हे  मंत ऋतू सुरू झाला आजपासून. कोजागरीच्या लख्ख चांदण्याने उजळलेल्या धरतीच्या स्मितहास्याच्या मागोमाग झाली शरदाची सांगता. गेल्या आठवडय़ात महानवमीला सूर्याने प्रवेश केला चित्रा नक्षत्रात. नर्ऋत्य मोसमी पावसाचं शेवटचं नक्षत्र, शेतकऱ्यांना दिलासा देणारं, मन प्रफुल्ल करणारं, पिकाचा दाणा पाणीदार करणारं. सर्व आसमंत कसा बहरलेला आहे. त्याला जोड आहे हसत खेळत येणाऱ्या दसरा-दिवाळीची, मंगलमय वातावरणाची, सुगीच्या दिवसांची. वास्तुपुरुष अगदी आयुधपूजेच्या मुहूर्तावर कर्नाटक राज्याच्या राजधानीत- बेंगळुरूमध्ये दाखल झाला. या महानगराकडे जाऊ पाहणाऱ्या शहरातील घरं,

सदनिका, रस्ते नटले होते पारंपरिक तोरणं आणि रांगोळ्यांनी. गेला आठवडाभर अनेक गृहसंकुलं, त्यांमधले रस्ते गजबजले होते- गोंबेपूजेसाठी नटूनथटून शेजारीपाजारी भेट देणाऱ्या महिलावर्गाने. याउलट थोडं बाहेर गेलं की सगळे रस्ते होते ठप्प, प्रचंड वहातुकीच्या भाराखाली, प्रदूषण आणि गोंगाटग्रस्त. वास्तुपुरुष एका चौकात रस्ता ओलांडण्यासाठी दीर्घ काळ गोंधळलेल्या मन:स्थितीत उभा होता. ‘‘सुस्वागतम्, विरोधाभासी राजधानी-शहरात वास्तुपुरुषा! जमणार आहे का आज पलीकडे जायला? कसं काय वाटलं हे बहुरूपी शहर – उद्याननगरी, छावणी शहर, एअरकंडिशण्ड सिटी, पेन्शनरांचं नंदनवन, सिलिकॉन सिटी, पब कॅपिटल, रॉक/मेटल कॅपिटल, पर्यटन हब वगरे वगरे!’’ उपराळकर देवचाराने वाहनांच्या त्या गजबजाटातही वास्तुपुरुषाचं लक्ष वेधून घेतलं.

प्रचंड वहातुकीच्या दडपणाने गांगरलेला वास्तुपुरुष दचकून भानावर आला. ‘‘अनेक दंडवत, देवा महाराजा! कसा वेळेवर धावून आलास या गजबजाटातून सोडवायला. इथून जवळच लालबाग उद्यान आहे. तिथल्या मोठय़ा कातळाजवळच एक पुरातन मनोरा आहे, या शहराचे निर्माते- केंपेगौडा यांनी उभारलेला. भेटू या तिथेच, या शहराच्या भवितव्याचं विवेचन करायला.’’ देवचाराच्या पाठराखीमुळे आता वास्तुपुरुष रस्ता ओलांडून लालबाग उद्यानात लवकरच पोचला. ग्रॅनाइट कातळाच्या प्रचंड पसाऱ्यावर एक नजर टाकून त्याने मनोऱ्याला वंदन केलं. आभाळतल्या नितळ नीळाईच्या पाश्र्वभूमीवर उठून दिसणारा तो पुरातन मनोरा वास्तुपुरुषाला वेगळीच साद घालत होता. ‘‘चल वास्तुपुरुषा, दे ओळख करून या बहुढंगी शहराची, या शहराच्या निर्मात्याच्या साक्षीने.’’ उपराळकर देवचार आधीच पोचला होता आणि तो आतुर होता वास्तुपुरुषाचे या शहरासंबंधीचे विचार ऐकायला.

