महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी आपल्या कारकीर्दीच्या प्रारंभ काळातच बडोदे संस्थानात प्राथमिक शिक्षण सर्वासाठी मोफत आणि सक्तीचे केले होते.  शिक्षण न घेणाऱ्यांना सजा होत असे. त्या वेळी राखीव जागा वगैरे नव्हत्या, पण महाराजांनी दलितांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत याबद्दल आग्रही भूमिका घेतली होती. त्यांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती समारोहाची सांगता उद्या होत आहे. त्यानिमित्त बडोदा येथील ज्येष्ठ विचारवंत दादूमिया यांच्याशी केलेल्या चर्चेतून प्रगल्भ सामाजिक दृष्टीच्या या व्यक्तिमत्त्वाचे उलगडलेले पैलू..
साठ-सत्तरच्या दशकामध्ये पुण्यातून प्रकाशित होणारे साप्ताहिक ‘सोबत’ खूपच आघाडीवर होते. या ‘सोबत’मधून नियमितपणे स्तंभ लिहिणारे वाचकप्रिय लेखक म्हणजे बडोद्याचे दामोदर विष्णू नेने ऊर्फ दादूमिया!
दादूमिया हे एक वेगळेच रसायन आहे. तरुण वयातच मराठी, इंग्रजी, गुजराती अशा विविध भाषांमधून बेधडकपणे पण तितकेच शैलीदार आणि संशोधनावर आधारित लिखाण करणारे दादूमिया हिंदुत्ववादी विचारांसाठी प्रसिद्ध आहेत, पण त्यांच्या मैत्रीचा संचार सर्वदूर! डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याशीही त्यांची मैत्री होती आणि त्या भांडवलावर पं. नेहरूंना सडेतोड प्रश्न विचारणारी मुलाखत घेणारे दादूमिया बाळासाहेब देवरस, बाळासाहेब ठाकरे आणि अटलजींशीही नित्य भेटून गप्पा मारत! त्यांचा इंदिरा गांधींशीही स्नेह होता आणि १९६६ साली त्यांनी इंदिराजींसमोरच्या आव्हानांचे परखड विश्लेषण करणारे एक पुस्तकही लिहिले होते. इंदिराजींना ‘इंदिरा आंटी’ म्हणून संबोधणाऱ्या दादूमियांचा फोन आला आणि तो इंदिराजींनी घेतला नाही असे सहसा झाले नाही. डझनभर पुस्तके नावावर असलेले दादूमिया आज ‘एनसायक्लोपीडिया हिंदुस्थानिका’ या सुमारे १६ खंडांच्या एका कोशनिर्मितीच्या कामात व्यग्र आहेत.
वयाच्या ८४व्या वर्षीही बडोद्यात प्रसूतितज्ज्ञ म्हणून आपली प्रॅक्टिस  सुरू ठेवणारे दादूमिया अस्सल बडोदेकर! त्यांचे आजोबा आणि वडील, दोघेही आपापल्या हयातीत बडोदा-नरेश सयाजीराव गायकवाडांचे सचिव म्हणून काम बघितलेले. साहजिकच ‘गायकवाडी’चा कारभार दादूमियांनी खूप जवळून बघितला, अभ्यासला आणि त्यावर त्यांनी पुस्तकेही लिहिली.
११ मार्च २०१३ हा महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या १५०व्या जयंतीचा दिवस! यानिमित्ताने अलीकडेच बडोद्यात सयाजीराव गायकवाडांच्या आधुनिक विचारसरणीबाबत, दूरदृष्टीबाबत आणि एकूणच कारभारशैलीबाबत दादूमियांशी गप्पा मारण्याची संधी मिळाली. त्याच मुलाखतीचा हा काही भाग-
* सयाजीराव गायकवाडांची स्वराज्य भक्ती, त्यांचा द्रष्टेपणा आणि त्यांची मुत्सद्देगिरी या संदर्भात..
