गणेशोत्सव हा घराघरांत चैतन्य आणणारा सण. सामान्यांपासून थोरामोठांच्या घरात खास बाप्पाच्या आगमनासाठी घर सजावटीचे बेत आखले जातात. गणेशोत्सवासाठी सेलिब्रिटी मंडळी आपल्या घरात कोणकोणते बदल करतात, कशी सजावट करतात याविषयी..

गणपती बाप्पा घरी आले की वातावरण कसं प्रसन्न होऊन जातं. सारा आसमंत बाप्पामय होऊन जातो. घराचा कोपरान्कोपरा प्रसन्न दिसू लागातो. बाप्पांच्या स्वागतासाठी सारं घरच सज्ज होतं. आपला आवडता पाहुणा- बाप्पा येणार म्हणून आपल्या कामातील व्यस्त वेळापत्रकातून थोडा वेळ काढत, मनावरची मरगळ बाजूला सारून लोक कामाला लागतात. बाप्पाचं आगमन आणि घराचा कायापालट हे अनेकांचं ठरलेलं गणित. बाप्पा येणार म्हणून घरातल्या सामानाची जागा बदलते. काही सामान नव्याने घरात दाखल होतं.
सेलिब्रिटींसाठी घरात गणपतीचे आगमन हा त्यांच्या व्यस्त वेळापत्रातील एक निवांत क्षण.. त्याचबरोबर त्यांच्या पुढच्या कामासाठी ऊर्जा देणारा उत्सव. गणेशोत्सवाच्या काळात या सेलिब्रिटींची घरंही बाप्पामय होतात. गणपतीच्या स्वागताला ही मंडळी घर सजावटीचे खास बेत आखतात.

May 2024 These Five Zodiac Signs Will Earn Money
लक्ष्मी येती घरा! १ मे पासून पाच राशींना प्रचंड धनलाभ, ‘ही’ असतील फायद्याची रूपं; तुमची रास आहे का नशीबवान?
replica of Ram temple, Ram campaign,
ठाण्यात ठाकरे गटाकडून रामाचा प्रचार, राजन विचारेंच्या चैत्र नवरात्रोत्सवात राम मंदिराची प्रतिकृती
mahalaxmi idol conservation marathi news
महालक्ष्मीच्या मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया सुरू; भाविकांना उत्सव मूर्तीचे दर्शन
hanuman jayanti 2024 date time shubh muhurat puja mantra and signification
Hanuman Jayanti 2024: २३ की २४ एप्रिल, यंदा हनुमान जयंती कधी आहे? जाणून घ्या योग्य तिथी, पूजेचा मुहूर्त, मंत्र आणि महत्त्व

घर कात टाकतं!
कुशल बद्रिके
ws07   आमचा गणपती असतो अंबरनाथमधल्या चाळीच्या घरात. हे घर सुमारे ८-१० खोल्यांचं आहे. आमचा गणपती दीड दिवसांचा असतो. या दोन दिवसांत आमच्या घरातले झाडून सगळे सदस्य हजर असतात. हॉलमध्ये आम्ही गणपती बसवतो. त्यामुळे दरवर्षी बाप्पा येण्याच्या सुमारास हॉलला नवा रंग दिला जातो. पडदे बदलले जातात. आमच्या या घरात काही बदल करायचा असेल, नवं फर्निचर वगैरे घ्यायचं असेल, घराचा लुक बदलायचा असेल तर ते सगळं गणपतीच्या काळात होतं. बाप्पा येणार म्हणून घर छानपैकी सजवण्यावर आमचा भर असतो. आम्ही एक कायमस्वरूपी स्टँड बनवून घेतलाय. त्यावर १०७ ६चा प्लायवूड लावला जातो. या स्टेजवर आमचा बाप्पा विराजामन होतो. स्टेजला तिन्ही बाजूंनी पडदे लावले जातात. त्याला रंग देण्याचं काम संपूर्ण घरातले सदस्य करतात. प्रत्येकाचा हात याला लागलाच पाहिजे असा एक दंडकच आहे. आम्ही मखर करत नाही, तर दरवर्षी निरनिराळे सामाजिक संदेश देणारे चलचित्र तयार करतो. बऱ्याच वर्षांपूर्वी आम्ही थर्माकोलचे देखावे करायचो. पण ते पर्यावरणाला मारक आहे, हे समजल्यावर आता ज्या गोष्टींचं विघटन होऊ शकेल, अशा गोष्टींपासून देखावे तयार करतो. आम्ही हल्ली बाप्पाची मूर्तीही शाडूचीच आणतो. कारगील युद्ध, बाजीप्रभू देशपांडेंची लढत, शिवाजी राजे, गणेश भगवान यांसारख्या अनेक विषयांवर आम्ही चलत्चित्र तयार केलेली आहे. बाजीप्रभूंच्या प्रसंगासाठी आम्ही एक पोवाडाही गायला होता. त्यासाठी रेकॉर्डिग केलं होतं. या चलचित्रासाठी संवाद लिहिणं, गाणी, पोवाडे लिहिणं ही एक वेगळीच गंमत आहे.
या दोन दिवसांत घरात एकूण २५-३० माणसं असतात. प्रसादाची तर चंगळच असतेच, पण आमच्या घरची आरतीही खास असते. तब्बल तासभर तर ती चालतेच. गणपती हा विशेषकरून लहानग्यांचा आवडता देव. त्यामुळे या सणाला आम्ही लहान मुलांना प्राधान्य देतो. घरातल्या लहानग्यांसोबत संगीतखुर्ची खेळतो. गाणी लावून नाचतो. एकूण गणपतीच्या या दिवसांत घरात धम्माल असते. घराला छान चकाचक केल्याने, बाप्पाच्या भेटीला कुटुंबातली सगळी माणसं एकत्र आल्याने आमचं घरही या सणाच्या दिवसात प्रसन्न मुद्रेने हसत असतं.

