प्रात:समयी उठावे. शुचिर्भूत व्हावे. ब्रेकफास्टची थाळी व कषायपेय घ्यावे आणि नभोवाणी यंत्रासमोर श्रद्धेने बसावे. हा आता अनेकांचा रविवार सकाळचा कार्यक्रम झाला आहे. एखाद्या दिवशी हा कार्यक्रम चुकला तर माणसे अक्षरश: सरभर होतात. अखेर सवयीचा भाग असतो ना तो. अनेकांना आता रविवारीय प्रवचनाची सवयच लागली आहे. पूर्वी ते आस्था वगरे च्यानेलांवरील प्रवचनांत स्वत:स चिंब भिजवून घेत असत. पण प्रधानसेवकांसमोर त्यांची काय पत्रास? प्रधानसेवकांचा मन की बात हा अखिल भारतीय सुवैचारिक प्रवचनाचा कार्यक्रम नभोवाणीवर आला आणि आम जनतेची तर सोयच झाली. त्यातील विचारमौक्तिके वेचून घेता घेता अनेकांस तर घेशील किती दो करांनी अशी स्थिती प्राप्त झाली आहे. देश सुनेगा तो बढेगा हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट तर कधीच साध्य झाले असून, मन की बातमधील संदेश आपल्या यत्कश्चित जीवनात आणण्यासाठी लोक जिवाची बाजी लावत आहेत. परवाचेच प्रवचन पाहा. त्यात प्रधानसेवकांनी आपणास विधायक टीका आवडते असे म्हटले आणि काय सांगावे, टीकाकार बदललेच देशातले. सगळे धादांत विधायक झाले. म्हणजे बायकोच्या हातची भाजी खारट झाली तर आता कोणी त्यावर जळजळीत टीका करीत नाही. विधायक पद्धतीने समजून चालतात की ही भाजी अन्य कशाची नसून शुद्ध मिठाचीच आहे. व मग म्हणतात की भाजीत मीठ अजून घातले असते तरी प्रकृतीला चालले असते. तर याला म्हणतात विधायक टीका. अजून अनेकांना हे तंत्र नीटसे समजलेले नाही. अजून काही लोक प्रधानसेवकांवर विघातक टीका करतात की तीन वर्षांत रोजगार घटला, आश्वासनांची पूर्ती झाली नाही. ऐकल्या त्या घोषणाच आणि पाहिले ते इव्हेंटच. आता अशा विघातक टीकेनेच लोकशाहीचे वाट्टोळे झाले आहे. हे बदलले पाहिजे. लोकांनी बदलले पाहिजे. ग्लास अर्धा भरलेला आहे असेच नेहमी म्हटले पाहिजे. जे म्हणणार नाहीत, त्या विघातक प्रवृत्तीला ठेचले पाहिजे. त्यासाठी विधायक टीका रक्षकांची फौजच उभारली पाहिजे. अद्याप बोलू दिले जाते म्हणून कोणी सरकारलाच प्रश्न वगरे विचारून विघातक टीका करणार असतील तर मग सरकारने तरी दुसरे काय विधायक करावे? तेव्हा लोकांनीच आता पुढे येऊन विधायक टीकेचे शिकवणी वर्ग सुरू केले पाहिजेत. म्हणजे मग विधायक म्हणजे काय ते नीट समजेल. खरे तर त्यात काही कठीण नाही. रविवारीय प्रवचने रोज ऐकली तरी समजेल ते. तूर्तास येथे एकच बाब लक्षात घ्यायला हवी, की ज्या टीकेने मतांवर परिणाम होण्याची शक्यता असते ती सर्व टीका विघातक! बाकी आहे काय आणि नाही काय??