स्वागत दिवाळी अंकांचे!

मौज ललित साहित्य फराळाची ‘मौज’ अनुभवू देण्याची परंपरा मौजने यंदाही पाळली आहे. शेक्सपिअरच्या ‘हॅम्लेट’पासून

मुंबई | November 20, 2012 9:26 AM

मौज
ललित साहित्य फराळाची ‘मौज’ अनुभवू देण्याची परंपरा मौजने यंदाही पाळली आहे.  शेक्सपिअरच्या ‘हॅम्लेट’पासून ते विविध साहित्यिक संदर्भाना जिवंत करणारी भारत सासणे यांची ‘दु:खाचा अनुवाद’ आणि ‘शाळा’कार मिलिंद बोकील यांची ‘महेश्वर’ या दीर्घकथा कथाप्रेमींसाठी आकर्षण ठराव्यात.
आशा बगे, कृष्णा खोत, मधुकर धर्मापुरीकर आदी ‘मौजा’ळलेली नावे कथाविभागाला समृद्ध ठेवणारी आहेत. रमेशचंद्र पाटकर यांनी गोपाळ आडिवरेकरांची घेतलेली मुलाखत कलाभ्यासकांचा उत्साह वाढविणारी आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीवर्षांनिमित्ताने श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांनी यशवंतरावांच्या जागविलेल्या आठवणी वेधक झाल्या आहेत.
नरेंद्र चपळगावकर, सुबोध जावडेकर, हेमंत देसाई यांचे वैचारिक लेखन यांच्याबरोबर हिरा दया पवार यांचा खास ललित लेख चुकवू नये असा आहे. जी.एं.चा नॉस्टॉल्जिया त्यांची प्रतिमासृष्टी आणि सिनेमा यांची तुलना करून विजय पाडळकर यांनी लेख सजविला आहे.  मंगेश पाडगावकर, शंकर वैद्य, सतीश काळसेकर, प्रज्ञा दया पवार, नीरजा, सतीश सोळांकूरकर यांच्यासोबत भरगच्च कवितागुच्छाची मेजवानी अंकामध्ये घेता येणार आहे.
संपादक – मोनिका गजेंद्रगडकर
पृष्ठे- २९४ , किंमत – १०० रुपये

  चतुरंग अन्वय
दर्जेदार, कलात्मक, वैविध्यपूर्ण आणि अभिरुचीसंपन्न साहित्य घेऊन ‘चतुरंग अन्वय’चा दहावा दिवाळी अंक प्रकाशित झाला आहे. निर्माता, निर्मिती आणि निर्मिती प्रेरणा यांच्या लौकिक आणि अलौकिक संबंधाचे दर्शन घडविणारी ‘भारलेलं आभाळ’ ही भारत सासणे यांची कथा, पावसामधूनही ऑर्गनचा सूर गवसणारी ‘ऑर्गन’ ही आशा बगे यांची कथा तसेच संजय जोशी, पंकज कुरुलकर, अरुण वर्टी, डॉ.बाळ फोंडके, अतुल घाटे, अभय कुलकर्णी असे अनेक रूपात विकसित झालेल्या प्रतिभावंत कथाकारांच्या कथा आणि मंगेश पाडगावकर, शंकर वैद्य, विठ्ठल वाघ, सुधीर मोघे, फ.मुं. शिंदे, प्रज्ञा पवार, अशोक बागवे, कविता महाजन, महेश केळुसकर, अरुणा ढेरे आदी मराठी कवितेतील विविध प्रवृत्ती आणि प्रवाह यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ज्येष्ठ कवींच्या कवितांसह तरुण कवींच्या कविताही या अंकात प्रकाशित करण्यात आल्या आहेत.
 आनंद अंतरकर यांचे ‘मेणाचं घर’ भावविभोर करणारे ललित तसेच वसंत डहाके यांचे वैचारिक  लेखन यांचाही समावेश या अंकात केला आहे.
कविवर्य ग्रेस यांचे अलीकडेच निधन झाले. साहित्य अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारताना त्यांनी केलेले भाषण (श्रीया भागवत अनुवादित) या अंकात आहे. स्वत:च्या वर्तनातून मूल्यसंस्कार बिंबवणारे गुरू ‘आपटे सरांच्या भेटी’चे हे श्रीनिवास कुलकर्णी यांनी शब्दबद्ध केलेले तसेच अकाली निवर्तलेल्या तरुण, बुद्धिमान आणि पुरोगामी डॉ.राजेंद्र व्होरा यांचे ‘राजाभाई’ हे नितीन शहा यांनी कृतज्ञतापूर्वक साकारलेले व्यक्तिचित्रही यात आहेत. चित्रकार ज्योत्स्ना कदम यांनी चित्रित केलेले कलात्मक आणि सुंदर पोट्र्रेट अंकाचे मुखपृष्ठ असून ते अंकाची शोभा वाढविणारे आहे.
यंदाच्या स्पर्धेच्या माध्यमातून निवडलेल्या प्रथम तीन क्रमांकाच्या आणि दोन उत्तेजनार्थ अशा पाच दर्जेदार कथांही वाचनीय आहेत.
संपादक – महेश कराडकर,
पृष्ठे – २०६, किंमत – १०० रुपये

    आवाज
मराठी माणसांवर आपल्या विनोदाच्या विविध रंगांत ठसा उमटविणारा संस्थापक- ती.मधुकर पाटकर यांचा ‘आवाज’ या वार्षिक दिवाळी अंकाने ६१ वर्षांची विनोदी परंपरा कायम राखत यंदाही ६२ व्या वर्षी हास्याचा दिवाळी बार उडविला आहे. संतोष पवार, अशोक पाटोळे यांच्यासह मंगला गोडबोले, दत्ता केशव, डॉ.यशवंत देशपांडे, श्रीकांत बोजेवार, अनिल नाडकर्णी, सुधीर सुखठणकर, अशोक मानकर, भालचंद्र देशपांडे आदीं अनेक विविध प्रसिद्ध विनोदी लेखकांनी या अंकात सहभागी होऊन दिवाळीची गोडी अधिक लज्जतदार केली आहे.
गोविंद मोतलग, संजय घाटे, सम्राट नाईक, आनंद देशमुख आदींची हास्यचित्रे व चुटके, तसेच विजय पराडकर, मंगेश तेंडुलकर, विकास सबनीस, संजय मिस्त्री, सुरेश क्षीरसागर, खलील खान, प्रशांत कुलकर्णी आदी मान्यवरांची हास्यचित्र मालिका अप्रतिम ठरली आहे.
विवेक प्रभुकेळुसकर, पुंडलीक वझे, ज्ञानेश बेलेकर, प्रभाकर वाईरकर, दुर्गेश वेल्हाळ, गजू तायडे, संतोष पुजारी आदीं प्रतिभावंतांची कथाचित्रेही वाचताना आणि पाहताना प्रसंगाशी एकरूप होण्यास भाग पडते. राजू तायडे यांची ग्राफिक स्टोरी वाखाणण्याजोगी झाली आहे.
 एकंदरीत लेखकांना व चित्रकारांना संपूर्ण मतस्वातंत्र्य देण्यात आल्याने अंकाची लज्जत वाढली आहे. पहिल्या पानापासून ते शेवटच्या पानापर्यंत ‘सब कुछ वाचनीय’ असेच या अंकाबाबत म्हणावे लागेल.
संपादक – भारतभूषण पाटकर,
पृष्ठे – २७६, किंमत – १५० रुपये

