सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान कोणत्याही आपत्तीचा सक्षमपणे सामना करता यावा, यासाठी जिल्हा प्रशासनाने खास वेगवेगळी उपकरणे खरेदी करण्याची तयारी सुरू केली आहे. प्रत्येक शासकीय विभागास कोणकोणत्या उपकरणांची आवश्यकता आहे, याचा अभ्यास करून जवळपास १९.६० कोटी रुपयांच्या खरेदीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यात तसेच त्यानंतरही जिल्ह्यात आपत्ती निवारण कामात ही उपकरणे साहाय्यभूत ठरू शकतील. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने सर्वच शासकीय विभागांकडून आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार करवून घेतले आहेत. त्या अहवालातून मिळालेल्या माहितीद्वारे कोणकोणत्या उपकरणांची निकड भासणार आहे याचा विचार करण्यात आला.
शहर व ग्रामीण पोलीस, अग्निशमन विभाग तसेच इतर विभागांनी वेगवेगळी उपकरणे व सामग्रीची मागणी केली आहे. ही यादी बरीच मोठी असल्याने या क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा करून निश्चित करण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापनासाठी उपकरणे खरेदीचा तब्बल १९.६० कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करून तो जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी सुटीवरून परतल्यावर या संदर्भात चर्चा केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. सध्याचा प्रस्ताव अंतिम नसून उपकरणांची कितपत निकड आहे याची छाननी केली जाईल. शासकीय विभागांनी फ्लोरोसंट रंगातील जॅकेट्स, पाण्यातही कार्यान्वित राहतील असे कॅमेरे, सर्च लाइट आदी साहित्याची मागणी केली आहे. कुंभमेळ्यात काय स्थिती राहील याचा अंदाज बांधून त्यांची आवश्यकता लक्षात घेतली जाईल. कुंभमेळा व त्यानंतरच्या काळातही या उपकरणांचा आपत्ती व्यवस्थापनात उपयोग होईल, याकडे लक्ष दिले जाणार आहे.