ती कोण, हे आपल्याला आठवतंय..ती शूर होती, हेही. पण तिचा धीर, यातनांच्या गर्तेतील तिची झुंज अगदी जवळून पाहिलेले लोक थोडे आहेत.. त्या थोडय़ांशी ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या पृथा चटर्जी यांनी संवाद साधला. साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी केलेला त्या लेखाचा हा अनुवाद, तिच्या हृदयाची धडधड थांबली त्याला आज एक वर्ष पूर्ण होतंय, त्या निमित्तानं ..
१६ डिसेंबर २०१२ ला रात्री ११ वाजायच्या सुमाराला त्या २३ वर्षीय मुलीला अत्यंत व्यस्त आणि गजबजलेल्या सफदरजंग हॉस्पिटलमधल्या इमर्जन्सी वॉर्डात आणण्यात आलं. ती जखमांनी ग्रस्त होती. तिच्या अंगातून अखंडपणे रक्त वाहत होतं. शुद्धीतून बेशुद्धी आणि उलट असं तिचं सारखं चाललेलं होतं. त्या गोठवून टाकणाऱ्या हिवाळ्यातल्या रात्री तिच्या गारठय़ानं कुडकुडणाऱ्या कुडीभोवती फक्त एक सुती वस्त्र गुंडाळलेलं होतं. तिला झोपवलेल्या खाटेभोवती तातडीनं हिरवे पडदे लावले गेले. तिच्या अंगाभोवती इस्पितळातील वस्त्रे गुंडाळण्यात आली. पहिला डॉक्टर तिथं हजर होईस्तोवर इतकं करण्यात आलं. जिचं माध्यमांनी नंतर ‘निर्भया’ असं नामकरण केलं, ती दिल्ली सामूहिक बलात्कारात बळी पडलेली मुलगी नंतर ११ दिवस तिथं राहून मृत्यूशी झुंज देणार होती. आणि नंतर सिंगापूर येथील माउंट एलिझाबेथ इस्पितळात हलविण्यात येणार होती.
आता या घटनेला वर्ष उलटल्यावरही सफदरजंगमधले डॉक्टर त्या मुलीला विसरू शकलेले नाहीत. ‘‘तिचा एक्स-रे पाहिल्यासरशी आम्हाला तिच्यावरच्या हल्ल्याच्या तीव्रतेची जाणीव झाली. आम्ही अशा केसेसमध्ये नेहमी घेतो तसा तिच्या ओटीपोटाचा एक्स-रे घेतला. तो पाहिल्यावर आम्हाला तीव्र धक्का बसला. कारण त्यात तिची आतडीच दिसत नव्हती. तिच्या आतडय़ांचं काय झालं असेल-म्हणजे ती कशी नाहीशी झाली असतील याची कल्पनाच मला करता येईना. ‘इथल्या एक्स-रे मशीनची दुरुस्ती करण्याची गरज दिसतेय किंवा माझ्या दृष्टीत काही तरी घोटाळा दिसतोय’, असं त्या वेळी मनात आल्याचं मला अगदी ठळक आठवतं.’’ तिच्यावर उपचार करणाऱ्या अगदी आरंभीच्या गटातील डॉक्टरांपकी एक असलेल्या डॉक्टरांना ठळक आठवतं. साधारण प्रौढ स्त्रीचं आतडं सामान्यत: २० ते २२ फूट लांबीचं असतं. या एक्स-रेत ही लांबी जेमतेम दोन ते तीन इंच होती.
नंतर वरिष्ठ सर्जन-शस्त्रक्रियाविशारदांना पाचारण करण्यात आलं. तिच्यावर तातडीनं शस्त्रक्रिया करण्यात आली. तिच्या शरीराच्या आतल्या भागातील जखमांची तपासणी करण्यासाठी.
त्या तीन तास चाललेल्या शस्त्रक्रियेच्या अंती म्हणजे १७ डिसेंबरच्या पहाटे दोन वाजता लक्षात आलं की तिच्यावर झालेल्या हल्ल्यात तिची आतडी बाहेर ओढून काढण्यात आलेली आहे. त्या वेळी तिच्या प्रकृतीचं प्रारंभिक निदान करताना, ‘हा नुसता लैंगिक अत्याचार नव्हे, हे त्यापेक्षा अधिक निर्घृण कृत्य आहे,’ असं ज्यांना जाणवलं होतं ते स्त्रीरोगतज्ज्ञ सांगतात, ‘बलात्काराच्या घटनेत-अगदी सामूहिक बलात्काराच्या कृत्यातसुद्धा फार तर जननेंद्रिय फाटणे किंवा तत्सम गोष्टी सामान्यत: आम्हाला दिसतात. अर्थात त्या जखमासुद्धा फार गंभीर, हादरवून टाकणाऱ्या आणि शक्तिपात करणाऱ्याच असतात. पण जिथं स्त्रीची सारी आतडीच ओढून काढण्यात आलेली आहेत, अशी ही घटना आम्ही याआधी कधीही पाहिलेली नव्हती. आमचं गायनॉकॉलॉजी डिपार्टमेंट पुष्कळ मोठं आणि जुनं आहे. तरीही या प्रकारची केस याआधी आमच्यासमोर आलेली नव्हती.’
