‘मुंबई- पुणे एक्स्प्रेस वे’मुळे या मार्गावरील वाहतूक जलदगतीने होण्यास मदत झाली असली, तरी वाढत्या अपघातांमुळे हा द्रुतगती मार्ग अनेक प्रवाशांसाठी मृत्यूचा मार्ग ठरला आहे. गेल्या चार वर्षांमध्ये या जलदगती मार्गावर दीड हजारांहून अधिक अपघात झाले असून त्यात पाचशेहून अधिक प्रवाशांना प्राणास मुकावे लागले आहे.
सध्या केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री असलेले नितीन गडकरी हे सेना-भाजप युतीच्या सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना द्रुतगती महामार्ग बांधला गेला. या सहापदरी प्रशस्त मार्गामुळे वाहनांचा वेग वाढला, तसे अपघातांचे प्रमाणही वाढले. गेल्या चार वर्षांतील अपघातांची आकडेवारी पाहिली, तर एकीकडे जलदगतीने प्रवासाचे ध्येय गाठताना दुसरीकडे हा मार्ग मृत्यूचा सापळाही ठरत असल्याचे दिसून येते.
एप्रिल २०१० ते एप्रिल २०१४ या चार वर्षांच्या कालावधीत एक्स्प्रेस वे वर एकूण १६७७ अपघात होऊन त्यातील ४०७ प्राणांतिक अपघातांमध्ये ५२२ जण मृत्युमुखी पडले. ३७० अपघातांत ९१२ जण गंभीर जखमी झाले, तर १२३ अपघातांमध्ये १९९ जणांना किरकोळ जखमा झाल्या. मृत किंवा जखमी झाल्यामुळे या अपघातांची पोलिसांकडे नोंद झाली. त्याचबरोबर जीवितहानी झाली नाही वा कोणी जखमीही नाही, असेही ७७७ अपघात चार वर्षांच्या काळात या ठिकाणी झाले.