प्रीमियम तिकीट दरांमुळे साडेतीन हजार रुपयांना एक तिकीट असलेली वातानुकूलित डबलडेकर गाडी कोणी तुम्हाला २० रुपयांत विकायला लागले तर? असे अचंबित होऊ नका, कारण पश्चिम रेल्वेने चर्चगेट स्थानकात सोव्हेनिअर शॉप उघडले असून त्यात पुठ्ठय़ापासून तयार केलेल्या या डबलडेकर गाडीचा एक डबा केवळ २० रुपयांत उपलब्ध आहे. सामान्य प्रवासी आणि रेल्वे यांच्यातील नाते आणखीनच दृढ व्हावे आणि प्रवाशांनाही रेल्वे आपली वाटावी, यासाठी पश्चिम रेल्वेने हा उपक्रम सुरू केला आहे. या सोव्हेनिअर शॉपमध्ये पुठ्ठय़ापासून बनवलेल्या विविध खेळांपासून इंजिनची कीचेन, रेल्वे इंजिनची मॉडेल्स, एटीव्हीएम मशिनच्या आकाराची पिगी बँक अशा अनेक गोष्टी आहेत. या दुकानाला प्रवाशांचा घसघशीत प्रतिसाद मिळाला असून एका आठवडय़ातच दहा हजार रुपयांच्या वर विक्री झाली आहे.
प्रवाशांना रेल्वेबद्दल आत्मियता वाटावी, तसेच दैनंदिन जीवनात अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या रेल्वेची एक आठवण त्यांच्या घरी कायमस्वरूपी राहावी, या हेतूने पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शरत् चंद्रायन यांनी ही सोव्हेनिअर दुकानाची कल्पना मांडली. ९ सप्टेंबरपासून हे दुकान चर्चगेट येथे सुरू झाले आहे. आतापर्यंत डबलडेकर गाडीचे २०५ डबे विकले गेले असून मेटल किचेन ७५च्याआसपास विकल्या गेल्या आहेत. इतरही वस्तू चांगल्या प्रमाणात विकल्या गेल्या आहेत. या विक्रीतून पश्चिम रेल्वेला आठवडाभरात दहा हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे मिळाले आहेत.

सोव्हेनिअर दुकानात काय आहे?
० पुठ्ठय़ापासून बनवता येणारी डबलडेकर गाडी
० रेल्वेच्या विविध गाडय़ांची मदत घेऊन तयार केलेला ल्युम्डो
० रेल्वेचे नियम पाळण्यास शिकवणारी सापशिडी
० फ्रिजवर लावायचे रेल्वे इंजिनाच्या आकाराचे मॅग्नेट
० रेल्वे इंजिनाच्या आकाराची कीचेन
० बॅगांना अडकवायचे लगेज टॅग
० रेल्वे इंजिनाची मॉडेल्सही उपलब्ध