मोगऱ्याच्या फुलांची सजावट आणि दिव्यांची आरास
अमृता खानविलकर
ws08गणपती बाप्पा येणार म्हटल्यावर घरादाराला एक चैतन्य येतं. घरातल्या माणसांबरोबर घरही आळस झटकून कामाला लागतं. माझा नवरा हिमांशू पंजाबी आहे, त्यामुळे त्यांच्याकडे घरी गणपती आणण्याची पद्धत नाही. तरीही गेली काही वष्रे त्याच्या इच्छेखातर त्याच्या घरी गणपतीचं आगमन होतं. गणपती बाप्पा घरी आल्यावर त्यांचं सगळं साग्रसंगीत व्हायला हवं, या मताची मी आहे. त्यामुळे मी वेळ काढून गणपतीच्या आगमानाची तयारी करणार आहे. माझी आई स्वयंपाकाकडे, तर बाकीच्या गोष्टींकडे मी स्वत: लक्ष देणार आहे. आम्ही इको फ्रेंडली गणपती आणणार आहोत. पर्यावरणाला मारक अशी कोणतीही सजावट करायची नाही, हे मी मनाशी पक्कं ठरवलंय. यंदा मी मोगऱ्याच्या फुलांची सजावट करणार आहे. मला दिव्यांची अतिशय आवड आहे. त्यामुळे मी घरात निरनिराळ्या प्रकारचे दिवे लावून आरास करणार आहे. हॉलमधलं फर्निचर जरा बाजूला करून आम्ही बाप्पांसाठी जागा करतोय. हॉलमध्ये तीच जागा सगळ्यात उठून दिसावी, यासाठी आमचा विशेष प्रयत्न असेल आणि बाप्पांचं आगमन झाल्यावर तर ते होतंच. आमच्या घरी नैवेद्यही अगदी खास मराठमोळा असतो. आम्ही हॉलमध्येच बाप्पांना बसवतो. बाप्पांची ही ठरलेली जागा मोकळी करण्याचा एक वेगळाच कार्यक्रम असतो. खरं तर तेव्हापासूनच एक प्रकारचं चैतन्य घरात दिसू लागतं. बाप्पाचा आशीर्वाद मिळाला की आपलं नेहमीचं घरही प्रसन्न होऊन जातं.

