महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत नंदुरबार प्रमाणेच धुळे जिल्ह्यातील सर्वच्या सर्व म्हणजे ५५१ गावे सहभागी सहभागी झाले असल्याची माहिती विभागीय तंटामुक्त कक्षाच्या अहवालावरून पुढे आली आहे. सामाजिक शांतता व सुरक्षितता राखून गाव विकासाला चालना देण्याच्या दृिष्टकोनातून राबविल्या जाणाऱ्या या मोहिमेत गावांचा सहभाग लक्षवेधी म्हणता येईल.
गाव विकासात अडसर ठरलेले तंटे मिटवून विकासाचा मार्ग सुकर करण्याच्या उद्देशाने राबविल्या जाणाऱ्या या मोहिमेचे यंदा सहावे वर्ष आहे. या आधीच्या दोन्ही वर्षांत धुळे जिल्ह्यातील सर्व गांवे या मोहिमेत सहभागी झाली होती. ग्रामीण भागात शांतता व सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करणे, हा या योजनेचा उद्देश दृष्टीपथास येण्याची शक्यता बळावली आहे. गावासाठी गावातच लोकसहभागातून सर्वमान्य तोडगा घडवून आणण्याची व्यवस्था या मोहिमेने प्रत्यक्षात आणली जात आहे. गावातील अस्तित्वातील तंटे सामोपचाराने मिटविणे तसेच नव्याने तंटे निर्माण होऊ नयेत, हा या योजनेचा मुख्य हेतु. जी गावे या मोहिमेंतर्गत तंटामुक्त ठरतात, त्यांना लोकसंख्येच्या प्रमाणानुसार पुरस्काराच्या स्वरूपात निधी दिला जातो. धुळे जिल्ह्यातील सर्व गावांनी मोहिमेत सहभाग नोंदवत गाव विकासाला चालना देण्याचे प्रयत्न चालविले आहेत. धुळे जिल्ह्यात धुळे, साक्री, शिरपूर, शिंदखेडा हे चार तालुके असून पोलीस ठाण्यांची संख्या १५ आहे. या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील ५५१ गावे मोहिमेत सहभागी झाली आहेत. २०१०-११ आणि २०११-१२ या दोन्ही वर्षांत धुळ्याचे सहभागित्वाचे प्रमाण हेच राहिले होते. ग्रामपंचायत निवडणूक वा स्थानिक पुढाऱ्यांची मानसिकता यांचा कोणताही परिणाम मोहिमेतील सहभाग नोंदविण्यावर झाला नाही. या मोहिमेत सहभागी होण्याचा निर्णय प्रामुख्याने त्या गावातील प्रतिष्ठित व्यक्तींवर अवलंबून असतो. कारण, बहुतांश मंडळी निवडणुकीत मग्न होत असल्याने तंटामुक्त गाव मोहिमेत सहभागी होण्याच्या कालावधीत ग्रामपंचायत वा तत्सम काही निवडणूक आल्यास सहभागावर परिणाम होत असतो. मात्र, धुळे जिल्ह्यातील गावांनी ते कटाक्षाने टाळून या मोहिमेकडे जाणीवपूर्वक लक्ष केंद्रीत केले आहे. धुळे जिल्ह्यात विहित मुदतीत उपरोक्त गावांमध्ये ५५१ तंटामुक्त गाव समित्यांचीही स्थापना झाली आहे. या समित्यांच्या माध्यमातून तंटे मिटविण्याबरोबर प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अमलबजावणी केली जाते. त्यात गावात धार्मिक सलोखा राखणे, सार्वजनिक सणोत्सव शांततेने साजरा करणे, राजकीय सामंजस्य निर्माण करणे, निवडणूका अविरोध होतील याकरिता प्रयत्न, अनिष्ट प्रथा व रूढी नष्ट करण्यासाठी पुढाकार, सामुदायिक विवाहांना प्रोत्साहन, नाविण्यपूर्ण उपक्रम राबविणे आदी विषयांवर या समित्यांमार्फत कामही सुरू झाले आहे.
गावातील शांततेचे वातावरण विकास प्रक्रियेला पोषक ठरत असते. ही बाब लक्षात घेऊन शासनाने ग्रामीण भागातील तंटा -बखेडय़ांचे प्रमाण कमी करण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान सुरू केले आहे. या माध्यमातून स्थानिक पातळीवरील तंटे सामोपचाराने मिटविणे आणि विविध स्वरूपाचे उपक्रम राबवून ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देण्याचा प्रयत्न होत आहे. या अभियानातील एकूणच कामगिरीचा वेध लेखमालेतून घेण्यात येत आहे. या मालेतील बारावा लेख.