हातात कागदाची गुंडाळी घेऊन विद्या अंगणात येऊन उभी राहिली. तिच्या पाठीमागे तीन-चार स्त्रिया संकोचून उभ्या होत्या. त्यांच्यावर एक नजर टाकून अण्णासाहेबांनी विद्याकडे पाहिलं. तिच्या हातातल्या कागदाच्या गुंडाळीकडे बघत त्यांनी विचारलं,
‘‘पेपर वाचलेस का आजचे?’’
‘‘हो. रेडिओवरची बातमीसुद्धा ऐकली. आणि एका न्यूज चॅनेलवरही होती बातमी.’’
‘‘मोठी झालीस आता तू. अशीच मोठी होत रहा. चांगलं काम केलं, की नावही चांगलंच होतं. आता सर्व जिल्हा तुला ओळखतोय. उद्या सगळा महाराष्ट्र ओळखील, असं काहीतरी करून दाखव. अण्णासाहेब मोहित्यांची भाची आहेस तू. कसली समस्या आली, कसली मदत लागली तर सांग.’’
तशी हातातली कागदाची गुंडाळी विद्याने पुढं केली. म्हणाली,
‘‘गावातल्या महिलांच्या रोजगारासाठी एक योजना आखली आहे. काही स्त्रियांना प्रशिक्षणासाठी तालुक्याला पाठवायला लागेल. नंतर काही मशिनसुद्धा घ्याव्या लागणार आहेत. त्यासाठी तुमचं मार्गदर्शन आणि थोडय़ा…’’
विद्या पुढं काही बोलणार एवढय़ात आईसाहेब आणि रामाची बायको नाष्टय़ाच्या डिश घेऊन बाहेर आल्या. रामाची बायको डिश ठेवून लगेच आत गेली, पण विद्याला पाहून आईसाहेब म्हणाल्या,
‘‘ही कधी आली? आणि तिला उभीच ठेवली का ताटकळत. चल गं आतमध्ये.’’
 ‘‘जरा काम होतं अण्णासाहेबांकडं.’’
‘‘नंतर कर ते काम. ते सध्याकाळपर्यंत आहेत इथं आज.’’
डिश टिपॉयवर ठेवून आईसाहेबांनी विद्याला हाताला धरून आत नेलं. विद्याने डोळ्यांनीच मागे उभ्या असलेल्या महिलांना खुणावलं. मग त्याही तिच्या मागे दबक्या पावलांनी गेल्या.
आत प्रशस्त हॉलभर सगळ्याजणींची नजर फिरत राहिली.
‘‘बस. काय म्हणतात सासरची माणसं?’’
‘‘ठीक आहेत.’’
‘‘प्रकाशराव कामधंदा करतात ना? का अजून राजकारणाचंच भूत आहे मानगुटीवर?’’
आईसाहेबांच्या नाजूक प्रश्नाने विद्या विचारात पडली. काय उत्तर द्यावं तेच तिला कळेना. आपलेच दात आणि आपलेच ओठ. वेळ निघून गेली, की काही गोष्टींना पर्याय नसतो. जगायचं असेल तर वाटय़ाला आलंय ते निमूटपणे सहन करावं लागतं. कधीकधी मनाला बोचणाऱया गोष्टींची तक्रार सुद्धा आपल्याला अडचणीत आणते. म्हणून त्यांची नजर चुकवत विद्या म्हणाली,
‘‘राजकारणाचाच ओढा आहे त्यांना. पण अलीकडं असतं थोडं लक्ष घरात.’’
‘‘काल तुझ्या सत्कारसमारंभाला आला नाही?’’
‘‘हो. मुंबईला गेलेत.’’
थोडय़ा निराशेच्या स्वरात विद्या म्हणाली. तशा आईसाहेब कडवटपणे बोलल्या. म्हणाल्या,
‘‘त्याच्या डोक्यात काय खुळ आहे, कुणाला माहीत. आम्ही येईल तेव्हा गावात कधी नसतोच…राजकारण बाई. एका पक्षात हजार गट. मग कुरघोडय़ा. अगं, ही लोकं कालच्या सत्काराचंसुद्धा भांडवल करायला बसलेत. इथं मनं, नाती… सगळी पायदळी तुडवली जातात. पहिल्यांदा खुर्ची मिळविण्यासाठी आणि नंतर ती टिकविण्यासाठी, वाटेल ते करतील.. बरं जाऊ दे ते. आपल्याला चुलीपुढं लुडबूड करणाऱयांना काय करायचंय त्याचं. पण तुला कालच्या सत्काराने कसं वाटलं.’’
