रेल्वेचा कणा मानल्या जाणाऱ्या गँगमनचे अपघात आणि त्यांचे अपघाती मृत्यू, ही चिंतेची बाब बनली असताना त्यावर उपाय म्हणून मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने एक विद्युत उपकरण तयार केले आहे. प्रत्यक्ष रेल्वेमार्गावर काम करणाऱ्या गँगमनना गाडी एक किलोमीटरपेक्षाही पुढे असताना ती येत असल्याची सूचना देण्याचे काम हे उपकरण करणार आहे. त्यामुळे जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या गँगमनना दिलासा मिळणार आहे.
रेल्वेच्या मुंबई विभागाने तयार केलेल्या या ‘इलेक्ट्रॉनिक अर्ली वॉर्निग सिस्टिम’मध्ये काही सेन्सर्स आणि गँगमनना जागरूक करण्यासाठी काही हूटर्स यांचा समावेश आहे. गँगमन ज्या ठिकाणी रेल्वेमार्गावर काम करत आहेत, त्या ठिकाणापासून १२०० ते १५०० मीटर अंतरावर गाडी असताना त्या गाडीमुळे होणारी कंपने हे सेन्सर्स टिपतात. त्यानंतर या सेन्सर्सद्वारे हूटर्सना संदेश जातो आणि गजर वाजायला सुरुवात होते. त्यामुळे गाडी बऱ्यापैकी लांब असतानाच गँगमन सुरक्षित ठिकाणी जाऊ शकतात.
याआधी गँगमन काम करत असताना त्यांच्या गँगमधील दोघे दोन टोकांना हातात झेंडा घेऊन थांबत होते. गाडी आली की, हे गँगमन हातातील झेंडय़ाने गाडीला हळू जाण्याचा इशारा करत. तसेच शिटय़ा वाजवून काम करणाऱ्या गँगमनना सूचना देत.
मात्र हे संदेश देणारे दोघे लघुशंकेसाठी गेल्यास किंवा धुक्यामुळे दृष्यमानता कमी असल्यास ही पद्धत फोल ठरत होती. त्यामुळे अनेक गँगमनना जीव गमवावा लागला होता. तर काही जणांना कायमचे अपंगत्त्व आले होते. गेल्या चार वर्षांत या अपघातांमध्ये ३३ गँगमनचा जीव गेला आहे.
त्यावर उपाय म्हणून आता ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. महाव्यवस्थापक ब्रिगेडिअर सुनीलकुमार सूद हेदेखील गँगमनच्या सुरक्षेबाबत आग्रही आहेत. ही प्रणाली सर्व भारतीय रेल्वेसाठी पथदर्शक ठरेल. तसेच त्यामुळे प्रत्यक्ष रेल्वेमार्गावर काम करणाऱ्या गँगमनना सुरक्षित काम करणे शक्य होईल, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले. ही प्रणाली फार जड नसून तिचे वजन केवळ ५०० ग्रॅम एवढेच आहे. त्यामुळे गँगमन ती सहज कामाच्या ठिकाणी नेऊ शकतात, असेही पाटील म्हणाले.

गँगमनच्या अपघाती दुर्घटना
वर्ष अपघाती         घटना        मृत्यू
२०११-१२                १४७        ८
२०१२-१३                 १९१        ७
२०१३-१४                  २०९        १६
२०१४     जुलैपर्यंत    १०८        ०२