‘मराठी रंगभूमीची व्यावसायिक आणि प्रायोगिक रंगभूमी ही दोन मुले आहेत. त्याखेरीज कामगार रंगभूमी, बालरंगभूमी, दलित रंगभूमी वगैरे अन्य अनेक आत्ये-मामेभावंडे आहेत. या सर्वानी एकत्रितपणे नांदायला हवे असे मला वाटते. नाटय़संमेलनाध्यक्षाला एक वर्षांच्या कार्यकालात फार काही करता येईल असे नाही. पण मी सर्वाना एकत्र नांदविण्यासाठी ‘मॅच मेकर’चे काम करीन’, असे उद्गार बारामती येथे होणाऱ्या अ. भा. मराठी नाटय़संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. मोहन आगाशे यांनी काढले.
नाटय़संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. आगाशे यांचा अ. भा. मराठी नाटय़ परिषदेतर्फे अध्यक्ष हेमंत टकले यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला; त्याप्रसंगी ते बोलत होते. ‘नाटय़ परिषद आणि नाटय़संमेलनाध्यक्ष यांची कार्यक्षेत्रे वेगळी असतात. त्यांचे नाते नवरा-बायकोसारखे असावे असे मला वाटते. त्यांची कामे जरी वेगळी असली तरी त्यांचे एकमेकांपासून अडायला हवे, तरच नाटय़संसाराचा गाडा सुरळीत चालेल, असे डॉ. आगाशे म्हणाले.
येत्या २१-२२-२३ डिसेंबर रोजी बारामती येथे होणाऱ्या या संमेलनाचे उद्घाटन केन्द्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. विशेष अतिथी म्हणून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपस्थित राहणार आहेत. तर संमेलनाची स्थानिक जबाबदारी अजित पवार यांनी स्वीकारली आहे.
संमेलनाच्या पूर्वतयारीची माहिती देताना नाटय़ परिषदेचे अध्यक्ष हेमंत टकले यांनी सांगितले की, हे संमेलन सर्वसमावेशक व्हावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. नाटय़संमेलनाच्या उद्घाटनाच्या दिवशी महाराष्ट्रातील सर्व नाटय़संस्थांनी आपले प्रयोग बंद ठेवून संमेलनात सहभागी व्हावे असे आवाहन आम्ही केले आहे आणि त्यास सर्व संस्था आणि कलाकारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यावेळी जास्तीत जास्त कलाकार नाटय़संमेलनास येतील. महाराष्ट्राबाहेर मराठी नाटके करणाऱ्या संस्थांशी संपर्क साधून त्यांनाही संमेलनास निमंत्रित करण्यात आले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातून नाटय़शास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही नाटय़संमेलनात सक्रीय सहभागी करून घेण्यात येणार आहे. मराठीव्यतिरिक्त अन्य भाषिक रंगभूमीवर जे चालले आहे त्याची दखलही या संमेलनात घेण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे हेमंत टकले यांनी सांगितले.
नाटय़ परिषदेचे उपाध्यक्ष विनय आपटे यांनी संमेलनातील कार्यक्रमांची रुपरेषा विशद केली. नाटय़संमेलनाध्यक्ष डॉ. मोहन आगाशे अभिनित ‘काटकोन त्रिकोण’ या मराठी नाटकाबरोबरच प्रा. वामन केंद्रे दिग्दर्शित ‘प्रिया बावरी’ (हिंदी), ‘श्यामची आई’चा इंग्रजी प्रयोग तसेच संस्कृत दीर्घाक संमेलनात सादर होणार आहे. त्याचप्रमाणे ‘मराठी नाटकात स्त्रियांचे स्थान’, ‘मराठी नाटक नव्या नाटककारांच्या शोधात’ आणि ‘जुन्या नाटकांची पुनर्निर्मिती : यशाचा फॉम्र्युला की पळवाट?’ या विषयांवर परिसंवाद होणार आहेत. महाराष्ट्रात गेल्या वर्षभरात झालेल्या प्रमुख एकांकिका स्पर्धातील निवडक एकांकिकांचे प्रयोग संमेलनात होतील. संमेलनात होणाऱ्या विविधरंगी मनोरंजनाच्या कार्यक्रमाची धुरा हृषिकेश जोशी, संजय मोने, सुबोध भावे आणि गजेंद्र अहिरे यांनी स्वीकारली आहे.
तसेच या वर्षीपासून प्रथमच नाटय़ज्योतीच्या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी सांगली येथे झालेल्या नाटय़संमेलनातील नटी-सूत्रधार ही नाटय़ज्योत बारामतीच्या संमेलनातील नटी-सूत्रधारांकडे सोपवतील. अजित पवार यांच्या हस्ते ही नाटय़ज्योत प्रज्वलित करण्यात येईल. संमेलनाच्या उद्घाटकीय सत्रापूर्वी बारामतीच्या चार प्रमुख चौकांतून पथनाटय़ेही सादर करण्यात येणार आहेत. नाटय़संमेलनाच्या पूर्वसंध्येला २१ डिसेंबर रोजी सायंकाळपर्यंत सर्व कलाकार व रंगकर्मीनी बारामतीत पोहोचावे अशी अपेक्षा आहे. त्या रात्री उद्घाटक शरद पवार यांनी कलाकारांसाठी स्नेहभोजन आयोजित केले आहे, अशी माहिती विनय आपटे यांनी दिली.