‘मम म्हणा फक्त’ हा वीरधवल परब यांचा कवितासंग्रह लोकवाड्.मय गृह प्रकाशनाने प्रकाशित केला आहे. परिवर्तनशील, पुरोगामी विचारांची पाठराखण करण्याचे ह्य प्रकाशन संस्थेचे धोरण आहे. ह्य संग्रहाच्या निमित्ताने ‘मम’ म्हणायला भाग पाडणाऱ्या बिनचेहऱ्याच्या सुस्त नि चिवट व्यवस्थेविरुद्ध उपहासात्मक रीतीने एल्गार करण्याचा रोकडा प्रयत्न शिक्षक असलेल्या ह्य कवीने केला आहे. आसपास दिसणाऱ्या भयाण विसंगतीवर, कुरुप विस्कटलेपणावर, निखालस दांभिकतेवर, पोसलेल्या भ्रष्टाचारावर, अघोरी अंधश्रद्धांवर आणि वर्ग-वर्णव्यवस्थेतून येणाऱ्या अन्यायावर कवीने त्याच्या रोखठोक भाषेत कोरडे ओढले आहे. कधी उपहास, उपरोध, प्रहार, पर्दाफाश तर कधी श्लेष, कानपिचक्या, मर्मावर बोट ठेवत परब यांनी आपल्या आतली घनघोर तगमग व्यक्त केली आहे. त्यात व्यवस्थेतील विरूपता जावी, ही तळमळ आहे. कधी प्रमाणित मराठी, कधी ग्रामीण बोली तर कधी कोंकणी बोलीतील ही कविता आहे. कवीच्याच शब्दांत- चांगल्या कवितेच्या शक्यतेसाठी अनुभूतीच्या तळापर्यंत स्वत:ला खोलवर खणत जावं लागतं, ह्यची प्रचीती देणारी..
गाववस्तीवरच्या अंधश्रद्धा, भाबडय़ा वातावरणात वारूळ बनून बसलेल्या आदिमाया मूळ भूमिकेविषयीची पहिलीच कविता श्रद्धांच्या सांकेतिक धूसरतेत हळूहळू पराकोटीचा बकालपणा कसा येतो, हे अधोरेखित करते. आदिमाया मूळ भूमिका म्हणजे जणू माती आहे, जणू स्त्री आहे, जणू ती अफूच्या गोळीसारखी अंधश्रद्धा आहे, जणू माणसाच्या नाडय़ा आवळणारी व्यवस्था आहे! ह्य साऱ्या अस्वस्थतेत ‘तत्त्वांचा एक पोलादी कण होऊन सारखा ठिसूळपणा रोखण्याची पराकाष्ठा करत एकमेव निर्णायक असते ती-कविताच असते एकमेव विश्वासार्ह. पण दुसऱ्या क्षणी कवितेतून व्यक्त होण्यातले फोलपणही तो नजरेआड करू शकत नाही-
‘‘कविता काही कामाची नसते
किंवा चार शहरी लोकांची असते कविता
मंडपाबाहेरचे हजार लोक
बाहेरूनच वाजवत असतात
कवितेसाठी टाळ्या
त्यांना फारसं काही ऐकू गेलेलं नसतंच!’’
आजकाल अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणणारे प्रसंग घडत असल्याने कधी कधी डझनच्या डझन कागद असूनही कवीची एकही कविता लिहून होत नाही. कागदी घोडय़ांना नाचवत तयार केलेले अहवाल नि श्वेतपत्रिकांच्या गदारोळात जगण्यातली अटळ-तात्कालिक निर्थकताच उतरून येते! माणसाच्या आशा-आकांक्षा, सुख-दु:ख यांबद्दल निर्जीव कागद अनभिज्ञ असतात. सवंग असूनही टाळ्या घेत मिरवणाऱ्या बकवास कवितेची तो यथेच्छ टर उडवतो. असे असले तरी कवितेतून व्यक्त होण्यातली अटळता कवी मान्य करतो. कवी लिहितो, ‘‘कागदांवर असतो एक अदृश्य दाब.. एक मजबूत पकड.. ज्यामुळे असतात ते ढिम्म नि दिड्.मूढ.’’ स्पष्ट न बोलण्याऱ्या, काठ वारंवार बदलणाऱ्या नि व्याकूळ-बिकूळ होणाऱ्या कवीची टिंगल करत कवी म्हणतो, ‘‘सरकार तर कवीला आणि कागदांना माचिस इतकंही स्फोटक मानत नाही हल्ली.’’
कवीला समाजडोलाऱ्याखाली खचलेल्या, दबलेल्या कष्टकरी माणसांचे जीवन कवितेत मांडायचे आहे. आरोग्य, जीवनशैली, सरकारी योजना ह्यविषयी अनभिज्ञ असणाऱ्या ह्य असंख्य उपेक्षित लोकांविषयीचे वास्तववादी चित्रण करणाऱ्या कविता संवेदनेचा तळ ढवळून काढतात. सामाजिक विस्कटलेपणावर डगमगत्या बैठकीवरली आपली टिचभर कविता काय करणार? ही हतबलता कवीला जाणवते. जिवावर उदार होत कष्ट उपसणाऱ्यांविषयी कवी म्हणतो-
‘‘ठाऊक आहे का त्यांना समतोल आहार?
किती कॅलरीज खर्च झाल्या तर किती घ्यायच्या पुन्हा?
कोणतं सनक्रीम
डांबरात करपलेलं आयुष्य
धुऊन काढण्यासाठी
कोणता हँडवॉश
कोणता शँपू वापरायचा?’’
ह्य प्रश्नाला बगल देत प्रगती करणाऱ्या वरच्या थरावर बसून कवितेच्या प्रसवाचे उमाळे काढण्यातला पोकळपणा कवीला आणि पर्यायाने वाचकालाही बेचैन करतो. अशा विषम परिस्थितीत साहित्य संमेलन नामक महाजत्रेतील धुरळा नि पोकळ महिरपींचा बडेजाव सांभाळण्याची अहमहमिका पाहून कवीच्या उपहासाला अधिकच धार येते-
‘‘स्वगतासारखं बोलता बोलता
अध्यक्षीय भाषण पडलं हातात
त्यात अनुल्लेखानं मरण्याची भीती होतीच
ती खरी ठरली साक्षात
मग हे संमेलन
फारसं मनावर घ्यायचं नाही म्हणत
मी केला गुळमट एल्गार!’’
कवी समाजवादी चळवळीला जोडलेला आहे. वर्ण-वर्गाच्या उतरंडीतून निर्माण झालेल्या व्यवस्थेला तो थेट प्रश्न विचारतो. विचारांचे कंगोरे, पापुद्रे, टोकं घासून गुळगुळीत करून मऊ-सुरळीत केल्या गेलेल्या स्थिर, पण मिळमिळीत आयुष्याला तो बोल लावतो. स्वत:स कुठं रुजवायचं, कुठं छाटायचं हे जबरदस्तीने करायला लावणाऱ्या अनाम सामाजिक रेटय़ाचे काय करायचे, हे तो कवितेतून विचारतो-
‘‘खरं तर
आपण एका ऊध्र्वमूल संहितेचे हुबेहूब वारसदार
किंवा तिर्यकाच्या खांद्यावर अडकून पडलेल्या कोळिष्टकाचा
आपला आपल्यालाच न कळलेला व्यर्थ बडिवार.’’
‘ताजे वाटत नाही हल्ली’ ह्य कवितेतून आधुनिक, कृत्रिम, प्रदूषित यंत्रयुगातील मरगळ नि बथ्थडपणा कवी दाखवतो. असे नि तसे कसेही जगू न देणाऱ्या सामाजिक दबावामुळे रोगट झालेल्या हवेतील घुसमट हाही कवितेचा विषय होतो. ध्यान, समाधी तसेच विशिष्ट परंपरा यांच्या भ्रामक नि दांभिक मायाजालात न फसता कठोर नि विवेकी वास्तवाचे बोट धरण्याचे धारिष्टय़ ‘सुषुप्ती’ व ‘निराकाराच्या दिशेनं तसूभर तरी’ ह्य कविता देतात.
