चिली या देशातील सपाट वाळवंटातील दुर्बिणीने पृथ्वीच्या आकाराएवढय़ा तीन ग्रहांचे दर्शन यापूर्वी दिले होते. बेल्जियमच्या लीग विद्यापीठातील मायकल गिलॉन यांच्या चमूने हे ग्रह शोधले. त्यानंतर गेल्या २३ फेब्रुवारी रोजी ‘नासा’च्या स्पिट्झर अंतराळ दुर्बिणीद्वारे अन्य चार ग्रहांना शोधण्यात यश आले. एकूण हे सात ग्रह. त्यांच्या समूहाला ‘ट्रॅपिस्ट १’ असे नाव देण्यात आले. त्यातील तीन ग्रहांवर जीवसृष्टी असण्याची शक्यता आहे. ‘नेचर’ या नियतकालिकामध्ये याबाबतचे संशोधन प्रसिद्ध करण्यात आले आहे.

पृथ्वी.. ती एका आकाशगंगेचा – ‘मिल्की वे’चा भाग.. अशा असंख्य आकाशगंगा एका विश्वात सामावलेल्या. हे विश्वही कसे, तर सतत प्रसरण पावणारे.. पण ते प्रसरण पावत असेल, तर ते कशामध्ये? हे विश्व कशामध्ये आहे? त्यात आपल्यासारखे आणखी कोणी आहे का? नसतील तर का नाही? असतील तर कुठे आहेत? असंख्य प्रश्न. मस्तक सुन्न करणारे. गेल्या अनेक शतकांपासून तत्त्वज्ञ आणि वैज्ञानिक त्यांची उत्तरे शोधत आहेत. त्या उत्तरांकडे घेऊन जाणारी एक इवलीशी पायवाट नुकतीच खगोलशास्त्रज्ञांना सापडली. तो शोध होता पृथ्वीसारख्याच सात ग्रहांचा. त्या शोधामुळे ‘कोणी तरी आहे तिथे’ या शक्यतेला जोर लाभला आहे. आपल्यापासून  ४० प्रकाशवर्षे दूर अंतरावरील या ग्रहांवर जीवसृष्टी असण्याची शक्यता आहे..

ट्रॅपिस्ट १ची वैशिष्टय़े

’हा ग्रहसमूह पृथ्वीपासून ४० प्रकाशवर्षे दूर आहे. या गुलाबी रंगाच्या ग्रहांचा सूर्य आपल्या आकाशातील सूर्यापेक्षा दसपट अधिक मोठा आहे. हे ग्रह पृथ्वीसारखेच दिसत असून, ते सर्व एकमेकांच्या अगदी जवळ आहेत. ते खडकाळ आहेत. मात्र यातील शेवटच्या ग्रहाच्या वस्तुमानाबाबत माहिती उपलब्ध झालेली नाही. या ग्रहांची एकच बाजू त्यांच्या सूर्याकडे आहे. त्यांचे सूर्यापासूनचे अंतरही अतिशय कमी आहे. हे ग्रह त्यांच्या सूर्याभोवती फिरण्यासाठी १ ते २० दिवस घेतात. आपला सूर्य आणि बुध यांच्यात जेवढे अंतर आहे तेवढय़ा अंतरात हे सात ग्रह बसू शकतात. या ग्रहांच्या अध्र्या भागात कायम अंधार असतो. ग्रहांचे एकमेकांपासूनचे अंतर अतिशय कमी असून, एका ग्रहावरून शेजारच्या ग्रहावरील ढग दिसू शकतात. तेथील हवामान अतिशय वेगळे असून, वादळी वारे आणि सतत बदलते तापमान हे त्याचे वैशिष्टय़ आहे. यातील तीन ग्रहांवर पाणी आणि जीवसृष्टी असल्याचे दिसत आहे.

बिनडोळ्यांचे जीव?

’या सातही ग्रहांवरील तापमान पाण्यास सामान्य स्थितीत ठेवण्यास अनुकूल आहे. ही स्थिती जीवसृष्टी निर्माण होण्यासाठी आदर्श मानली जाते. आपल्या सूर्यापासून मिळणाऱ्या प्रकाशापेक्षा तेथील सूर्यापासून मिळणारा प्रकाश दोनशे पटीने कमी आहे. त्यामुळे या ग्रहांवर जीव असतील तर त्यांची दृष्टिक्षमता अतिशय कमी असेल. अवरक्त किरणांच्या उपस्थितीमुळे त्यांचे डोळे वेगळ्याच पद्धतीचे असण्याची किंवा त्यांना डोळेच नसण्याची शक्यताही आहे.

आता पुढे काय?

  • या ग्रहांच्या वातावरणात प्राणवायू आहे का, असेल तर तो किती प्रमाणात आहे, ग्रहांवर नक्की पाणी आहे का, ते ग्रह बर्फाच्या गोळ्याप्रमाणे असू शकतात का, याचा शोध घेण्यात येणार आहे. मात्र प्राणवायूअभावी समजा तेथे जीवसृष्टी नसल्याचे स्पष्ट झाले, तरी वाईट वाटून घेण्याचे कारण नाही! हे ग्रह अतिशय नवीन आहेत. त्यांचे वय कमी आहे. तेव्हा भविष्यात तेथे जीवन विकसित होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.
  • दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, या नव्या ग्रहांवर मानवजातीस वास्तव्य करण्यायोग्य पर्यावरण असल्याचे दिसत आहे. तेथील हवेमध्ये मिथेन आणि पाणी एकत्रितरीत्या आढळून आले आहे. अर्थात जीवसृष्टी नसली तरी ती निर्माण होऊ शकते. तेव्हा तेथील ही सर्व गुंतागुंत समजून घेण्यासाठी नासा जेम्स वेब अंतराळ दुर्बिणीतून आगामी काळात त्याची पाहणी करणार आहे. २०२३ मध्ये यासाठी आणखी उपकरणांच्या माध्यमातूनही नासा संशोधन करणार आहे.

ट्रॅपिस्ट १हे नाव कसे पडले?

चिली देशाच्या ‘ट्रान्झिटिंग प्लॅनेट्स अँड प्लॅनेटेसिमल्स स्मॉल टेलिस्कोप’ (ट्रॅपिस्ट १) या दुर्बिणीवरून या सात ग्रहांच्या समूहाला हे नाव देण्यात आले.

 

संकलन – चंद्रकांत दडस