उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी गुरूवारी मतदान झाले. उत्तर प्रदेशातील १२ जिल्ह्यांसाठी एकूण ५३ जागांसाठी झालेल्या मतदानात सायंकाळी पाच वाजेपर्यंत ६१ टक्के मतदानाची नोंद झाली. बुंदेलखंड आणि काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या रायबरेली भागात मतदान झाले. काही ठिकाणी तुरळक घटना वगळता सर्वत्र सुरळीत मतदान झाले.

 

२०१२ साली या भागात समाजवादी पक्षाने २४ जागा, बहुजन समाज पक्षाने १५ , काँग्रेस सहा आणि अपक्षच्या खात्यात ३ जागा गेल्या होत्या. त्यामुळे याभागात समाजवादी पक्षाला आपले वर्चस्व कायम राखण्याचे आव्हान असणार आहे. चौथ्या टप्प्यात एकूण ६८० उमेदवार आपले नशीब आजमवणार आहेत. या भागात एकूण १.८४ कोटी मतदार संख्या आहे. यात ८४ लाख महिला मतदारांचा समावेश आहे. त्यामुळे महिला मतदारांची भूमिका येथे महत्त्वाची ठरणार आहे.

सत्ताधारी समाजवादी पक्षाला येथे बहुजन समाज पक्षाचे तोडीस तोड आव्हान आहे. या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभा घेऊन समाजवादी आणि काँग्रेसला वारंवार लक्ष्य केले होते. चौथ्या टप्प्यातील बांदा येथे सकाळी ९ वाजेपर्यंत १२.२ टक्के, रायबरेलीमध्ये ९.५ टक्के, फतेहपूरमध्ये ९.८ टक्के आणि जलौनमध्ये ८.६६ मतदानाची नोंद झाली होती. त्यानंतरही दुपारी ११ वाजेपर्यंत मतदानाची आकडेवारी २३ टक्क्यांपर्यंत पोहोचली होती.

 

दरम्यान, तिसऱ्या टप्प्यासाठी रविवारी सत्तारूढ समाजवादी पक्षाचे गड समजले जाणाऱ्या भागांत मतदान झाले होते. तिसऱ्या टप्प्यात १२ जिल्ह्यातील ६९ जागांवर मतदान केले गेले. यासाठी सुमारे ८२६ उमदेवार निवडणूक रिंगणात होते. यात १०६ महिलांचा समावेश होता. तिसऱ्या टप्प्यात ६१.६ टक्के मतदानाची नोंद झाली होती.