स्थळ – पूर्व द्रुतगती मार्गावरील घाटकोपरजवळील कामराज नगर उड्डाणपूल.
वेळ – दुपारी ३.१४ मिनिटे
पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाना जोडणारा सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्ता शुक्रवारी सुरू झाल्यानंतर या रस्त्यावरून प्रवास करण्यासाठी बाइकने कामराज नगरजवळील उड्डाणपूल गाठला. या उड्डाणपुलाजवळ कुठेही ‘सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्त्याकडे’ असा फलक दिसत नाही. या जोडरस्त्यावर जाण्यासाठी रस्त्याच्या डाव्या बाजूने एक उड्डाणपूल सुरू होतो. मात्र कामराज नगरजवळील उड्डाणपूल ओलांडून लगेच मार्गिका बदलणे अत्यंत धोकादायक असल्याचे जाणवते. हा धोका पार करून अखेर काही क्षणांत सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्त्याला लागलो. टिळक नगर स्थानकाजवळून देशातील पहिला डबलडेकर उड्डाणपूल सुरू झाला. या उड्डाणपुलाच्या वरच्या भागातून जाताना फोटो काढण्यासाठी एक-दोन मिनिटे थांबण्याचा मोह आवरला नाही. पण नंतर लगेच निघून कुर्ला पश्चिमेला नेताजी नगरजवळ एक सिग्नल लागला. हा परिसर तर न ओळखण्याएवढा बदलला आहे. या सिग्नलवरून पुढे आल्यानंतर लाल बहादूर शास्त्री मार्ग ओलांडण्यासाठी बांधलेला उड्डाणपूल ओलांडून बाईक कपाडिया नगर परिसरात आली. या ठिकाणी थोडीशी वाहतूक कोंडी होती. मात्र त्या कोंडीतून सुटल्यानंतर कालिना विद्यानगरीच्या पुढे डावीकडे वळून बाईक पश्चिम द्रुतगती महामार्गाला लागली. घडय़ाळात बघितले, तर ३.२८ वाजले होते. अवघे ४५ ते ५० किलोमीटर प्रतितास एवढय़ा वेगाने बाईक चालवूनही पूर्व द्रुतगती महामार्ग ते पश्चिम द्रुतगती महामार्ग हे एरवी ४५ ते ६० मिनिटांचे अंतर केवळ १४ मिनिटांत कापले गेले. या पूर्ण प्रवासात जाणवलेल्या काही गोष्टींपैकी एक म्हणजे कपाडिया नगर येथे होणारी वाहतूक कोंडी! हा भाग नेहमीच गजबजलेला असतो. त्यामुळे येथे वाहतूक अडकण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे अद्यापही या संपूर्ण रस्त्यावर मार्गदर्शक फलक लावलेले नाहीत. असलेले फलकही दिशा दाखवण्याऐवजी दिशा चुकवण्यास मदत करण्याची शक्यता आहे. पण तरीही या नव्या मार्गावरून प्रवास करण्याचा अनुभव सुखद आहे, हे नक्की!