सुखावले घरकुल
चिन्मय उदगीरकर
ws09मला वाटतं, प्रत्येक घराची अशी एक प्रकृती असते. ती या सणाच्या काळात जास्तच निरोगी राहते. हल्ली आपण सगळेच कामाच्या धबडग्यात कौटुंबिक आयुष्य विसरलोय. घराला, त्यातल्या माणसांना आपण फार कमी वेळ देतो. पण गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपण आवर्जून, निगुतीने घराची साफसफाई करतो. घराच्या कानाकोपऱ्यात पाहतो. घरामध्ये कधी नव्हे ती दिवसभर माणसांची वस्ती असते. त्यामुळे घरही सुखावतं. गणपतीच्या बाबतीत बोलायचं झालं तर हा एकच सण असा आहे, जेव्हा घरात माझीच सत्ता चालते. मी आमच्या कुटुंबातलं शेंडेफळ, त्यामुळे बरेचदा मलाच सगळ्यांचं ऐकावं लागतं. पण गणपतीत मात्र माझंच राज्य असतं. आमच्या घरची गणपतीची मूर्ती मीच निवडतो. सजावट काय करायची, हे मीच ठरवतो. आमच्याकडे देवाची वेगळी खोली आहे. गणपती आल्यावर इतरांप्रमाणेच आमच्याही घराची साफसफाई होते. पवन, निलेश आणि प्रकाश असे माझे तीन जीवश्चकंठश्च मित्र. या तिघांच्या घरी गणपती बसत नसल्याने ते माझ्याच घरी असतात. फुलांची आरास असो वा वेगळ्या प्रकारचं मखर, या तिघांचा सहभाग असतोच. माझी आई दक्षिण भारतीय आहे. त्यांच्याकडे दिव्यांची आरास महत्त्वाची असते. त्यामुळे आमच्याकडे प्रत्येक सणाला दिव्यांची सजावट असतेच. पण आम्ही थर्माकोल वगैरेची सजावट करणं टाळतो. मी नाशिकला पर्यावरण संवर्धनासाठी काम करतो. त्यामुळे आमच्या घरचा गणपतीही पर्यावरणपूरक असाच असतो. बाप्पाचं आगमन साऱ्यांनाच सुखावून टाकतं. तसंच त्याच्या आगमनाने माझं घर आणि माझी माणसंही सुखावतील, याची काळजी मी घेतो.

घर चैतन्यमय होतं
मृणाल दुसानिस
ws10माझं नुकतंच लग्न झालंय. त्यामुळे सासरकडचा हा माझा पहिलाच गणेशोत्सव. माझं सासर पुण्याचं तर माहेर नाशिकचं. दोन्ही घरी दहा दिवसांचा बाप्पा असतो. माझ्या माहेरी नाशिकला आमचा फ्लॅटच आहे. त्यामुळे गणपती येणार म्हटल्यावर रंगरंगोटी सोडून इतर सर्व साफसफाई सुरू होते. जाळ्या-जळमटं निघतात. जुनं सामान काढून टाकलं जातं. घर मस्त चकचकीत केलं जातं. माहेरी माझ्या आणि भावाच्या खोलीत गणपती बसवला जातो. त्यामुळे ती खोली बाप्पांसाठी रिकामी करण्याची जबाबदारी आम्हा दोघांचीच असते. आमचा गणपती आमच्या अभ्यासाच्या टेबलावर विराजमान होतो. आम्ही दरवर्षी ठरलेली म्हणजे दगडूशेठ हलवाईंच्या गणपतीसारखी मूर्ती घरी आणतो. गणपतीची आरास साधीच असते. फार भपका आम्हाला कोणालाच आवडत नाही. साडय़ा किंवा फुलांची सजावट आम्ही करतो. आम्ही लहान असताना बाबा थर्माकोलचे मखर आणायचे, पण नंतर आम्ही साडय़ांची सजावट करू लागलो. या १० दिवसांत आमची खोली आणि एकूण घरच वेगळं भासतं. सगळीकडे सणाचं चैतन्य असतं. आमच्याकडे दरवर्षी सत्यविनायकाची पूजाही असते. त्यामुळे त्याची तयारी, सजावट, पाहुणे यामुळे घराला वेगळाच रंग चढतो. गणपतीच्या दिवसांत घर सुखावतं, याचं आणखी एक कारण म्हणजे बाप्पा घरात असल्याने कोणाचीच मोठय़ा आवाजात बोलण्याची, वादावादी करण्याची टाप नसते. सगळेच एकमेकांशी छान वागतात. हसून-खेळून असतात. वादाचे प्रसंगही येत नाहीत. माझ्या सासरघरचा हा पहिलाच गणपती असेल. त्यामुळे मी २८ तारखेपासूनच सुट्टी घेऊन पुण्याला जाणार आहे. माझा नवराही अमेरिकेतून सुट्टी घेऊन येतोय, त्यामुळे बाप्पा आणि माझा नवरा दोघंही घरी येण्याचा आनंद काही वेगळाच आहे. मग घर तर सजणार आहेच! एका ठरलेल्या जागीच आम्ही गणपती बसवतो. माझ्या सुदैवाने सासरही माझ्याच विचारांचं आहे. इथेही सजावटीचा भपका नसतो. सुंदर, पण सौम्य सजावट असते. या नव्या घरात मला बाप्पा नव्याने भेटतील. त्यामुळे त्याची उत्सुकता आहेच.
स्वाती केतकर-पंडित swati.pandit@expressindia.com