वास्तुपुरुषाने मनोऱ्याकडे नजर टाकत या शहराचे निर्माते केंपेगौडा यांचं क्षणभर स्मरण केलं, ‘‘देवचारा, केंपेगौडा या विजयनगर साम्राज्याच्या द्रष्टय़ा प्रतिनिधीने १५३७ मध्ये गंगाराजाचा पराभव करून या परिसरावर ताबा मिळवला आणि मध्यभागी विटा-मातीचा किल्ला बांधला, त्यात शहर उभारलं. या नवीन शहरात पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण असे दोन प्रमुख रस्ते होते, शिवाय छोटय़ा बाजारपेठांचे अनेक विभाग होते. हे आहे आजच्या बेंगळुरू शहराचं केंद्रस्थान. पुरातन किल्ल्याचे काही अवशेष आणि विकसित बाजारपेठा या इतिहासाची साक्ष देत आहेत. पहिल्या केंपेगौडाचा वारस दुसरा केंपेगौडा याने शहराच्या चार दिशांना मनोरे बांधून शहराची सीमा निश्चित केली. हा समोरचा मनोरा त्यातलाच एक. पुढील कालावधीत शहराच्या वेगवान वाढीने या सीमा केव्हाच ओलांडल्या! आता तर हे शहर अवाढव्य पसरत चाललं आहे, अधिकाधिक गोंधळात गुंतत चाललं आहे. १५६५ मध्ये विजयनगर साम्राज्याचा अस्त झाल्यानंतर बेंगळुरू विविध राजांच्या अमलाखालून गेलं आणि शेवटी १७९१ मध्ये इंग्रज अमलाखाली आलं. इंग्रज अधिकाऱ्यांना बेंगळुरूचं हवामान, परिसर, हिरवाई आवडली आणि त्यांनी आपल्या सन्याची दक्षिण भारतातील प्रमुख छावणी इथे वसवली. शहराचा कारभार त्यांनी त्यांच्याच अमलाखाली असलेल्या मसुरू संस्थानाकडे सोपवला. बेंगळुरूचं रूपांतर झालं जुळ्या शहरात – किल्ल्यामधलं ‘पेटे’ शहर आणि बाहेरील ‘छावणी’ शहर. इंग्रज आणि मसुरू संस्थानाच्या अमलाखालील बेंगळुरू शहर छावणीपलीकडील अनेक गावांना आत्मसात करत वेगाने पसरलं. स्वातंत्र्यानंतर शहर आणि छावणी यांचा मिलाफ झाला. तीच वाढ मात्र पुढे राज्य व केंद सरकार यांच्या अमलाखाली सुरू रहिली, औद्योगिकीकरणामुळे ती अधिक वेगवान होत गेली आणि १९८५ नंतरच्या ‘माहिती तंत्रज्ञाना’च्या उद्रेकाने हे शहर महानगर बनण्याच्या स्पध्रेत उतरलं!’’

उपराळकर देवचाराने वास्तुपुरुषाचा ओघ रोखला, ‘‘कमाल आहे, विटा-मातीचा किल्ला ते सिलिकॉन सिटी या वेगवान प्रवासाची. पण मगाशी तू अडकलेल्या त्या चौकातला वाहतुकीचा प्रचंड गोंधळ पाहून ही प्रगती आहे की अधोगती या कोडय़ात पडलो आहे मी आता. काय कारण आहे या अवस्थेला, वास्तुपुरुषा?’’

