ऐन निवडणूकीच्या तोंडावर कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघातील भारतीय जनता पक्षाचे(भाजप) उमेदवार रमेश म्हात्रे यांनी निवडणुकीतून माघार घेऊन पक्षाला मोठा धक्का दिला आहे.
यंदा शिवसेनेकडून तिकीट न मिळाल्याने बंडखोरी करत रमेश म्हात्रे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. शिवसेनेचे उमेदवार सुभाष भोईर यांच्या विरोधात भाजपने रमेश म्हात्रे यांना उमेदवारी देखील जाहीर केली. मात्र, बुधवारी रमेश म्हात्रे यांनी अचानक निवडणूकीतून माघार घेतल्याचे जाहीर करून सर्वांना धक्का दिला.
यंदा प्रत्येक पक्ष स्वबळावर लढणार असल्यामुळे मनसेकडून रमेश पाटील, शिवसेनेचे सुभाष भोईर, काँग्रेसच्या शारदा पाटील, राष्ट्रवादीचे वंडारशेट पाटील आणि भाजपकडून रमेश म्हात्रे अशी पंचरंगी लढत होणार होती परंतु, रमेश म्हात्रेंच्या माघारीमुळे आता चौरंगी लढत पहायला मिळणार असून या मतदार संघातील शिवसेनेच्या डोक्यावरील भार आता कमी झाल्याचे बोलले जात आहे. कल्याण ग्रामीण मतदार संघ सध्या मनसेच्या खिशात असून रमेश पाटील विद्यमान आमदार आहेत. २००९ च्या निवडणूकीत शिवसेनेकडून निवडणूक लढविणाऱया रमेश म्हात्रे यांचा जवळपास दहा हजार मतांची पराभव झाला होता.
सावनेरमध्ये भाजपला धक्का; मुसळेंचा अर्ज बाद
याआधी मंगळवारी सावनेर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सोनबा मुसळे यांचा उमेदवारी अर्ज मंगळवारी निवडणूक निर्णय अधिकाऱयांनी अवैध ठरवल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे.