स्पेनमधील पूर्वेकडच्या कॅटलोनिया या समृद्ध प्रांताला स्वातंत्र्य हवे आहे. त्यासाठी नुकताच जनमताचा कौल घेण्यात आला. त्याला सरकारने, तेथील काही राजकीय पक्षांनी विरोध केला. अखेर मतदानाच्या दिवशी फुटीरतावादी आणि स्पेनचे लष्कर यांच्यात जोरदार चकमकी झाल्या. आजही तो उद्रेक शमलेला नाही. मुळात कॅटलान स्वातंत्र्याचा हा संघर्ष केवळ राजकारणाच्या मैदानावरच सुरू नाही. फुटबॉलच्या मैदानातही तो सातत्याने दिसत आहे.. त्याबद्दल.. 

स्पेनमधील बार्सिलोना शहरातील एफसी बार्सिलोना फुटबॉल क्लबचे कॅम्प न्यू स्टेडियम. ७ ऑक्टोबर २०१२ चा दिवस. ९८ हजार क्षमतेचे स्टेडियम प्रेक्षकांनी खचाखच भरलेले. जगभरातील ४०० दशलक्ष प्रेक्षक टेलिव्हिजन संचांसमोर खिळलेले. पारंपरिक प्रतिस्पर्धी एफसी बार्सिलोना (बार्सा) आणि रिअल माद्रिद या संघांमधील फुटबॉल सामना रंगलेला. खेळ सुरू होऊन बरोबर १७ मिनिटे आणि १४ सेकंद होताच आपल्या लाडक्या बार्सा क्लबच्या खेळाडूंचा उत्साह वृद्धिंगत करण्यासाठी उपस्थित राहिलेले हजारो चाहते अचानक उठून उभे राहिले आणि ‘इन, इंडे, इन्डिपेन्डेन्शिया’ (इन्डिपेन्डन्स – स्वातंत्र्य) अशा आशयाच्या घोषणा देऊ लागले. काही कळायच्या आत मोठय़ा आकाराचे पिवळ्या पाश्र्वभूमीवर चार लाल पट्टय़ा असलेले ‘सेन्येरा’ आणि त्याच्या सोबतीला निळ्या त्रिकोणात पांढरा तारा असलेले ‘इस्टेलेडा’ ध्वज यांनी सारे स्टेडियम व्यापून टाकले. एका सुरातील घोषणांनी सारा आसमंत दुमदुमला. ही ‘अल क्लासिको’ नेहमीपेक्षा वेगळीच ठरली. एफसी बार्सिलोनाचे ‘मोअर दॅन अ क्लब’ हे ब्रीदवाक्यही सार्थ ठरले. त्यापुढे रिअल माद्रिदच्या ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि बार्साच्या लिओनेल मेसी यांनी प्रत्येकी दोन गोल करून खेळात साधलेली बरोबरी गौण ठरली. आता गेल्या पाच वर्षांत बार्सिलोनाच्या समर्थकांसाठी ही नित्याचीच बाब झाली आहे. कॅम्प न्यूवर त्यांच्या संघाचा सामना कोणाहीबरोबर असो, १७ मिनिटे आणि १४ सेकंदांनी होणाऱ्या घोषणा आणि फडकणारे झेंडे या गोष्टी ठरलेल्याच.

रिअल माद्रिद आणि एफसी बार्सिलोना या दोन्ही क्लबमधील पारंपरिक ‘खुन्नस’ माहीत असलेल्या अनेक प्रेक्षकांनाही १७ मिनिटे, १४ सेकंदांनी घडत असलेल्या या नाटय़ामागील कारण माहीत नसते. त्याचे मूळ आहे स्पेनच्या इतिहासात. आजच्या स्पेनच्या ईशान्येला कॅटलोनिया नावाचा लहानसा पण समृद्ध प्रदेश आहे. त्याचे मुख्य शहर बार्सिलोना. हा प्रदेश पूर्वी स्वतंत्र होता. स्पेनने ११ सप्टेंबर १७१४ साली कॅटलोनिया जिंकून घेतला. या प्रदेशाचे नागरिक, त्यांची स्वतंत्र भाषा व संस्कृती यांचे कायम दमन झाले. आता कॅटलोनियामध्ये स्वातंत्र्याची आकांक्षा जोर धरू लागली आहे. त्यामुळे १७१४ साली गमावलेले स्वातंत्र्य परत मिळवण्यासाठी कॅटलान नागरिक बार्सिलोना क्लबच्या प्रत्येक सामन्यात १७ मिनिटे आणि १४ सेकंदांनी स्वातंत्र्याच्या घोषणा देतात.

स्पेनमध्ये १९३९ ते १९७५ या काळात जनरल फ्रान्सिस्को फ्रँको यांची लष्करी हुकूमशाही होती. त्या काळात तर कॅटलान भाषेत बोलणेही अपराध होता. जे काही कॅटलान आहे त्याला स्पेनमधील हुकूमशाही राजवटीकडून विरोध व्हायचा. कॅटलान नागरिकांना त्यांची अस्मिता प्रकट करण्यासाठी कोणतेच क्षेत्र उपलब्ध नव्हते. अशा परिस्थितीत कॅटलान जनतेला त्यांच्या असंतोषाला वाट मोकळी करून देण्यासाठी फुटबॉलच्या मैदानाशिवाय पर्याय नव्हता. म्हणूनच कॅटलोनिया प्रांताची राजधानी असलेल्या बार्सिलोना शहराच्या नावाच्या फुटबॉल क्लबला वाढता पाठिंबा मिळत गेला. त्याविरुद्ध उरलेल्या स्पेनचा – म्हणजे राजधानीचा -रिअल माद्रिद क्लब असे समीकरण रूढ होत गेले. या दोन्ही फुटबॉल क्लबमधील चढाओढीमागे हे राजकीय कारण आहे. जनरल फ्रँको यांचा १९७५ साली मृत्यू झाल्यानंतर बार्सिलेना क्लबच्या चाहत्यांना काही प्रमाणात मोकळेपणाने भावना व्यक्त करता येऊ लागल्या. त्याचे प्रतिबिंब पुढील सामन्यांदरम्यान पडत गेले. कॅटलान नागरिकांसाठी एफसी बार्सिलोना हा केवळ एक फुटबॉल क्लब नव्हता, तर त्यांच्या असंतोषाला वाट मोकळी करून देणारे ते एक व्यासपीठ होते. म्हणूनच क्लबचे ब्रीदवाक्य आहे ‘मोअर दॅन अ क्लब.’

स्पेनच्या एकूण क्षेत्रफळात कॅटलोनियाचा वाटा केवळ ६.३ टक्के, लोकसंख्येतील वाटा १६ टक्के. मात्र स्पेनच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात कॅटलोनियाचा वाटा २० टक्क्यांहून अधिक, देशाच्या निर्यातीत २५.६ टक्के हिस्सा. स्पेनमध्ये येणाऱ्या परदेशी पर्यटकांपैकी २३.८ टक्के कॅटलोनियात येतात. तर देशात होणाऱ्या एकूण थेट परदेशी गुंतवणुकीपैकी २९.२ टक्के कॅटलोनियात होते. पण कॅटलान नागरिकांची तक्रार अशी आहे, की ते केंद्र सरकारला जेवढा कर भरतात त्यापेक्षा बराच कमी परतावा त्यांच्या वाटय़ाला येतो. कॅटलोनियाला स्पेनअंतर्गत बरीच स्वायत्तता आहे. त्यांची वेगळी प्रांतिक संसद व सरकार आहे. मात्र आता तेवढय़ावर समाधान मानण्यास ते तयार नाहीत. १ ऑक्टोबर २०१७ रोजी त्यांनी स्पेनमधून बाहेर पडण्यासाठी सार्वमत घेतले. त्यात केवळ ४२ टक्के नागरिकांनी भाग घेतला. त्यापैकी ९० टक्के मतदारांनी स्वातंत्र्याच्या बाजूने कौल नोंदवला. पण स्पेनच्या सरकारने हे सार्वमत अवैध असल्याचे सांगून फुटीर कारवायांना आळा घालण्याचा निर्धार व्यक्त केला.

राजकारण आणि खेळ यांची गल्लत करू नये म्हणतात. पण प्रत्यक्षात ते जमतेच असे नाही. त्यामुळेच एफसी बार्सिलोना आणि रिअल माद्रिद यांच्यातील लढती केवळ सामना न राहता ‘अल क्लासिको’ म्हणून ओळखल्या जातात आणि भारत-पाकिस्तान क्रिकेट सामने युद्धाचे स्वरूप धारण करतात. मात्र खेळ केवळ देशांना तोडतात असेच नाही तर काही वेळा ते बंध सांधण्याचेही काम करतात. अमेरिका आणि चीनमधील ‘पिंग-पाँग डिप्लोमसी’ हे त्यांचे चांगले उदाहरण आहे. १९७० च्या दशकाच्या सुरुवातीला अमेरिका व चीनमध्ये टेबल टेनिस खेळाडूंचे आदानप्रदान वाढल्याने तत्कालीन अमेरिकी अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्या बीजिंग भेटीचा मार्ग प्रशस्त झाला होता. खेळातील सांघिक भावनेला महत्त्व देऊन देशाची एकत्र उभारणी करायची की ईर्षेचे पारडे वरचढ होऊ देऊन सवतासुभा मांडायचा हा ज्या-त्या देशाने उमगून घेण्याचा प्रश्न आहे.