वास्तुपुरुषाने एक दीर्घ श्वास घेतला, ‘‘देवा महाराजा, आपण बेंगळुरूकडे भारतातील एक प्रातिनिधिक शहर म्हणून बघू. आज जवळजवळ सर्वच विकसित होणाऱ्या शहरांची दशा अशीच आहे. विकासाच्या हव्यासापोटी राजकारणी- उद्योजक-विकासक या त्रयीने नियोजनाच्या मूलभूत नीतिीमत्तेची पायमल्ली करत, पर्यावरणाला डावलत, निसर्गाचा ऱ्हास करत, पायाभूत सुविधांची सोय न करता ढकललेली ही वाढ नसून सूज आहे. आपण बेंगळुरू शहराचं उदाहरण घेऊन या प्रश्नाचा सर्वागीण विचार करू. खरं तर बेंगळुरूला निसर्गाचा वरदहस्त आहे. स्वातंत्र्यपूर्व राज्यकर्त्यांनी या शहराच्या विकासाकडे बऱ्याच संवेदनापूर्वक पहिलं, ‘उद्यान शहर’ म्हणून त्याला अभिमानाने उभारलं. बेंगळुरू दक्षिण भारताच्या दख्खन पठाराच्या मध्यावर वसलं आहे, सुमारे ९०० मीटर उंचीवर. आपण गेल्याच पंधरवडय़ात हिमालय परिसरात, म्हणजेच कर्कवृत्ताच्या उत्तरेला, उच्च अक्षांशावर आणि अधिक उंचीवर होतो. आता आपण कर्क आणि  विषुववृत्ताच्या साधारणपणे मध्यावर आहोत. तरीही उंच प्रदेशात असल्याने इथलं हवामान हिमालयाच्या पायथ्याच्या प्रदेशासारखं सुखावह आहे. अगदी महाराष्ट्रातील महाबळेश्वर गिरिस्थानाप्रमाणे. समशितोष्ण, शीतलतेकडे कललेलं, कमी आर्द्रतेचं. पाऊस मात्र तुलनेत कमी, पण नर्ऋत्य आणि ईशान्य या दोन्ही मोसमी वाऱ्यांसह येणारा, रिमझिमत वर्षांतील सात-आठ महिने बरसणारा, उन्हाळ्यातसुद्धा रात्री शीतल करणारा. परिसर उंच-सखल पठाराचा, गर्द लाल मातीचा आणि करडय़ा ग्रॅनाइटच्या टेकडय़ांचा. वृषभावती ही अर्कावतीची छोटी उपनदी शहरातून वाहते, पण दुर्दैवाने आज तिचं रूपांतर सांडपाणी नाल्यात झालं आहे! इथल्या जमिनीच्या चढ-उतारांमुळे अनेक नसíगक आणि मानवनिर्मित तलावांचं जाळंच परिसरात आहे, भूगर्भ पाणवठय़ांनी तसंच जमिनीवरून वाहणाऱ्या ओढय़ांनी एकमेकांना जोडणारं. केंपेगौडाने १६व्या शतकात याच ओढय़ांवर बांध घालून तलाव निर्मिती केली आणि त्यांचा सुयोग्य वापर शहराच्या पाणीपुरवठय़ासाठी, शेतीसाठी, मत्स्यशेतीसाठी केला. एके काळी बेंगळुरूमध्ये २८५ तलाव होते. हे जलाशय शहराचं, परिसराचं सूक्ष्म-हवामान सुखद ठेवायला मदत करायचे, नसíगक जैवविविधतेला आधार द्यायचे. वाढत्या शहराच्या समस्या आणि पर्यावरणविरोधी नियोजनामुळे अतिक्रमण, भराव, सांडपाणी इत्यादी आघातांनी हळूहळू हे जलाशय नष्ट झाले, दुरवस्थेला पोचले. आजमितीला शहरात नाव घेण्यासारखे फक्त १७ तलाव शिल्लक आहेत. तेही जगण्याची धडपड करत आहेत. इथली माती आणि सुयोग्य हवामान यांमुळे परिसर हिरवागर्द आहे; चुकलो- होता म्हणायला पहिजे. शिवाय विविध राज्यकर्त्यांनी मोठमोठी उद्यानं शहरात उभारली, ठिकठिकाणांहून आणलेल्या वैविध्यपूर्ण वनस्पतींनी शहरात सातत्याने, ऋतूंनुसार रंगपंचमी साजरी केली. अनेक मोठी शैक्षणिक संकुलं इथे उभी रहिली. त्यांनीही मोठय़ा प्रमाणावर नसíगक वनस्पतींचं संवर्धन केलं. या हिरवाईने प्रदूषणालाही रोखलं, सूक्ष्म-हवामान नियंत्रित ठेवलं, पक्षी-प्राणी-कीटकांना आधार दिला. बेंगळुरू शहराचं नंदनवन केलं.’’

उपराळकर देवचाराला राहवेना, ‘‘मग कुठे आहे ते नंदनवन आता? का गेलं हे शहर असं पर्यावरणाच्या अधोगतीला? जर इथलं जीवन निरामय नसेल तर काय अर्थ आहे मग आर्थिक आणि औद्योगिक प्रगतीला?’’