‘‘अजूनसुद्धा खूप अवघडल्यासारखं वाटतंय.’’
विद्या थोडी लाजून म्हणाली, तेव्हा आईसाहेब रामाच्या बायकोने आणलेला चहा विद्याला देत म्हणाल्या,
‘‘ही लाज बायकांना शाप आहे बघ. या लाजेमुळेच बायका मागे राहतात. आणि ती सोडल्यामुळे पुरुष घोडय़ासारखे उधळतात.’’
तेवढय़ात अण्णासाहेब विद्याने दिलेली कागदाची गुंडाळी हातात घेऊन आत आले. त्यांना पाहताच रामाच्या बायकोने डोक्यावर पदर घेतला. विद्याबरोबर आलेल्या स्त्रियांनीही अंग आकसून घेतलं. त्यांच्याकडे बघत मग अण्णासाहेब हसतहसत म्हणाले,
‘‘अहो, बायकांनी लाज सोडली तर जगात राह्यलंच काय? तिकडं परदेशात काय चाललंय बघताना. आम्हा पुरुषांचं काय नाही. आमची चंगळच आहे. पण संस्कृतीचं…’’
‘‘संस्कृती… संस्कृती बायकांनाच असती फक्त. पुरुषांना सगळी दारं खुली. संस्कृतीची भिंत घालून आत कोंडून टाकलंय स्त्रियांना. बाहेरचं काही दिसणार नाही याची चांगली खबरदारी घेतलीये.’’
अण्णासाहेबांचं बोलणं मध्येच तोडत आईसाहेब थोडय़ा रागात बोलल्या. पण अण्णासाहेब सुद्धा गप्प बसणारे नव्हते. विद्याकडे बघत म्हणाले,
‘‘विद्या, सांग तुझ्या मामीला. आज स्त्रियांसाठी सरकारने काय काय केलंय ते. आज कोणतंच क्षेत्र असं नाही की जिथं स्त्रियांना वाव नाही.’’
अण्णासाहेबांच्या पाठोपाठ आत आलेल्या पुढाऱयाने आणि चेअरमननेही अण्णासाहेबांचीच बाजू घेतली. चेअरमन म्हणाला,
‘‘अगदी पहिलीपासून शिक्षण मोफत केलंय. शिक्षणासाठी प्रवास मोफत आहे.’’
चेअरमनचं हे वाक्य पुढाऱयाने उचलून धरलं. म्हणाला,
‘‘इथंच तर घोडं पाणी पितंय. त्यांना सगळं मोफत आणि आयतं पायजे. बालपणी लागलेल्या सवयी कधी जात नाहीत. मोठय़ा झाल्यावरही त्यांना सगळीकडं सगळं मोफतच पायजे. राखीव जागांचा झगडा त्यातूनच तर निर्माण झालाय.’’
‘‘अहो, अण्णासाहेब, प्रवास करतानाही यांना राखीव जागा लागतात. एखाद्या बाकावर पुरुष बसलेला असेल तर त्यांनी उठून यांना जागा द्यावी, अशी यांची अपेक्षा असते. पुरुषांशी बरोबरी करायची तर मिळवायची स्वबळावर जागा.’’
चेअरमन विद्याकडं आणि तिच्या शेजारी बसलेल्या स्त्रियांकडे बघत त्यांनाच सुनवतात अशा अविर्भावात बोलला. मग पुढाऱयानेही या राखीव जागेवर एक ताशेरा ओढला. म्हणाला,
‘‘सगळे हक्क, सुविधा देऊनही त्यांना पुरुषांच्या बरोबरीने चालता येईना म्हणून हा आरक्षणाचा पांगुळगाडा मागतात त्या.’’
आतापर्यंत गप्प बसलेल्या विद्याला विषय कोठून कसा सुरू झाला आणि कोठे चाललाय तेच कळले नाही. पण पुढाऱयाचा रोख तिने ओळखला. तेव्हा त्याच्याकडेच बघत ती हलक्या आवाजात म्हणाली,
‘‘पण संधी मिळालेली कोणतीच स्त्री पुरुषांच्या मागे राहिलेली नाही.’’
‘‘पण त्यासाठी आरक्षण कशाला पायजे’’ पुढाऱयाच्या या वाक्यावर अण्णासाहेबही त्याला प्रतिसाद देत हसले.

(क्रमश:)

– बबन मिंडे