मध्य रेल्वेवर वार्षिक ३० टक्के ऊर्जा बचत करणाऱ्या ठाणे ते मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस या स्थानकांदरम्यानच्या डीसी-एसी परिवर्तनाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ऑगस्टच्या पहिल्या पंधरवडय़ात हे काम पूर्ण होणे अपेक्षित असले, तरीही रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून सुरक्षा प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी येण्याची शक्यता रेल्वेतीलच काही अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. या कामासाठी काही ठिकाणी रूळ खाली घेण्यात आले आहेत. त्यामुळे इतर वाहतुकीवरही परिणाम होऊ शकतो, असे या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
मध्य रेल्वेवर ठाणे ते मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस या दरम्यान उपनगरी गाडय़ा डीसी विद्युतप्रवाहावर चालतात. ऊर्जा बचतीसाठी आणि त्याद्वारे रेल्वेचा खर्च कमी करण्यासाठी या मार्गावर डीसी-एसी विद्युतप्रवाह परिवर्तनाचे काम गेल्या वर्षी हाती घेण्यात आले. हे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. अल्टरनेट करंटवर चालणारी गाडी २५००० वोल्ट एवढय़ा विद्युतप्रवाहावर चालते. त्यामुळे बोगद्यांमध्ये आणि रेल्वेमार्गावरील नागरी पुलांखालून जाणारी ओव्हरहेड वायर आणि त्या पुलांचा खालचा भाग यांच्यात ठरावीक अंतर असावे लागते. हे अंतर टिकवण्यासाठी नागरी पूल वर उचलणे किंवा रूळ खाली घेणे हे दोनच पर्याय रेल्वेकडे होते.
मुंबईतील जुन्या पुलांची उंची वाढवणे व्यवहार्य नसल्याने रेल्वेने या पुलांदरम्यानचे रूळ खाली घेतले आहेत. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात या भागांत पाणी तुंबण्याची शक्यताही वर्तवण्यात येत होती. मात्र मध्य रेल्वेने राबवलेल्या यंत्रणेमुळे सुदैवाने कुर्ला वगळता इतर कुठेही ही समस्या उद्भवली नाही. मात्र नेमक्या याच कारणांमुळे हा प्रकल्प रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या कात्रीत अडकण्याची शक्यता आता रेल्वेतीलच काही अधिकारी वर्तवत आहेत.
मात्र याबाबत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांना विचारले असता त्यांनी ही अडचण उद्भवली, तरी त्यावर तातडीने तोडगा काढला जाईल, असे सांगितले. डीसी-एसी परिवर्तन झाल्यावर मध्य रेल्वेला महावितरणऐवजी टाटाकडून वीज घ्यावी लागणार आहे. टाटाच्या विजेचे दर कमी असल्याने प्रतियुनिट २.०५ रुपये वाचणार आहेत. याचीच किंमत दरवर्षी १२ कोटींवर जाते. त्याप्रमाणे ३० टक्के ऊर्जाबचतीमुळेही वर्षभरात ५१ कोटी रुपये वाचतील, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.