क्षेत्र कोणतंही असो यशोशिखरापर्यंतचा प्रवास खडतरच असतो. हा प्रवास करताना आणि नंतरही रूढ संकेतांचं पालन करावं अशी अपेक्षा असते. पण काही मंडळी ही रुटिन बंधनं झुगारून देतात. आपलीच अशी एक स्टाइल डेव्हलप करतात. क्रिकेटविश्वातल्या तीन वर्ल्डकप्सवर नाव कोरणाऱ्या ‘चाम्पियन’ वेस्ट इंडिजच्या मुक्तछंदी

पाचवी ते दहावी मराठी अभ्यासलेल्या (सीबीएसई/ आयसीएसई आणि आपलं नेहमीचं काहीही असो) मंडळींना मुक्तछंद ही संकल्पना शिकवतात. पद्यलिखाणात वृत्त-मात्रा, यमक, गेयता आणि एकूणच मीटर (इथे या शब्दाचा अर्थ ठेक्याबरहुकूम असा अभिप्रेत आहे) मध्ये लिहण्याची सक्ती नसलेला प्रकार म्हणजे मुक्तछंद. स्वत:स कवी म्हणवून घेण्याची दांडगी इच्छा असणारे गद्यालाच पद्य म्हणून रेटतात आणि ‘आम्ही मुक्तछंदी’ म्हणून मिरवतात तो भाग वेगळा. मुक्तछंदाची एवढी उजळणी घेण्यामागचं कारण म्हणजे व्हायरल झालेला ट्वेन्टी-२० विश्वविजेता वेस्ट इंडिजचा संघ आणि त्यांच्या गोष्टी.

सांप्रत जगात क्रिकेट खेळणारे देश एका बाजूला आणि वेस्ट इंडिज दुसऱ्या बाजूला. (वेस्ट इंडिज देश नाही याची आम्हाला कल्पना आहे, म्हणूनच लिहिलंय) निसर्गाची अमाप उधळण असलेली ही इटुकली पिटुकली बेटं. प्रत्येक बेट स्वतंत्र देश आहे. पण केवळ क्रिकेटच्या पटावर ते देशपण बाजूला ठेवून एकत्र येतात आणि वेस्ट इंडिज म्हणून खेळतात. बकासुरी आहार, पोलादी शरीरबांधणी, मनमौजी आणि अतरंगी व्यक्तिमत्त्वं ही वेस्ट इंडिजच्या खेळाडूंची ओळख. समुद्राची गाज सदैव सोबतीला असल्याने त्यांची मनंही विशाल. कपट, द्वेष, आकस, चिडखोरपणा हे दुर्गण त्यांच्या सिस्टममध्येच नाहीत. स्लेजिंग त्यांच्या तत्त्वात नाही, ते मनमुराद आनंद लुटण्यासाठी खेळतात. जिंकण्यासाठी जीव तोडून खेळतील पण जिंकता आलं नाही तर प्रतिस्पध्र्याबद्दल असूया नाही. मॅचचं काही होवो ते बेभान नाचतात. वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तानकडून हरल्यावरही त्यांचं नाचणं थांबलं नाही. कलियुगात स्ट्रेसबस्टर म्हणून नाचायला सांगतात. वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना पाहून त्यांना स्ट्रेस येतो असं वाटत नाही किंवा सतत नाचत असल्यामुळे स्ट्रेसच पळ काढत असावा. डम शेराजमध्ये शिक्षा म्हणून नाचायला सांगितलं तर आपण एकदम एम्बॅरेस वगैरे होतो. संकोच, भीड या टम्र्स वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना ठाऊक नाहीत. म्हणाल तिथे, म्हणाल तितक्या लोकांसमोर ते बिनधास्त नाचतात. आणि हो अभिनेत्रींना डान्स येणं मस्ट करून पुरस्कार सोहळ्यात नाचायला सांगतात तसलं नाचत नाही वेस्ट इंडिजचे प्लेयर्स. तालासुरात, ठेक्यावर नाचतात. एका पायात गुलाबी रंगाचा शूज आणि दुसऱ्यात पांढऱ्या रंगाचा असे प्रयोग तेच करू शकतात. भल्यामोठय़ा शेतात मधला पट्टा खास पिकासाठी राखून ठेवावा तसं बाकी टक्कल आणि मध्येच ब्राऊन रंगाची केसांची स्ट्रिप अशी हेअरस्टाइल त्यांनाच सूट होऊ शकते.

यंदा त्यांनी अंडर १९ वर्ल्डकप, वुमन्स ट्वेन्टी-२० वर्ल्डकप आणि मेन्स ट्वेन्टी-२० वर्ल्डकप अशा तिन्ही टायटल्सवर नाव कोरलं. एवढं मोठं टायटल स्वीकारताना जनरली पॉलिटिकली करेक्ट बोलतात माणसं. पण कर्णधार डॅरेन सॅमीने शिष्टाचाराची रूढ चौकट तोडली. तो बोलला त्याची सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे. तो म्हणाला, ‘आमच्या बोर्डाची आर्थिक स्थिती खंगाळ आहे. मानधनाच्या मुद्दय़ावरून स्पर्धेतून माघार घेण्याचा विचार होता. कशीबशी संघाची मोट बांधली. बोर्डाने काहीही सहकार्य केलं नाही. भारतात येण्यासाठी पुरेसे पैसेही नव्हते. कोलकात्यात दाखल झालो तेव्हा जर्सीही नव्हती. आमचा मॅनेजर नवीन होता. त्याने कोलकात्यात जर्सीवर नावं प्रिंट करून घेतली. आमच्या संघात १५ मॅचविनर आहेत याची मला खात्री होती. वर्ल्डकपमधल्या प्रदर्शनाने कॅरेबियनमध्येही क्रिकेटिंग टॅलेंट आहे याची जाणीव जगाला होईल. या तीन जेतेपदांसह कॅरेबियन बेटांवरची क्रिकेट कारभाराची स्थिती सुधारेल अशी आशा आहे. बोर्डाने आम्हाला अपमानित केलं, असंख्य लोकांनी आमच्यावर अर्वाच्य भाषेत टीका केली. पण या सगळ्यामुळेच टीम म्हणून आम्ही घट्ट एकत्र आलो. हे सगळं बोलल्यानंतर माझी संघात पुन्हा निवड होईल की नाही ठाऊक नाही. सर्वप्रकारचे अडथळे पार करत आम्ही हे जेतेपद पटकावलं आहे. जगभरातल्या चाहत्यांच्या शुभेच्छांचं बळ आमच्या पाठीशी आहे. म्हणूनच ही पंधरा माणसं आणि त्यांना साथ देणारा सपोर्ट स्टाफ यांच्यासह हा विजय मी साजरा करणार आहे’. सॅमीच्या उद्गारांनी जगभरातून वेस्ट इंडिजच्या संघाबद्दलचा आदर वाढला. वर्ल्डकप स्वीकारताना या गोष्टी बोलाव्यात का यावर चर्चेची गुऱ्हाळं रंगतील. ‘मॅनेजिंग द केऑस इज की टू विन’ असं महेंद्रसिंग धोनी परवाच म्हणाला होता. सॅमी आणि त्याच्या टीमने ही व्याख्या जगून दाखवली. निखर्वामध्ये डील करणाऱ्या बीसीसीआयच्या टीम इंडियासाठीही ही चपराक पुरेशी ठरावी. वेस्ट इंडिज जिंकल्यावर अनेकांना बरं वाटतं- याचं कारण निर्मळ, निखळ मुक्तछंदी चॅम्पियनपणात दडलंय!