26 September 2017

News Flash

सत्तावृक्षावरील सरडे..

एका अर्थाने उत्तर प्रदेशातील सत्तांतराइतकेच योगी आदित्यनाथांचे मतांतरही ऐतिहासिक ठरणार आहे.

लोकसत्ता टीम | Updated: May 3, 2017 1:19 AM

‘राजकारण हे सरडय़ासारखे असते’ असे कोणा आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या विचारवंताने म्हणून किंवा लिहून ठेवले असते, तर त्याला प्रचंड मान्यता मिळून गेली असती, आणि ते विधान कालातीतही ठरले असते. पण कुण्या थोराने लिहून वा बोलून ठेवलेले नसले तरी या वाक्याची वैश्विक सत्यता जरादेखील कमी होत नाही. राजकारण सरडय़ासारखेच असते. ते काळानुरूप रंग बदलते. इतक्या शिताफीने की, रंग बाहेरून तेच दिसले तरी आतून बदलावे लागतात. तसे नसते, तर योगी आदित्यनाथांना आता बदलण्याची गरज भासलीच नसती आणि आता आपल्या अंगावरील भगव्याचा गैरवापर करून चालणार नाही, हे सत्तेमुळे आलेले शहाणपणही त्यांना सुचले नसते. एका अर्थाने उत्तर प्रदेशातील सत्तांतराइतकेच योगी आदित्यनाथांचे मतांतरही ऐतिहासिक ठरणार आहे. आता आपण सत्तेत आहोत, त्यामुळे भगव्याचा गैरवापर थांबवा या त्यांच्या सक्त सूचनेकडे थोडेसे उलटय़ा चष्म्यातून पाहिले, तर राजकारणाचा आणि भगव्याचाही बदलता रंग स्पष्टपणे दिसू लागतो. सत्तेवर आल्यानंतरचा भगवा आता समंजस होणार. याआधी या भगव्याला हैदोस घालण्याची मनसोक्त मुभा होती, दादागिरी करण्याचा आणि त्याच्या जोरावर भगवा अजेंडा राबविण्याचा जणू ठेकाच योगीजींच्या भगव्या ब्रिगेडला मिळालेला होता, कारण तेव्हा ते सत्तेवर नव्हते. आता सत्तेवर आल्यामुळे या भगव्या रंगावर समजूतदारपणाची छटा यावी असे या योगीजींना वाटू लागले, हे राजकारणाचे सरडय़ाशी असलेल्या साम्यस्थळाचे द्योतक आहे. सरडय़ाचा रंग तो ज्या झाडावर किंवा मातीत असतो, तसा आपोआप बदलतो. त्या वेळी त्याचा मूळ रंग नष्ट न होता, केवळ पुसला गेलेला असतो. रंग लपविणे ही त्याची गरज सत्तेच्या राजकारणालाही तंतोतंत लागू होते. भगव्याचा गैरवापर थांबवा असा आदेश देऊन योगीजींनी याआधीच्या गैरवापराचीच एक कबुली दिली आहे. सत्ता आली की त्याची चव चाखणाऱ्या साऱ्यांना चेव चढतो. योगीजींच्या हिंदू युवा वाहिनीला सत्तेचा रंग चढण्याआधीच वेसण घालण्याचा विचार करून या योग्याने सत्तेच्या काळातच संघटनेला वैराग्याचे दिवस पाहण्याची वेळ आणली. हे या भगव्या वाहिनीला कितपत रुचेल ते माहीत नाही, पण सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. ‘कायदा हातात घेऊ  दिला जाणार नाही असे म्हणणाऱ्यांना कायदा हातात घेण्याचा हक्क नाही’ हा आदित्यनाथ यांचा विचारदेखील या संदर्भात महत्त्वाचा ठरला आहे. कारण या विचारामुळे आदित्यनाथ नावाचा हा योगी मुख्यमंत्री सत्ताप्राप्तीनंतरचा नवा विचारवंत ठरणार आहे. एक सत्ता केवळ भौतिक परिवर्तन घडविते असे नाही, तर सत्तेमुळे मानसिक परिवर्तनही होते, याचाच हा जिवंत पुरावा म्हणायचा. उत्तर प्रदेशातील सत्तांतरामुळे मानसिक परिवर्तनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. सत्तेच्या वृक्षावरच्या सरडय़ाने आपला रंग बदलला आहे.

First Published on May 3, 2017 1:19 am

Web Title: up cm yogi adityanath
  1. S
    Santosh
    May 3, 2017 at 3:10 pm
    bhakta ganaho...chala shimga ghala...
    Reply