सयाजीराव गायकवाड हे लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर या दोघांचेही निकटवर्ती होते. पुण्यातला गायकवाडवाडा हा मुदलातला सयाजीरावांचा. तो त्यांनी खूप सवलतीच्या किमतीत आणि विलक्षण प्रेमाने टिळकांना विकला. पं. श्यामजी कृष्णवर्मा यांनी सयाजीरावांना मोठी आर्थिक मदत केली. योगी अरविंदही सयाजीरावांच्या सहकाऱ्यांपैकी होते.
भारतीय स्वातंत्र्य-प्रयत्नांच्या इतिहासात १९१५च्या सुमारास, पहिले महायुद्ध संपत असतानाच्या काळात झालेल्या अमृतसर-उठावाचा उल्लेख फारसा कधी येत नाही. या उठावामागे लोकमान्य टिळक, रासबिहारी घोष आणि इतर अनेकांप्रमाणेच सयाजीरावांचेही पाठबळ होते. उठावाच्या नियोजनातील काही उणिवा, काही व्यक्तींचा भोळसटपणा यामुळे हा उठाव होण्याआधीच बारगळला हे खरेच, पण तो यशस्वी झाला असता तर जे ‘युनायटेड स्टेट्स ऑफ इंडिया’ अस्तित्वात आले असते त्याचे परराष्ट्रमंत्री होण्याची कुवत सयाजीरावांमध्ये होती, किंबहुना लोकमान्यांनी त्यांना तसे सांगितलेही होते.
पुढे दुसऱ्या महायुद्धापूर्वी १९३६च्या बर्लिन ऑलिम्पिकसाठी सयाजीराव दस्तुरखुद्द जर्मनीत गेले. आपण पोहोचण्यापूर्वी आपले विश्वासू सहकारी वि. पां. नेने यांना त्यांनी हिटलरची भेट घेण्यासाठी पाठविले होते. ब्रिटिशांच्या विरोधात ‘हिटलरच्या आक्रमणाला भारतातील हिंदू संस्थानिक साथ देतील व त्या बदल्यात हिटलरने भारताच्या स्वातंत्र्य-प्रयत्नांना सर्व प्रकारे सहकार्य करावे’ अशा आशयाचा बडोदा-बर्लिन करार याच भेटीत घडून आला.
आपल्या संस्थानात जे नवे बांधकाम-कंत्राटदार, इमारतीची कामे करीत, त्यांच्याकडून दोन-चार टक्के अधिक रक्कम घेऊन ती देशभरात चाललेल्या क्रांतिकार्याला उपलब्ध करून देण्याचे सयाजीरावांचे धोरण होते.
योगी अरविंदांचे बंधू सयाजीरावांचे निकटवर्ती होते. बडोद्याजवळ, नर्मदेच्या तीरावर गंगनाथ या गावी अरविंदांच्या भावाने ‘सरस्वती मंदिर’ या नावाने राष्ट्रीय विचारांनी प्रेरित असे विद्यालय उघडले होते. या विद्यालयाच्या वसतिगृहाच्या तळघरात क्रांतिकारकांसाठी बॉम्बनिर्मितीचे प्रशिक्षण दिले जाई. बडोद्याच्या ‘कला-भवन’ या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या धातुशास्त्र विभागाच्या मदतीने क्रांतिकार्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बॉम्बचे पितळी कवच तयार करण्यास सयाजीरावांनी पडद्याआडून प्रोत्साहन दिले होते.
*  सयाजीराव गायकवाडांच्या चिंतनातील राष्ट्रीय विचार, त्यांची प्रशासन शैली आणि त्यांच्या लोकहितवादी धोरणांबाबत..
