* ‘लोकसत्ता’ चा उपक्रम, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व  ‘टीजेएसबी’चे सहकार्य
*  विभागात पंकज पाळेकर प्रथम

बांबुच्या पट्टय़ांपासून कापसाच्या मदतीने निर्मित पाच फूट नारळाचे मखर असो की, द्रोण व पत्रावळ्यांच्या माध्यमातून आकारास आलेले सुबक मंदिर असो, एवढेच नव्हे तर, विटा, लाकूड व सुतळीच्या सहाय्याने निर्मिलेला ‘पार’ असो की, घरगुती साहित्याचा वापर करून केलेली नेत्रदीपक सजावट तसेच विसर्जनाच्या परंपरेची ओळख करून देत बादलीत करण्यात आलेले मूर्ती विसर्जन असो..
अशा वैविध्यपूर्ण संकल्पना प्रत्यक्षात साकारत गणपती बाप्पाला खऱ्या अर्थाने पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची अनुभूती मिळवून देणाऱ्या गणेश भक्तांना सन्मानित करण्याचा योग बुधवारी जुळून आला. त्यास निमित्त ठरले महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि टीजेएसबी बँक यांच्या सहकार्याने ‘लोकसत्ता’तर्फे आयोजित ‘इको फ्रेंडली गणेशोत्सव स्पर्धा २०१२’ स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाचे. नाशिक विभागात पंकज पाळेकर यांनी प्रथम तर विवेक रोजेकर यांनी द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. त्यांच्यासह सहा गणेश भक्तांना उत्तेजनार्थ पारितोषिक तर १५ स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन सोहळ्यात केवळ पुढील गणेशोत्सवच नव्हे, तर दैनंदिन जीवनातही पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारण्याचे महत्व अधोरेखीत करण्यात आले.
सातपूर येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सभागृहात रंगलेल्या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून मंडळाचे प्रादेशिक अधिकारी अंकुश फुलसे, उपप्रादेशिक अधिकारी रवी आंधळे, वैज्ञानिक अधिकारी एस. व्ही. भोसले, ‘लोकसत्ता’चे संपादकीय विभाग प्रमुख अविनाश पाटील, वितरण विभागाचे प्रमुख वंदन चंद्रात्रे, जाहिरात विभागाचे जगदीश कर्जतकर, मुख्य वितरक देवदत्त जोशी आदी उपस्थित होते. स्पर्धेतील पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक ९,९९९ रूपये, मानचिन्ह व सन्मानचिन्ह तर द्वितीय क्रमांकाच्या पारितोषिकाचे स्वरूप ६,६६६, मानचिन्ह आणि सन्मानचिन्ह असे आहे. आकाश कदम, अंकुश ठाकरे, नीलय निकम, दीपाली कोंडरा, ज्योती पाटकरी व श्रीनिवास मंदावडे यांना उत्तेजनार्थ पारितोषिकाने गौरविण्यात आले. या पारितोषिकांचे स्वरूप प्रत्येकी २००१ रूपये, मानचिन्ह व सन्मानपत्र असे आहे. या शिवाय गौरी उपासनी, देवयानी माळी, प्रशांत तांबट, रेणुका मराठे व स्मिता पुरोहित या स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले.
इको फ्रेंडली गणेशोत्सव स्पर्धा हा ‘लोकसत्ता’चा उपक्रम स्तुत्य असून तो निरंतर सुरू ठेवण्याची अपेक्षा अंकुश फुलसे यांनी व्यक्त केली. सजावटीत पर्यावरणास हानीकारक ठरणाऱ्या वस्तु टाळल्या जाव्यात. अतिशय साधेपणाने घरगुती व विघटनशील वस्तुंच्या वापराने चांगली सजावट करता येते. या उपक्रमाच्या माध्यमातून पर्यावरणपूरक सजावटीबद्दल लक्षणीय जनजागृती झाल्याचे फुलसे यांनी नमूद केले. मंडळाचे एम. एन. जाधव यांनी प्रत्येक सणोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन करतानाच गणेशोत्सवात शाडूची मूर्ती, नैसर्गिक रंगाचा वापर आणि कागदी आरासवर भर दिल्यास प्रदुषणाची हानी टाळता येईल, असे नमूद केले. सणोत्सवाबरोबरच दैनंदिन जीवनातही पर्यावरणपूरक जीवनशैलीचा स्वीकार करणे आवश्यक आहे. पाण्याचा अपव्यय टाळणे, प्लास्टिक पिशव्यांऐवजी कापडी पिशवीचा वापर असे अनेक उपक्रम दैनंदिन जीवनात आचरणात आणता येतील. बहुतांश शाळांमध्ये नवीन पुस्तकांना प्लास्टिक कव्हर घालण्यास सांगितले जाते. वास्तविक नव्या पुस्तकाला पुन्हा कव्हर घालण्याची गरज काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पालकही या मुद्यावरून शिक्षण संस्था व शिक्षकांकडे विचारणा करू शकतात. पर्यावरणाचे संरक्षण करून कार्बन क्रेडीट प्राप्त केले जाते. त्याचप्रमाणे पुढील काळात झाडांचे संवर्धन करून ‘ट्री क्रेडीट’ प्राप्त करता येईल, याकडे जाधव यांनी लक्ष वेधले.
सूत्रसंचालन वंदन चंद्रात्रे यांनी केले. याप्रसंगी प्रदूषण नियंत्रण मंडळातील कर्मचारी, लोकसत्ता कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

‘सजावटीचे प्रत्यक्ष अवलोकन आवश्यक’
इको फ्रेंडली गणेशोत्सव स्पर्धेतील विजेते निवडण्याच्या पद्धतीत स्पर्धकाने पाठविलेल्या छायाचित्रांचा आधार घेतला जातो. या प्रक्रियेत ज्या ज्या सजावटींचे छायाचित्र वेगळेपण अधोरेखीत करणारे असेल, किमान त्या निवडक सजावटींचे प्रत्यक्ष अवलोकन परीक्षकांनी करणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा विवेक रोजेकर यांच्यासह बहुतांश पुरस्कार्थीनी व्यक्त केली. गणेशोत्सवातील सजावटीत द्रोण व पत्रावळ्यांपासून आकर्षक मंदिर तयार केले होते.
या मंदिरात साधू टाळ वाजविताना दर्शविण्यात आले होते. पर्यावरणपूरक साधनांच्या सहाय्याने बनविलेल्या या चलत बाबी छायाचित्रात लक्षात येऊ शकत नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या पंकज पाळेकर यांनीही आपल्या नारळाच्या मखराची माहिती दिली. सलग दोन वर्ष पारितोषिक पटकाविणाऱ्या नीलय निकम यांनी घरातील सर्व मंडळी गणेशोत्सव व लोकसत्ताच्या या स्पर्धेची आतुरतेने प्रतीक्षा करत असल्याचे नमूद केले.