान मिळाले ते नोकरी करून कधीच मिळाले नसते  असा सुखी आयुष्याचा मंत्र इतरांना  द्यायला ते विसरत नाही.