त्या नंतर डॉक्टरांनी तिच्यावर पाच शस्त्रक्रिया केल्या. तिच्या शरीरातील जंतुसंसर्ग रोखण्यासाठी. ‘ते प्रयत्न केवळ असाधारण होते.. अन् त्यामुळंच, ‘तिला आम्ही वाचवू शकलो नाही’ या वास्तवानं आमच्या मनात एक फार अस्वस्थ करणारी पोकळी निर्माण झाली’ वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. बी.डी. अथनी म्हणाले.
डॉक्टरांना तिची लढाऊ वृत्ती विशेषकरून आठवते. ‘पहिल्या शस्त्रक्रियेनंतर तास-दोन तासांतच ती शुद्धीवर आली होती. अन् तेव्हा तिनं तिचा मोबाइल फोन आणि क्रेडिट कार्ड यांच्याविषयी चौकशी केली होती,’ एक नर्स म्हणाली.
तिनं न्यायाधीशांसमोर तिचा जबाब दोनदा नोंदवला. साऱ्या घटनेचा वृत्तान्त अगदी सविस्तर स्पष्ट शब्दांत तिनं कथन केला. एका भूलतज्ज्ञांना आठवतं, ‘दुसऱ्यांदा तिचा जबाब नोंदवला जात असताना तिची प्रकृती ढासळू लागली होती. तिच्या रक्तात अतोनात जंतुसंसर्ग होऊ लागला होता आणि तिला कावीळ झाली होती. तिला कृत्रिम श्वासोच्छवासाची मदत देण्यात आलेली होती. झालेल्या घटनेविषयी शासन आणि आमचे डिपार्टमेंट यांच्यात मतभेद झालेले आहेत. म्हणून आम्हाला तिचा जबाब पुन्हा नोंदवण्याची गरज आहे, असं पोलीस म्हणाले आणि त्यांनी ते चालू ठेवलं, तेव्हा आम्ही फार भडकलो होतो,’ ते म्हणाले.
तिच्यावर उपचार करणाऱ्या १०-१२ डॉक्टरांना आणखी काही गोष्टी आठवतात. उदाहरणार्थ, स्पष्ट बोलण्याइतकी ताकद हरपत चालल्यावर कशा तिनं तिच्या हाताने कागदांवर एकेक-दोनदोन ओळींच्या सूचना तिच्या कुटुंबीयांसाठी लिहिल्या. शुद्ध हरपतानाची झापड डोळ्यांवर येत असताना तिनं आपल्या आईचा हात स्वत:च्या हातात कसा घट्ट पकडून ठेवला आणि फोरेन्सिक एक्स्पर्ट किंवा पोलीस डिपार्टमेंटचे फोटोग्राफर तिच्या गुप्तांगावरील आणि इतरत्र झालेल्या जखमांच्या खुणांचे फोटो घेत असताना तिनं केलेलं केवळ असाधारण सहकार्य.
‘फोटोग्राफर आला तेव्हा तिची आई अतोनात संतापली होती. पण तिनं आपल्या आईला शांत केलं. ती फार असाधारण धर्य असलेली, फार शूर मुलगी होती. तिला आणि तिच्या कुटुंबीयांना मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही दोघा मानसोपचारतज्ज्ञांना बोलावलं. तेव्हासुद्धा तिची प्रतिक्रिया अत्यंत सकारात्मकच होती. तेव्हा ती स्वत:च्या ‘फिजिओथेरपी’च्या शिक्षणासंबंधीसुद्धा बोलली,’’ एका डॉक्टरांना आजही आठवतं.
२५ डिसेंबरच्या रात्री तिला हृदयक्रियेचा झटका आला. तिची हृदयक्रिया बंद पडली. त्यात चेतना निर्माण करण्यासाठी दोन मिनिटे प्रयत्न केल्यावरच तिच्या हृदयाचे ठोके पूर्ववत झाले. त्या वेळी तिच्यासाठी केलेल्या प्रार्थना आणि तिची हृदयक्रिया सुरू झाल्यावर एकमेकींना मारलेल्या मिठय़ा, हे तिथल्या नस्रेसना आजही आठवतं. ‘त्यानंतर पुन्हा ती शुद्धीवर आलीच नाही. तिच्या मेंदूला होणारा प्राणवायूचा पुरवठा बराच काळ ठप्प झाला होता. आणखी एक दिवसानंतर तिला सिंगापूरला हलवण्यात आलं, तेव्हाही ती बेशुद्धच होती,’  एक भूलतज्ज्ञ सांगतात. तिला सिंगापूरला हलवताना व्हीआयपींच्या ताफ्यात एकाऐवजी दोन एकसारख्याच गाडय़ा असतात त्याप्रमाणे दोन रुग्णवाहिका तयार ठेवणं आणि तिच्या पासपोर्टसाठी आवश्यक म्हणून तिचा फोटो काढण्यासाठी बुरखा घातलेल्या स्थितीत एका फोटोग्राफरला ‘आयसीयू’त पाठवणं अशा गोष्टींचा समावेश होता.
वर्षभरानंतर उरतं काय? ‘रुग्णालयाच्या िभतींच्या बाहेर निदर्शनं चालू होती आणि आत इथं आम्ही आमची लढाई लढत होतो. तिची टिकाव धरण्याची असाधारण वृत्ती, तिचं चिवटपण आमच्या प्रेरणास्थानी होतं. आपण हतबल आहोत, आपण काहीही करू शकत नाही आहोत असं मनात आलं की आम्ही प्रार्थना करायला लागत असू,’ ही एका नर्सची आठवण.. आजही.