वादग्रस्त एलईडी पथदीपांच्या विषयावर मांडण्यात आलेल्या लक्षवेधीवर प्रथम चर्चा व्हावी, या मागणीसाठी आग्रही विरोधक आणि त्यांच्या या मागणीस विरोध करणारे सत्ताधारी यांच्या गदारोळात महापौरांनी विषपत्रिकेवरील कोटय़वधींचे सर्व विषय मंजूर करण्याची संधी साधली. त्यामुळे अनेक वादग्रस्त विषय कोणतीही चर्चा न होता महापालिका सभेत मंजूर झाल्याने काही नगरसेवकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली.
अग्निशमन दलाच्या माध्यमातून साडेसात कोटी रूपयांची शिडी खरेदी प्रस्तावासह अनेक वादग्रस्त विषय पत्रिकेवर असल्याने गुरूवारी होणारी सभा चांगलीच गाजण्याची चिन्हे दिसत होती. परंतु सभेला सुरूवात होताच कोमल मेहरोलिया यांनी वादग्रस्त एलईडी पथदीपांच्या विषयावर लक्षवेधी मांडत त्वरीत चर्चा करण्याची मागणी केली. महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांनी आगामी कुंभमेळ्या संदर्भातील अनेक विषय पत्रिकेवर असल्याने त्यांच्यावर चर्चा होणे अधिक महत्वाचे असून त्यांचे वाचन झाल्यानंतर लक्षवेधीवर चर्चा करण्याची ग्वाही दिली. परंतु मेहरोलिया यांनी प्रथम लक्षवेधीवर चर्चा व्हावी, असा आग्रह धरला. त्यांच्या या मागणीस शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सदस्यांनी पाठिंबा दिला. विरोधी पक्षांच्या गटनेत्यांसह सदस्यांनी पीठासनावर चढाई करत घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली.
भ्रष्टाचार रोखण्यात यावा, एलईडीवर चर्चा झालीच पाहिजे, अशा घोषणा विरोधकांकडून देण्यात येत होत्या. तर, त्यांना सत्ताधारी मनसे सदस्यांकडून विकास कामे झालीच पाहिजेत, असे प्रत्यूत्तर देण्यात येत होते. दोन्ही बाजुंकडील या घोषणा
युध्दात सभेचे कामकाज चालविणे महापौरांना अशक्य झाले. त्यांनी सर्व सदस्यांना जागेवर बसण्याची विनंती केली.
त्यांच्या या विनंतीनंतर मनसेचे काही सदस्य जागेवर जाऊन बसले. परंतु विरोधकांचा गोंधळ सुरूच राहिल्याने पीठासन अधिकाऱ्यांनी गोंधळ घालणाऱ्यांचे निलंबन करण्याचा इशारा दिला. या गदारोळातच पत्रिकेवरील नियमित व अतिरिक्त असे सर्वच विषय मंजूर करण्यात आल्याचे सांगून सभा गुंडाळली. त्यामुळे साडेसात कोटी रूपयांची शिडी खरेदीचा प्रस्तावही अनासाये मंजूर झाला.
शहरात सर्वत्र एलईडी पथदीप बसविण्यासाठी एकमेव पात्र निविदाधारकास १३७ कोटी रूपयांचा खर्च येणार असून ठेकेदाराने मात्र २०५ कोटीची मागणी केली आहे. विशेष म्हणजे एलईडीचा वाद न्यायालयात गेला असतानाही पालिकेने निविदा मागविण्याची घाई केली.