लोकसभा निवडणुकीच्या तयारीलाही लाजवेल एवढय़ा जोमाने प्रदेश भाजपने विधानसभा निवडणुकीच्या युद्धाची पूर्वतयारी तरी पूर्ण केली आहे. सुमारे २०० मतदारसंघात आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त अशा ‘व्हच्र्युअल युद्धभूमी’, म्हणजे ‘मॉडेल वॉर रूम’ तयार करण्यात आल्या आहेत. कोणत्याही प्रचार मोहिमेची लघुचित्रफीत केवळ ९ सेकंदात राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्यासाठी पक्षाच्या या युद्धभूमीवरील ‘आयटी’वीरांची यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. तीन कोटी मोबाइलधारकांची ‘डेटा बँक’ तयार करण्यात आली असून मतदार यादीतील तपशीलाची माहिती मतदारापर्यंत पोचविण्यासाठी वेगळे ‘अ‍ॅप’ ही तयार करण्यात आले आहे. पारंपारिक वासुदेव, पथनाटय़े यांचाही खुबीने वापर करण्यात येणार आहे.
लोकसभेच्या वेळी भाजपने राबविलेल्या प्रचार यंत्रणेची खूप चर्चा झाली. त्याचा प्रभाव जाणवल्याने अन्य राजकीय पक्षांनीही त्या पाश्र्वभूमीवर सोशल मीडीया व अन्य प्रचार यंत्रणा राबविण्यासाठी पावले टाकली. पण अन्य पक्षांना मागे टाकण्यासाठी भाजपने व्यूहरचना केली आहे. लोकसभेच्या वेळी मुंबई व पुणे येथे सोशल मीडीयाच्या मध्यवर्ती वॉर रुम होत्या. शिवाय औरंगाबादलाही वॉर रुम तयार करण्यात आली आहे.
स्थानिक महत्वाचे विषय व प्रश्न, त्यावर पक्षाची भूमिका, याविषयी व्हिडीओ, ऑडिओ लघुसंदेश, व्हॉट्स अ‍ॅप व एसएमएसच्या माध्यमातून पाठविले जाणार आहेत. अगदी मतदारापासून उमेदवारालाही उपयोगी ठरेल अशी माहिती वॉर रुमकडे उपलब्ध असेल. लोकसभेच्या वेळी मध्यवर्ती कार्यालयाकडून पाठविलेला एखादा संदेश १९ सेकंदात अगदी ग्रामीण भागात पोचत होता. आता आणखी अद्ययावत यंत्रणा वापरून तो संदेश केवळ ९ सेकंदात जाईल, अशी प्रणाली वापरत असल्याचे वॉर रुमच्या प्रमुख श्वेता शालिनी यांनी सांगितले. त्याचबरोबर मतदारयादीतील क्रमांक व मतदानकेंद्र ही माहिती मतदारापर्यंत पोचविण्याचे ‘अ‍ॅप’ प्रत्येक बूथ प्रमुखाच्या मोबाईलमध्ये लोकसभेच्या वेळी देण्यात आले होते. त्यात आणखी सुधारणा करुन आता त्याने ते मतदारापर्यंत पोचविले आहे की नाही, याची माहिती मध्यवर्ती वॉर रूमकडे येईल, अशी रचना करण्यात आली आहे.

विधानसभेसाठी स्थानिक राजकारण व प्रश्न महत्वाचे असतात. हे लक्षात घेऊन स्थानिक पातळीवर छोटय़ा ‘मॉडेल वॉर रुम’ तयार करण्यात येत आहेत.  
 -श्रीकांत भारतीय, संघटनमंत्री