‘जेन झेड’ अर्थात स्मार्ट झालेली नवी पिढी त्यांच्यासारख्याच स्मार्ट झालेल्या मोबाईलला सर्वात जवळचा सखा मानते. ही स्मार्ट जनरेशन आपल्या स्मार्ट फोनवरून इंटरनेट ब्राउझिंग करते, मित्रांशी गप्पा मारते, चित्रपट, मालिका बघते, खरेदी करते, आर्थिक व्यवहार करते आणि आणखीही बरंच काही करते. ‘जेन झेड’च्या या डिजिटल सवयींची पाहणी नुकतीच ‘टीसीएस विझ क्वीझ’अंतर्गत करण्यात आली. टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेसने यासाठी देशभरातील १५ शहरांमध्ये तरुणांच्या तंत्रज्ञान वापरावर आधारित सर्वेक्षण केलं. मुंबईमधील सर्वेक्षणात तरुणाई इंटरनेट सर्फिगसाठी लॅपटॉप, डेस्कटॉपच्या तुलनेत स्मार्ट फोन्सचा वापर सर्वाधिक करत असल्याचं दिसून आलं.
स्मार्ट फोन्सवरची अ‍ॅप्स हा तरुणाईच्या दृष्टीने आकर्षणाचा आणि कामाचा मुद्दा आहे. त्यातही सोशल नेटवर्किंग साइट्सची अ‍ॅप्स आल्यापासून तर हा विषय आणखी जिव्हाळ्याचा झालाय. खाण्या-पिण्याच्या अपडेट्सपासून, फीलिंग हायपर.. वगैरे इमोशन्स शेअर करण्यापर्यंत मिनिटामिनिटाला यावर काहीतरी सुरू असतं. टीसीएसच्या सर्वेक्षणानुसार, फेसबुक हे सर्वाधिक लोकप्रिय समाजमाध्यम असलं, तरी ट्विटर आदी तुलनेने नवीन माध्यमंही तरुणाईला आकर्षित करत आहेत. पण बऱ्याचदा या समाजमाध्यमांचा नेमका वापर करण्यात आपण कमी पडतो. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट या सगळ्याचाच उपयोग एका चाकोरीतील पोस्ट टाकण्यासाठी सध्या होत आहे. इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट ही माध्यमं तर आणखी लाईव्ह. केवळ स्मार्ट फोनवाल्यांकरताच उपलब्ध असलेली.. केवळ आणि केवळ फोटो पोस्ट करण्यासाठीच निर्माण झालेली. ही माध्यमं परिणामकारकरित्या कशी वापरावीत, प्रत्येक माध्यमाची नेमकी वैशिष्टय़ काय हे सांगण्याचा प्रयत्न..

 

स्मार्ट जनरेशन
५२ टक्के तरुणाई इंटरनेटसर्फिगसाठी स्मार्ट फोनचा वापर करते. तर ३६ टक्के तरुणाई इतर माध्यमे म्हणजेच डेस्कटॉप, लॅपटॉपचा वापर करते.
७७ टक्के तरुण मंडळी फेसबुक मोठय़ा प्रमाणावर वापरतात आणि त्या खालोखाल गुगल प्लस या सोशल नेटवर्किंग साइटचा सामावेश होतो. त्याखालोखाल पसंती (६२ टक्के) गुगल प्लसला मिळते आहे.
२० टक्के मुले तर २२ टक्के मुली ट्विटर वापरतात. मुलींपेक्षा मुले ट्विटर या सोशल नेटवर्किंग साइटचा वापर अधिक करत आहेत.
(संदर्भ : ‘टीसीएस’यूथ सव्‍‌र्हे. याअंतर्गत वय वर्षे १२ ते १८ दरम्यानच्या मुला-मुलींच्या इंटरनेट वापरासंदर्भातील सवयींचे सर्वेक्षण करण्यात आले होते.)