‘‘देवा महाराजा, मला तुझा आवेग समजतो आहे. मगाशी त्या चौकात वाहतुकीच्या गोंधळात हतबलतेने उभा असताना अनेक गोष्टी मी पाहिल्या, शिकलो. अशा शहरातील सर्वसामान्य जीवनच बेदरकार झालं आहे, सामान्य नीतिमत्तेचा नाश झाला आहे, नागरिक शास्त्रांची संस्कृती नष्ट झाली आहे. स्वत: वाहन चालवताना जो माणूस समाजाबद्दल इतका बेफिकीर असतो तो वैयक्तिक आयुष्यातही तितकाच उद्दाम होत जातो. त्या चौकातल्या निरीक्षणात मी काय काय पाहिलं? एका स्कूटर अथवा मोटरसायकल वरून शिरस्त्राण न घालता जाणारी चार-पाच जणांची कुटुंबं; लाल दिव्याकडे दुर्लक्ष करत-पादचाऱ्यांना भयभीत करत वेगाने जाणाऱ्या गाडय़ा आणि ऑटोरिक्षा; थांबलेल्या वाहतुकीतून अधीरपणे पुढे जाण्यासाठी पदपथावरून पादचाऱ्यांना दामटवत जाणारे स्कूटर चालक; चौकातील रस्त्यांवरून वळण्यासाठी असलेली रांगेची शिस्त मोडून वाहतुकीचा विचका करणारे चालक; चुकीच्या मार्गाने गाडी पुढे घालणारे बस चालक; लाल दिवा हिरवा होण्याच्या आधीच अधीर होऊन जोराने कर्णे वाजवत, गोंगाट करत गाडय़ा पुढे ढकलणारे चालक; चौकाच्या मध्येच दुसऱ्या गाडीच्या चालकाशी शिव्याशाप देत हुज्जत घालत सगळ्या वहातुकीला रोखणारे वाहन मालक; इशारा देत लवकर पुढे जाऊ इच्छिणाऱ्या रुग्णवाहिकेला तुच्छतेने वाट न देणारे नवश्रीमंत मालक-चालक; मोबाइलवर बोलत, उजव्या-डाव्या बाजूच्या वाहनांना रेटत पुढे निघणारे चालक; मोबाइलवर बोलत किंवा ‘संगीत-कानमंत्रा’त गुंगून कुठूनही-कसेही रस्ता ओलांडणारे पादचारी; आणि या सर्व गरव्यवस्थेकडे काणाडोळा करणारे वाहतूक नियंत्रक पोलीस! एक धडा मी त्या चौकात शिकलो- शहरातील वाहतुकीच्या दर्जावरून शहराची संस्कृती समजू शकते. असो देवा महाराजा, या शहराच्या प्रातिनिधिक अधोगतीची कहाणी आपण सविस्तर ऐकू या पंधरवडय़ाने, दीपावलीच्या मागोमाग येणाऱ्या पांडव पंचमीच्या मुहूर्तावर. शिवाय पाडव्याला निश्चय करूया बदलाचा, संतुलित विकासाचा. आणि चुकीच्या मार्गाने होणाऱ्या शहर नियोजनाला देऊया दिशा पर्यावरणस्नेही विकासाची.’’ वास्तुपुरुषाने सांगता केली निराशेतून आशेच्या दिशेने जाण्याच्या प्रयत्नात.

उपराळकर देवचार काही हतबलतेतून बाहेर पडत नव्हता. शहराच्या मध्यावरील केंपेगौडांचा पुतळा विषण्णतेने दोघांकडे दृष्टिक्षेप टाकत असतानाच मावळत्या सूर्यकिरणांनी पुरातन मनोऱ्यावर सोनेरी छटा चढवली, लालबागमधील वटवाघळांनी आकाशात झेप घेत उत्तर दिशेने प्रयाणाला सुरुवात केली, पश्चिम नभांगण नारिंगी, सोनेरी, किरमिजी रंगांनी बहरलं होतं. त्या बहरातूनच आदित्य क्षितिजावरील हिरव्याकंच वनराईवरून, रुद्रपलाशाच्या लालजर्द फुलोऱ्याला गोंजारत हलकेच अस्ताला गेला. वास्तुपुरुषाच्या नेत्रांतून ओघळणाऱ्या अश्रूंनी अघ्र्यार्पण केलं.

उल्हास राणे  ulhasrane@gmail.com