यंदाच्या सीझनमध्ये नववधूचा मेक-अप, हेअर आणि नेल्समध्ये कुठली स्टाइल ट्रेण्डमध्ये आहे, याविषयी प्रसिद्ध स्टायलिस्ट अंकिता होनवार यांनी दिलेल्या टिप्स.
नववधूच्या साज-श्रुंगारात केशरचना हा महत्त्वाचा भाग असतो. ब्रायडल हेअर स्टाइलकडे म्हणूनच जाणीवपूर्वक लक्ष द्यायला हवं. दरवर्षी स्टाइलिंगमध्ये नवे ट्रेण्ड्स येत असतात. त्याचं प्रतिबिंब त्या सीझनच्या ब्रायडल हेअरस्टाइल्समध्येही पडतं. महाराष्ट्रीय लग्नाचा साधारण पारंपरिक पेहराव लक्षात घेता नऊवारी असेल तर मुली खोपा घालायला हल्ली प्राधान्य देऊ लागल्या आहेत. पण याखेरीज हल्ली तरुण मुली पेहरावातही वेगवगळे प्रयोग करू लागल्या आहेत. ब्रायडल वेअरला अनुरूप हेअर स्टाइलही ट्रेण्डी हवीच. या सीझनमध्ये कुठल्या प्रकारची ब्रायडल स्टाइल म्हणून ट्रेण्डमध्ये आहे, याविषयी प्रसिद्ध हेअर ड्रेसर आणि स्टायलिस्ट अंकिता होनराव यांना विचारले.
या लग्नसराईच्या हंगामात मुली थोडे वेगळे प्रयोग करायला तयार झाल्या आहेत. गेल्या सीझनमध्ये इन असलेला वैशिष्टय़पूर्ण आय मेक-अप यंदा थोडा कमी झालाय. डोळ्यांचा मेक-अप टोन डाऊन करून त्याऐवजी ब्राइट लिप्स असा लुक सध्या हिट आहे. केशरचनेच्या बाबतीत मुली थोडय़ा वेगळ्या प्रकारच्या स्टाइल्स करून बघताहेत, असं अंकिता यांनी सांगितलं. घट्ट अंबाडा किंवा पारंपरिक खोपा, फ्रेंच प्लेट वगैरे घट्ट बांधलेल्या केसांच्या स्टाइल्सना फाटा देऊन थोडे वेगळे, धाडसी प्रयोग करायला मुली पुढे सरसावल्या आहेत, असंही निरीक्षण त्यांनी नोंदवलं.
मराठी लग्नांमधला पेहराव आणि दागिने वगैरे एकंदर लुक लक्षात घेता, साधी – फार कॉम्प्लिकेटेड नसलेली हेअर स्टाइल चांगली दिसेल. मुलींनी त्यांच्या केसांचा नैसर्गिक पोत, वळण लक्षात घेऊन त्यानुरूप हेअर स्टाइल करायला हवी. या सीझनमध्ये पूर्ण केस मागे सारून किंवा एका बाजूला बांधलेल्या केसांची स्टाइल ट्रेण्डमध्ये आहे. त्यानुसार लुक ठरवायला हवा.
लग्नाचा दिवस नववधूसाठी मोठा असतो. सकाळपासून अनेक विधी सुरू असतात आणि बऱ्याच वेळा ती तिचा लुक बदलत असते. अशा वेळी केसांची स्टाइल नववधूला अवघडलेपण देणारी नको. शक्य तेवढी कंफर्टेबल स्टाइल या दिवसासाठी हवी. मेक-अपमध्ये प्रयोग करता येतील. नेल ट्रीटमेंटमध्ये सध्या जेल नेल्स किंवा जेल नेलपॉलिश ट्रेण्डमध्ये आहे. हे नेल पॉलिश सगळे विधी, सोपस्कार होईपर्यंत चांगलं राहतं. अगदी डिनरच्या वेळेपर्यंत नखं व्यवस्थित दिसू शकतात. त्यामुळे याचा वापर करावा, असा सल्ला अंकिता होनवार यांनी दिला.
थंडीच्या दिवसात तहान फार लागत नसली, तरी स्किन मॉइश्चराइझ ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या, असाही सल्ला त्यांनी दिला.