बर्लिन ऑलिम्पिकच्या वेळची गोष्ट आहे. अमरावतीच्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाला या खेळांमध्ये भाग घेण्याची इच्छा होती. सयाजीरावांनी सर्व प्रकारे आर्थिक मदत करून त्यांचे ते स्वप्न तर साकार केलेच, पण अमरावतीच्या चमूने युनियन जॅक नव्हे, तर बडोदे संस्थानचा भगवा झेंडा हातात घेऊन ऑलिम्पिक मैदानात फेरी मारावी असा आग्रह धरला आणि स्वत: लक्ष घालून ते घडवूनही आणले.
सयाजीरावांची प्रशासनावर पूर्ण पकड होती. वर्षांकाठी सहा-सात महिने ते परदेशात किंवा बडोदे संस्थानच्या बाहेर असत, पण तरीही शासन व्यवहाराची घडी विस्कटत नसे. इंग्लंडमध्ये ते जात तेव्हा त्यांच्या हालचालींवर ब्रिटिश सरकार नित्य बारीक नजर ठेवून असे. ब्रिटिश गुप्त पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी ते वेश पालटून फिरत. एकूणच हरून-अल-रशिदप्रमाणे वेषांतर करून आपल्या कारभाराचा चोखपणा तपासण्यासाठी ते प्रसिद्ध होते. अशा भ्रमंतीतून त्यांनी एकदा एक रुपयाची लाच घेणाऱ्या सेवकाला रंगेहाथ पकडले, पण पुढे चौकशीनंतर त्याला शिक्षा करण्याऐवजी कर्मचाऱ्यांचे पगार वाढविण्याची आवश्यकता प्रतीत झाल्यामुळे भरघोस वेतनवाढ जाहीर केली. निराधार वृद्धांसाठी निवारे असायला हवेत, ही बाब अशाच एका भ्रमंतीत त्यांच्या लक्षात आली. त्यांच्या या वेषांतरित रूपातील फेरीची बडोद्याच्या सरकारी कर्मचाऱ्यांना नेहमीच काहीशी दहशत वाटे.
लोकमान्य टिळकांची आणि सयाजीरावांची एक प्रकारे मैत्रीच होती. टिळक सुधारणाविरोधी नव्हते आणि खुद्द त्यांनीच सयाजीरावांना सांगितले होते की, बडोदे ही सुधारणांची प्रयोगशाळा व्हायला हवी.
आज आपण प्रशासनिक सुधारणांची खूप चर्चा करतो आणि ती करताना उत्तरदायित्व, पारदर्शिता वगैरे शब्द वापरतो, पण त्या काळात सयाजीरावांनी एक ‘कार्यक्षमता मापक’ तक्ता बनविला होता आणि गोल आकाराचा तो तक्ता (ज्यात आर्थिक जमा-खर्च, मनुष्यबळाचा वापर, उत्पादकता, कार्यसिद्धीतून झालेली मिळकत इ. मुद्दे होते.) भरून देणे हे मोठे जिकिरीचे काम असायचे. अर्थात, त्यातून कोणाचीच सुटका नव्हती.
सयाजीरावांकडे अर्थशास्त्राची चांगल्यापैकी जाण होती. ते खूप विज्ञाननिष्ठही होते. आणखी महत्त्वाचे म्हणजे केलेल्या कामाच्या काटेकोर डॉक्युमेंटेशनबाबत त्यांचा विलक्षण आग्रह असे.
*  सयाजीरावांची सामाजिक दृष्टी आणि तिचे गायकवाडीतील कारभारात पडलेले प्रतिबिंब, याबाबत..
