ओरिगामी या कलेची तरुणाईला भुरळ पडतेय आणि त्याचा वापर ते तंत्रज्ञानातल्या नव्या प्रयोगांमध्ये आणि शिक्षणामध्ये करू लागले आहेत.

कागदातून कलाकृती साकारण्याची जपानी कला, एवढीच आपल्याला ओरिगामीची ओळख असेल तर मुंबईत भरलेल्या आणि येत्या रविवापर्यंत vv13खुल्या असणाऱ्या ‘वंडरफोल्ड’ प्रदर्शनाला भेट द्यायलाच हवी. कागदाच्या घडय़ांमधून साकारलेला ‘खाना-खजाना’ तिथे मांडलेला दिसेल.
कागदाला घडी घालणं या मूलभूत तंत्राचा आधार घेत पुण्या-मुंबईच्या ओरिगामी कलाकारांनी या प्रदर्शनातल्या वस्तू साकारल्या आहेत. ओरिगामीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी कार्यरत असलेल्या ओरिगामी मित्र या संस्थेच्या वतीने दरवर्षी ओरिगामी कलाकृतींचं प्रदर्शन भरवलं जातं. या वर्षीच्या या प्रदर्शनाची थीम जेवणाचं टेबल अशी आहे. त्यामुळे   स्वयंपाकघरात लागणारी भांडीकुंडी, काटा-चमचे, बशा यांपासून ते अन्नपदार्थापर्यंत सगळं काही कागदाच्या घडय़ांमधून साकारलं आहे. लहानपणी हस्तकलेच्या वर्गात शिकलेली कागदी होडी, एवढीच कागदाच्या कलेची ओळख आपल्याला असते; पण सध्या जगभरात ओरिगामी या कलेचा अनेक व्यावसायिक कारणांसाठीही वापर होत आहे. म्हणूनच ही कला सध्या तरुणाईला मोठय़ा प्रमाणावर आकर्षित करून घेत आहे.
vv16ओरिगामी मित्रचे सुधांशू नूलकर म्हणाले, ‘अवकाश विज्ञानातही ओरिगामीचा वापर झालाय. नासाच्या एका उपग्रहाच्या सौर घट प्रणालीसाठी रॉबर्ट लँग नावाच्या ओरिगामी तज्ज्ञानं टॅसलेशन प्रकारानुसार आरेखन केलं. तंत्रज्ञानाला अशा प्रकारे ही कला हातभार लावतेय.’
पुण्याचा चिन्मय गोरे हा इंजिनीअरिंगचा विद्यार्थी काही पक्ष्यांची मॉडेल्स घेऊन इथे आला आहे. ‘माझ्या मते, ओरिगामी म्हणजे कला आणि गणित याचं भन्नाट कॉम्बिनेशन आहे. ओरिगामीमुळे मॅथॅमॅटिकल अ‍ॅनालिसिस समजण्यास मदत होते’, चिन्मय म्हणाला. ‘ओरिगामीचे एक कला म्हणून अनेक फायदे आहेत. फोल्डिंग करायला लागल्यापासून माझं कॉन्सन्ट्रेशन खूप वाढलंय. आधी मी खूप चंचल होतो. पण आता एका जागी बसून काम करण्याचा पेशन्स वाढला आहे. इंजिनीअरिंगच्या काही प्रोजेक्टसाठी आता ओरिगामीच्या फोल्डिंग-अनफोल्डिंग तंत्राचा वापर करण्याचा मी विचार करत आहे’, चिन्मय सांगतो.
vv17जयहिंद कॉलेजमध्ये ‘बीएमएम’ करणारा मोहित दांडेकरदेखील ओरिगामीची काही मॉडेल्स या प्रदर्शनात सादर करत आहे. तो ओरिगामीची प्रशिक्षण शिबिरंही घेतो. ‘या कलेचा वापर आम्हा मास मीडियाच्या विद्यार्थ्यांना होतोच. आमच्या प्रोजेक्टसाठी ओरिगामी मॉडेल्स बनवून त्याच्या मदतीनं फिल्ममेकिंगचे धडे आम्ही घेतोय.’
कॉन्शुलेट जनरल ऑफ जपान आणि ओरिगामी मित्रतर्फे आयोजित वंडरफोल्ड हे प्रदर्शन येत्या रविवापर्यंत (दि. १४ डिसेंबर) मुंबईच्या सर जे. जे. कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये (छत्रपती शिवाजी टर्मिनस, म. फुले मार्केटसमोर) सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत खुले आहे.

आमच्या प्रोजेक्टसाठी ओरिगामी मॉडेल्स बनवून त्याच्या मदतीनं फिल्ममेकिंगचे धडे आम्ही घेतोय. स्टॉप मोशन फिल्म बनवायला ओरिगामीचा पक्षी मी केला आणि त्याचा छान फायदा झाला.’
– मोहित दांडेकर