यंदा मी नक्की निवडून येईन, असे सोमवारी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या समक्ष छातीठोकपणे सांगणाऱ्या राष्ट्रवादीच्या इच्छुकाने मंगळवारी थेट शिवसेनेचा रस्ता पकडला. विशेष म्हणजे या नेत्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षात स्वागत केले.  राष्ट्रवादीच्या इच्छुकांच्या सध्या मुलाखती सुरू आहेत. मुंबईतील मागठाणे मतदारसंघातून प्रकाश सुर्वे यांनी मुलाखत दिली. आपण यंदा नक्की निवडून येऊ, असा विश्वास राष्ट्रवादीत मुलाखतीच्या वेळी सुर्वे यांनी व्यक्त केला. ही मुलाखत देऊन २४ तास उलटण्याच्या आतच सुर्वे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मनसेचे आमदार प्रवीण दरेकर यांना शह देण्याकरिता शिवसेना तगडय़ा उमेदवाराच्या शोधात होती. त्यातूनच सुर्वे यांचा शिवसेना प्रवेश झाल्याचे सांगण्यात येते.