नेताजींचा (मुलायमसिंह यादव) माझ्यावर आर्शिवाद कायम असेल. माझे आणि वडिलांचे नाते कधीच तुटू शकत नाही. त्यांची आणि माझी उमेदवारांची यादी ९० टक्के सारखीच होती, असा दावा मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केला. निवडणूक आयोगाने सोमवारी त्यांना सायकल हे चिन्ह दिल्यानंतर ते प्रथमच पक्ष कार्यकर्त्यांसमोर बोलत होते. सायकल चिन्ह आपल्यालाच मिळणार याची पूर्ण खात्री होती. पहिली लढाई जिंकली आहे. आता खरी तयारी करावी लागणार असल्याचे सांगत येणाऱ्या काळातील आव्हानांबाबत जाणीव असल्याचे म्हटले. काँग्रेसबरोबर आघाडीबाबत चर्चा सुरू असून प्रो. रामगोपाल याबाबत चर्चा करत आहेत. लवकरच याबाबत लखनऊवरून घोषणा केली जाईल. आता आमच्यावर मोठी जबाबदारी असून पुन्हा एकदा सरकार बनवण्यावर आमचे लक्ष असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा- अखिलेश मुस्लिम विरोधक, मुलायमसिंह यादवांचा आरोप

दरम्यान सोमवारी निवडणूक आयोगाने मुलायमसिंह यादव यांना झटका देत अखिलश यांच्या बाजूने निर्णय दिला होता. निवडणूक आयोगाने आपल्या निर्णयात पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह दोन्ही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना दिले होते. आयोगाच्या या निर्णयामुळे मुलायमसिंह यादव यांच्या गटाला मोठा धक्का बसला होता. निवडणूक चिन्ह आणि पक्षावरील दाव्याची स्थिती स्पष्ट झाल्यानंतर आता अखिलेश यादव हे पक्षाचे सुप्रिमो बनले आहेत.
निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर अखिलेश यादव हे सायकल हे चिन्ह घेऊन विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. सोमवारी मुलायमसिंह यादव यांनी अखिलेश यांच्यावर हल्लाबोल केला होता. अखिलेश यांच्यावर टीका करताना ते मुस्लिमविरोधक असल्याचा आरोप ही त्यांनी केला. पत्नी व मुलांची शपथ दिल्यानंतर ते माझ्याशी बोलण्यास आले. पण एक मिनिटांतच काहीही न ऐकता ते उठून गेल्याचा खुलासा पक्ष कार्यकर्त्यांसमोर बोलताना केला होता. मी अनेकवेळा अखिलेशला चर्चेसाठी बोलावले. परंतु ते आले नाहीत. अखिलेश माझा मुलगा आहे. पण मला माहित नव्हतं की ते विरोधकांना जाऊन मिळतील, असं म्हणत खंत व्यक्त केली होती.