महात्मा गांधीजींच्या विचारातील मूळ गाभा गमावलेले सांगाडे, त्यांच्या वस्तू सांभाळण्यासाठी प्रचंड खर्च करणारे अनुयायी, गांधी जयंतीचे कृतक औचित्य, त्यातील कालबाता, त्याचा ‘इव्हेन्ट’ करणारे संधीसाधू यांविषयीच्या उपहासात्मक कविता विषण्ण करणाऱ्या आहेत. कवी शिक्षक आहे. शिक्षकी पेशातील परिस्थितीशरण असहायता आणि चांगला माणूस घडवण्यात ‘नापास’ होण्यातले भकासपण कवी काही कवितांतून मांडतो. आपण कामचलाऊ, लेचापेचा, गयावया टाइपचा, ‘जी हाँ जी हाँ’ करणारा, भूमिकाहीन सामान्य माणूस असल्याचे कवी घोषित करतो. निगरगट्ट सरकारच्या अनागोंदी कारभारावर, निवडणुकीतील लॉटरीवर, गेंडय़ाची कातडी पांघरणाऱ्या मंत्र्यांवर उपहासाचे शिंतोडे उडवतो. यंत्रयुगातील तथाकथित प्रगतीमुळे विस्थापित होणारी गावं, माणसं नि त्यांचा क्षीण विरोध हाही कवितेचा विषय आहे. ‘तुम्ही मम म्हणा फक्त’ ही कविता निरुपाय माणसाचं बधिरपण वर्णन करते. श्रद्धा-अंधश्रद्धांचा बागुलबुवा करून भोळ्याभाबडय़ांना त्याचं भय दाखवणाऱ्या मतलबी व्यवस्थेचे यथासांग उपरोधी वर्णन त्यात आहे. ‘मी पळालो कळण्यातून’ मध्येही समजून घेण्याच्या भानगडीत न पडता वरचेवर जगणाऱ्यांचे कोंकणी बोलीत भकास चित्रण आहे. ‘आता उठवू सारे रान’ ह्य साने गुरुजींच्या कवितेचा शब्दश: अर्थ काढून कृतीत उतरवण्याचा संकेत खूप भयप्रद आहे. ‘माणसं टाळतात एकमेकांना’ हे शीर्षकच बोलके आहे. ‘श्री हुच्च केंद्रविकेंद्रीकरण प्रथमोध्यायम्’ अशा विचित्र शीर्षकाची संग्रहातील शेवटची प्रदीर्घ कविता विरामचिन्हांचा मुलाहिजा न बाळगता अखंडपणे सरकत राहते. कमालीचा उपहास, रांगडी (शिवराळसुद्धा) भाषा थेटपणे भिडते. दांभिकता, जाती-पातींचं राजकारण, फोल ठरलेले व बासनात गुंडाळलेले विविध वाद (इझम्स), बेगडी उमाळ्यांचा ऊत आणत पोकळ हवा करणाऱ्या ढोंगी नेत्यांचा पर्दाफाश करणारी ही प्रदीर्घ कविता मुळातून वाचायला हवी.
वीरधवल परब यांच्या सगळ्या कविता मुक्तछंदातील असून त्या विमुक्तपणे व्यक्त होतात. त्यात उपहास नि सूचकता भरपूर आहे, पण सांकेतिकता नाही. परंपरा आणि आधुनिकता यात भरडणाऱ्या काळाचं विस्कटलेपण त्यात आहे. विसंगती आणि विषमता यांतून फोफावलेल्या अन्यायकारक गोष्टींचा उघडपणे तीव्र निषेध करणारी आहे. पुस्तकाच्या ब्लर्बवर कवी सतीश काळसेकर यांनी म्हटल्याप्रमाणे- ‘खासगी आणि सार्वजनिक आयुष्य यांतील भेदरेषा पूर्णत: मिटवून त्यातून एकरस वर्तमान निर्माण होण्याची अद्भुत किमया या कवितेत घडली आहे.’’
‘मम म्हणा फक्त’-
वीरधवल परब,
लोकवाङ्मयगृह प्रकाशन, मुंबई
पृष्ठे- ११२, किंमत- १५० रुपये
ashleshamahajan@rediffmail.com

What Prakash Ambedkar Said?
प्रकाश आंबेडकरांचा दावा, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं काम संपलं आहे, पुढच्या दोन महिन्यांत…”
nashik, Fraud Case Registered Against Panjarpol , Nashik Panjarpol Sanstha Managers, Forged Letter, Allegedly Signed by Chief Minister, land acquisition panjrapole nashik, panjrapole nashik fraud, forged letter cm eknath shinde,
भूसंपादन प्रकरणात मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीचे बनावटपत्र, श्री नाशिक पंचवटी पांजरपोळ पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा
dr babasaheb ambedkar
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दुर्मीळ पत्रे, लेख यांचे प्रदर्शन
CET Cell, Reschedules Entrance Exams, for Third Time, lok sabha 2024, elections, Releases Revised Schedule, marathi news,
विविध प्रवेश परीक्षांच्या वेळापत्रकात पुन्हा बदल, सीईटी सेलकडून सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध