काही दिवसांपासून शहर परिसरातील गुन्ह्यांचा चढता आलेख पाहता सराईत गुन्हेगारांसह पांढरपेशा पोशाखातील गुन्हेगार सक्रिय झाल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सातपूर येथील विविध राष्ट्रीय बँकांमध्ये झालेल्या भरण्यात ३२ हजार रुपयांच्या नोटा बनावट असल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. याबाबत सातपूर पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सध्या पांढरपेशा पोशाखात वावरणाऱ्या मंडळीकडून बनावट नावाने खात्यावरील परस्पर कारभार, भ्रमणध्वनीच्या माध्यमातून समोरच्याला विविध आमिषे दाखवत त्याचा तपशील मिळवत फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. काही ठिकाणी एटीएम, डेबीट वा केडीट कार्डच्या माध्यमातून हे प्रकार घडत आहेत. आता मात्र या चोरटय़ांची मजल थेट प्रत्यक्ष आर्थिक व्यवहारात बनावट नोटा आणण्यापर्यंत गेली आहे. सातपूर परिसरातील युनियन बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया व बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत ऑगस्टमध्ये भरणा करताना बनावट नोटांचा वापर केला असल्याचे नुकतेच उघडकीस आले. त्यात युनियन बँकेत १०० रुपयांच्या सहा नोटा, ५०० रुपयांच्या तीन अशा दोन हजार १००, सेंट्रल बँकेत मध्ये १०० ची एक, ५००च्या २ आणि हजाराच्या ५ अशा एकुण ६,६०० आणि बँक ऑफ महाराष्ट्रात १००च्या १४, ५००च्या १३ आणि १००० च्या तीन बनावट नोटा असा एकूण ३२, १०० रुपयांच्या बनावट नोटा छाननीमध्ये सापडल्या आहेत. पोलीस विभागाकडून या सर्व प्रकाराची छाननी होत असून यातून खोटय़ा नोटा व्यवहारात आणणारे रॅकेट सक्रिय झाल्याची भीती व्यक्त होत आहे.