वाघोली, पुणे येथील भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्टचे अध्यक्ष तसेच इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट व रिसर्च सेंटरचे संचालक डॉ. सदानंद सरदेशमुख यांनी लिहिलेल्या ‘कॅन्सरसाठी लोकोपयोगी आयुर्वेद’ या पुस्तकाचे प्रकाशन मुंबईत होत आहे. दादर येथील मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या सुरेंद्र गावस्कर सभागृहात सोमवार १० ऑगस्ट या दिवशी संध्याकाळी साडेसहा वाजता ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांच्या हस्ते हे प्रकाशन होईल.  ‘लोकसत्ता’च्या ‘हेल्थ इट’मध्ये डॉ. सरदेशमुख यांनी लिहिलेल्या ‘कॅन्सर आणि आयुर्वेद’ या लेखमालेचे संकलन या पुस्तकात करण्यात आले आहे. कॅन्सर हा केवळ आयुर्वेदिक चिकित्सेने पूर्णपणे बरा होत नसला तरी कॅन्सर रुग्णांचा त्रास आयुर्वेदिक चिकित्सेमुळे कमी होऊन त्यांना सुखकर आयुष्य जगता येते, रेडिओथेरपी आणि केमोथेरपीच्या दुष्परिणामांची तीव्रताही या चिकित्सेमुळे कमी होते. या निष्कर्षांसंबंधीच्या शास्त्रीय संशोधनाचा तपशील आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्येही प्रसिद्ध झाला आहे. आतापर्यंत सुमारे आठ हजार कॅन्सर रुग्णांवर ही चिकित्सा यशस्वीपणे करण्यात आली आहे. डॉ. सरदेशमुख यांच्या या संशोधनाची राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे.