मनमाड जवळील नागापूर शिवारात गुरुवारी सकाळी १३ मोरांचा उघडय़ावर फिरताना तडकाफडकी मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. त्यांचा मृत्यू पाणी न मिळाल्याने की विषबाधेने झाला याचे कारण समजू शकले नाही. प्राथमिक अंदाजानुसार उष्माघाताने या मोरांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
नागापूर शिवारात भारत पेट्रोलियम कंपनीच्या पाठीमागे नांदगाव-मनमाड रेल्वे मार्गाजवळ मोरांचा वावर मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. त्यातच तापमान वाढल्याने उन्हाच्या तडाख्याने मोर पाण्याच्या शोधार्थ सैरभैर होऊन वस्तीकडे येत असल्याचे चित्र आहे. भारत पेट्रोलियम आणि भारतीय अन्न मंडळाच्या गोदाम परिसरातही हे मोर दृष्टीपथास पडतात. गुरुवारी सकाळी आधी चार तर नंतर नऊ अशा एकूण १३ मोरांचा मृत्यू झाला. ही घटना भारत पेट्रोलियमच्या मागील बाजुकडील लोहमार्गावर घडली. काही मोर तडफडत असल्याचे लक्षात आल्यावर ग्रामस्थांनी धाव घेतली. काही मोरांचा आधीच मृत्यू झाला होता. तडफडणाऱ्या तीन मोरांसाठी पाणी आणून ठेवण्यात आले. पण, ते प्राशन करण्याआधी त्यांचाही मृत्यू झाला. उन्हाचा वाढता तडाखा, पाण्याची टंचाई, अथवा काहीतरी खाण्यात आल्याने झालेली विषबाधा हे कारण त्यामागे असू शकते असा अंदाज व्यक्त होत आहे. दरम्यानच्या काळात वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सर्व मोरांचा पंचनामा करून शवविच्छेदन करण्यात आले. या अहवालानंतर मोरांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.
नागापूर-पानेवाडी हिसवळ क्षेत्रात सुमारे २०० मोर आहेत. पण, त्यांची देखभाल अथवा कोणतीही काळजी घेतली जात नाही. त्यांच्यासाठी पाण्याचीही साधी व्यवस्था नाही. वन अधिकाऱ्यांना फारशी माहिती नाही. या एकूणच स्थितीमुळे या राष्ट्रीय पक्षाचा दुदैवी मृत्यू झाल्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पवार यांनी सांगितले. या भागात सध्या पिके नाहीत. सर्वत्र ओसाड जमीन आहे. यामुळे खाण्यातून विषबाधा होणार नाही. मोरांना वेळेवर पाणी न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता स्थानिक ग्रामस्थांनी बोलून दाखविली. नांदगावचे पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. बी. गोंदकर आणि डॉ. ए. एन. साबळे यांनी मृत १३ मोरांचे शवविच्छेदन केले. व्हिसेरा तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे. त्याचा अहवाल आल्यावर मृत्यूचे कारण समजेल असे संबंधितांकडून सांगण्यात आले.