सयाजीरावांनी आपल्या कारकीर्दीच्या प्रारंभ काळातच बडोदे संस्थानात प्राथमिक शिक्षण सर्वासाठी मोफत आणि सक्तीचे केले होते. त्यामुळे महाराष्ट्र, माळवा आणि गुजरातेतही बडोदे संस्थानात राहणाऱ्या मुलींना लग्नासाठी स्थळ म्हणून अग्रक्रम असे. शिक्षण न घेणाऱ्यांना सजा होत असे. अस्पृश्यांनीही इतरांच्या सारखेच शिक्षण घ्यायला हवे, हा सयाजीरावांचा आग्रह असायचा. त्या वेळी राखीव जागा वगैरे तरतुदी नव्हत्या, पण प्रगल्भ सामाजिक दृष्टीच्या महाराजांनी दलितांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत याबद्दल आग्रही भूमिका घेतली होती आणि तसे होईल याकडे जातीने लक्षही दिले होते. स्वामी दयानंद सरस्वतींचा आणि सयाजीरावांचा स्नेह होता. बडोदे संस्थानात ख्रिश्चन मिशनऱ्यांना थारा मिळू नये, असे दयानंदांनी महाराजांना निक्षून सांगितले होते.
शाळांमधून स्त्री-शिक्षक मिळावेत, यासाठी बडोदे नरेशांनी खास महिलांसाठी शिक्षणशास्त्र पदविका प्रशिक्षण महाविद्यालयेही उघडली.
* सयाजीरावांचा राजवाडा, दरबार, त्यांचा रुबाब याबद्दलच्या काही आठवणींबाबत..
सयाजीराव निवर्तले त्या वेळी मी जेमतेम आठ वर्षांचा होतो. त्यामुळे फारशा सुस्पष्ट आठवणी नाहीत, पण मी अनेकदा दरबारात गेलो आहे आणि त्यांचा रुबाब डोळे भरून बघितला आहे. दसऱ्याला हत्तीवरून स्वारी निघे. इतर दरबारी मंडळीही हत्तीवरच असत. मिठायांची पुडकी, चॉकलेट्स मुबलकपणे वाटली जात.
सयाजीरावांना अनेक जण भटाळलेला मराठा राजा असं म्हणत, पण ते काहीही असलं तरी त्यांच्या कारभारात त्यांनी कधीही जातीय दृष्टिकोन ठेवला नाही हे निश्चित. त्यांच्या व्यक्तिगत कार्यालयाला ‘रवानगी’ म्हणत आणि माझ्या वडिलांचा संचार तिथेच असे. आपल्या पदरी काम करणाऱ्यांना ते भरपूर पगार देत नसत, पण सुविधा मात्र उदार मनस्कतेने देत. आमच्यासाठी त्यांनी १९ नोकर ठेवण्याची तरतूद केली होती. माझ्या आईला इतके नोकरचाकर असणं पसंत नव्हतं. त्यामुळे आम्ही फक्त चारच नोकर ठेवले होते. अशा सरकारी चाकरांमध्ये एक जण तरी महाराजांचा विश्वासू खबऱ्या असायचा.  त्यामुळेच की काय, पण आज जसे ऊठसूट इंटेलिजन्स फेल्युअर झाल्याचे कानावर येत राहते तसे त्या वेळी कधीही घडले नाही.
माझ्या लहानपणी बडोद्याच्या नागरी जीवनाची गुणवत्ता काही औरच होती. मुबलक पाणी, मोठे रुंद रस्ते, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असे छान वातावरण असायचे. महत्त्वाचे म्हणजे सर्वामध्ये एक प्रकारचा सिव्हिक सेन्स सदैव शाबूत असायचा! हे सर्व चांगुलपण आम्हाला लाभले, ते सयाजीराव महाराजांसारखा एक द्रष्टा राज्यकर्ता आम्हाला मिळाल्यामुळेच!

A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी
Ramdas Athawale, raj thackeray
“महायुतीला राज ठाकरेंच्या पाठिंब्याची गरज नव्हती, मात्र…”, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
Ganpat Gaikwad supporters support Shrikant Shinde in Kalyan East
कल्याण पूर्वेत गणपत गायकवाड समर्थकांचा श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा
Sanyogeetaraje Chhatrapati
कोल्हापूर जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाहू महाराज सक्षम उमदेवार – युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती