सिंहस्थाच्या पाश्र्वभूमीवर, अशोक स्तंभ ते रविवार कारंजा या एकेरी मार्गाच्या काँक्रिटीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून, शनिवारपासून हा मार्ग काम पूर्ण होईपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. या मार्गावरून पंचवटीकडे जाणारी वाहतूक रामवाडीमार्गे वळविण्यात येईल.
सिंहस्थ अंतर्गत निधीतून महापालिका या मार्गाच्या काँक्रिटीकरणाचे काम करणार आहे. हे काम एकाच टप्प्यात केले जाणार आहे. त्यासाठी हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी घेतला. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून हे र्निबध जारी करण्यात आल्याचे सरंगल यांनी म्हटले आहे. अशोक स्तंभ ते रविवार कारंजा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतुकीसाठी ‘प्रवेश बंद’ करतानाच हा परिसर ‘नो पार्किंग’ क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. १ नोव्हेंबरपासून वाहतुकीचे हे र्निबध लागू केले जाणार आहेत. काम पूर्ण होईपर्यंत ते लागू राहतील. अशोक स्तंभाकडून रविवार कारंजाकडे जाणारी वाहतूक सिद्धेश्वर मंदिरमार्गे रामवाडीपूल, मखमलाबाद नाक्यावरून पंचवटीकडे जाईल. तसेच मालेगाव मोटार स्टॅण्डकडून रविवार कारंजामार्गे सांगली बँक सिग्नल व सराफ बाजाराकडे वाहने जाऊ शकतील. काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाल्यावर बंद करण्यात आलेला मार्ग वाहतुकीसाठी आधीप्रमाणे खुला केला जाईल. हे र्निबध पोलीस दलाची वाहने, रुग्णवाहिका, शववाहिका व अग्निशमन दलाच्या वाहनांना लागू राहणार नाही.