    महानगरी वार्ताहर
सिंचनाच्या अपुऱ्या सोयीमुळे ‘टॅँकरच्या देशा’ अशी महाराष्ट्राची ओळख बनत चालली आहे. वाढत्या लोकसंख्येला आणि शहरीकरणाला पाण्याचे स्रोत पुरतील का? त्यासाठी नियोजन काय करावे? पाण्यासाठी खरोखरच युद्ध होईल का, यांसारख्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न ‘पाणी समस्या आणि नियोजन’ या परिसंवादाच्या माध्यमातून ‘महानगरी वार्ताहर’ ने केला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीच्या शतकमहोत्सवी वर्षांनिमित्त मराठी चित्रपटसृष्टीवर ठसा उमटविणाऱ्या दहा मराठी अभिनेत्रींच्या कारकीर्दीचा वेध दिलीप ठाकूर यांनी घेतला असून यामध्ये दुर्गा खोटेंपासून ते सोनाली कुलकर्णीपर्यंतच्या निरनिराळ्या अभिनेत्रींची ओळख करून देण्यात आली आहे.
स्वामी विवेकानंद यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त ‘व्यवस्थापन महागुरू विवेकानंद’ या खास लेखाचा या दिवाळी अंकात समावेश करण्यात आला असून गिरिजा कीर, डॉ. अनुराधा औरंगाबादकर, भा. ल. महाबळ यांच्या कथांनी ‘महानगरी वार्ताहर’चा दिवाळी अंक सजला आहे.  
संपादक – सतीश सिन्नरकर,
पृष्ठे – २४२  किंमत – १०० रुपये

   स्वरलता
वयाच्या अवघ्या १२व्या वर्षी अकल्पितपणे पितृछत्र हरपलेले. हे दु:ख आयुष्यभराचेच; मात्र पाठीवरील चार लहान भावंडे आणि आईची जबाबदारी त्यापेक्षा महत्त्वाची. हे आव्हान ही कोवळी पोर समर्थपणे उचलते. पंजाब्यांची तसेच मुस्लिमांची मक्तेदारी असलेल्या हिंदी चित्रपटसृष्टीत ही मराठमोळी मुलगी प्रवेश करते. गळ्यात असणारी गंधाराची जन्मजात दैवी देणगी, तसेच आत्मविश्वास, अपार परिश्रमांच्या बळावर ती केवळ पंचविशीतच या चित्रपटसृष्टीत स्वरसम्राज्ञी म्हणून नावाजली जाते! तिच्या स्वरांचा अश्वमेध कोणी रोखू शकत नाही. ती चालतीबोलती आख्यायिका ठरते.
देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारही तिला लाभतो.. लता मंगेशकर! एखाद्या चित्रपटाची कथा शोभेल अशी ही कहाणी.
या स्वरसम्राज्ञीच्या कारकीर्दीचा आलेख सा. उत्तुंग झेपच्या ‘स्वरलता’ या दिवाळी अंकात प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. अनुक्रमणिकेतील नावे पाहिल्यानंतरच या अंकाची श्रीमंती लक्षात येते. आचार्य अत्रे, बाबासाहेब पुरंदरे, सुधीर फडके, अनिल मोहिले यांनी यापूर्वीच लिहिलेल्या लेखांचे संकलन यात आहे. आशा भोसले यांच्या ‘थोरली’ या लेखातून या बहिणींचे भावविश्व वाचकांसमोर सहज उलगडते. या दोघींच्या लहानपणीच्या अनेक हृद्य आठवणी आशाबाईंनी यात जागवल्या आहेत. याशिवाय ‘कथा शिवकल्याण राजाच्या निर्मितीची’ हा उत्तरा मोने यांचा लेख माहितीपूर्ण आहे.
दस्तुरखुद्द पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी या ध्वनिफितीच्या निर्मितीची सुरस कथा लेखिकेला सांगितली आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, गो. नी. दांडेकर, शंकर वैद्य, पं. हृदयनाथ मंगेशकर आणि लतादीदी यांच्या एकत्रित कलाविष्कारातून केवळ दोन महिन्यांच्या कालावधीत ही ध्वनिफीत निर्माण झाली, ही माहिती व अन्य तपशील थक्क करणारा आहे.
सर्वाधिक गाणी गाण्याचा विश्वविक्रम लतादीदींच्या नावावर आहे, असा उल्लेख नितीन आरेकर यांच्या ‘आनंदघन’ या लेखात करण्यात आला आहे, वास्तविक हा विश्वविक्रम आशा भोसले यांच्या नावावर आहे, हे सर्वज्ञात आहे. एवढी त्रुटी सोडली तर हा अंक देखणा झाला आहे.
संपादक- संतोष पवार,
पृष्ठे-९५, किंमत- १०० रु.

First Published on November 20, 2012 9:26 am

Web Title: welcome to diwali magazine 3