वाशी, तुर्भे, सानपाडा, सिबिडी, खारघर, पनवेल, कळंबोली, उरण या भागातील रहिवाशांच्या वाहनांना पर्यायी अंर्तगत रस्ता नसल्याने जुलै महिन्याच्या सुरुवातीस खऱ्या अर्थाने वाहतूकीस खुला झालेला सायन – पनवेल महामार्ग मृत्यूचा नवीन सापळा तयार होऊ पहात आहे. या दुतगती महामार्गावर अनेक ठिकाणी सिमेटं आणि डांबरी रस्त्याची जोडणी तसेच दिशादर्शक फलक न लागल्याने अपघाताचे हे प्रमाण वाढण्याची भिती वाहतूक पोलिस व्यक्त करीत आहेत. या मार्गावर गेल्या २० दिवसात १६ पेक्षा जास्त छोटे मोठे अपघात झाले असून यातील अनेक वाहनचालकांनी पोलिस तक्रारी केलेल्या नाहीत. बेलापूर ते कळंबोली हा अपघातांचा हॉट स्पॉट तयार झालेला आहे. याशिवाय टोल घेण्यासाठी उतावीळ असलेल्या कंत्राटदराने रस्त्याची कामे अद्याप पूर्ण न केल्याने अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे.
पुणे गोव्याकडे जाणाऱ्या वाहनांची वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधा वापरा हस्तांतरण तत्वावर सायन- पनवेल महामार्गाचे बाराशे कोटी रुपये खर्च करुन रुंदीकरण व सिमेंट क्रॉक्रिटीकरण केले आहे. (कंत्राटदाराच्या लेखी हा खर्च १७०० कोटी पर्यत गेलेला आहे) मानखुर्दे ते कळंबोली या २३ किलोमीटर अंतराच्या या मार्गावर सहा उड्डाणपूल बांधण्यात आलेले आहेत. पूर्णपणे सिमेंटचा वापर करुन बांधण्यात आलेल्या या उड्डाणपूलावर करण्यात आलेले डांबरीकरण मात्र ऐनपावसाळ्यात अनेक ठिकाणी उखडले असून वाशी गाव, पामबीच मार्गावरील वळण, शिरवणे उड्डाणपूल, तुर्भे येथील शरयू शोरुमसमोरील रस्याची अक्षरश: चाळण झाली असल्याचे दिसून येते. याच ठिकाणी पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या क्लव्‍‌र्हटचे काम न केल्याने भर पावसात या रस्त्यावर चार ते पाच फूट पाणी साचत असल्याचे दृश्य आहे. त्यामुळे मोठय़ा गाडय़ा छोटय़ा गाडय़ांना आणि त्यातील प्रवाशांना घाणेरडय़ा पाण्याची फवारणी करीत असल्याचे दिसून येते. या मार्गावर सिमेंट क्रॉक्रिटीकरण आणि डांबरी रस्त्याची जोडणी अनेक ठिकाणी अपूर्ण आहे. त्यामुळे दोन रस्त्यामध्ये चार पाच इंच दरी निर्माण झालेली आहे. यात डांबरी रस्त्याची तर पार वाताहत झाली असल्याचे दिसून येते. कळंबोली ते तळोजा या मार्गातील रस्त्यावर सर्वत्र खडी पसरली असल्याचे वाहनचालकांनी सांगितले. वाहतूकीच्या दृष्टीने सोयीस्कर झालेला हा रस्ता या अपुऱ्या कामांमुळे वाहतूक कोंडीचा रस्ता होऊ पहात आहे. दुतगती मार्गाला लागणारे सव्‍‌र्हिस रोड, दिशादर्शक फलक, यामुळे या मार्गावर अपघातांची संख्या वाढण्याची भिती वाहतूक विभागाचे उपायुक्त विजय पाटील यांनी व्यक्त केली.