मुंबईहून इंदूरकडे हिरो होंडा पॅशन दुचाकी घेऊन निघालेल्या कंटेनरने गुरुवारी सकाळी महामार्गावर अचानक पेट घेतल्याने १३० मोटारसायकल जळून खाक झाल्या. शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा येथे ही घटना घडली. त्यात, एक कोटीहून अधिक रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.
इंदूरकडे निघालेला हा कंटेनर नरडाणा परिसरातून मार्गस्थ होत असताना ही घटना घडली. सकाळी आठच्या सुमारास महामार्गावरील बसस्थानकाजवळ कंटेनरने पेट घेतल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली. या घटनेची माहिती समजल्यानंतर पोलीस व अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. आगीची तीव्रता लक्षात घेऊन धुळे, दोंडाईचा व शिंदखेडा येथील अग्निशमन दलाच्या पाण्याच्या बंबांना बोलाविण्यात आले. बंब घटनास्थळी येईपर्यंत कंटेनर आगीच्या विळख्यात सापडला होता. आगीचे प्रचंड लोट आणि धुरामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. ग्रामस्थांनी घटनास्थळापासून लांब अंतरावर धाव घेतली तर वाहनधारकांनी वळणरस्त्याचा आधार घेतला.
अग्निशमन दलाचे कर्मचारी राजन महाले व समीर अन्सारी यांनी कौशल्यपूर्वक पथकाच्या मदतीने पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळविले. ग्रामस्थांनी आग विझविण्यासाठी पथकास शक्य ती मदत केली. आग पूर्णपणे विझविल्यानंतर कंटेनरमधील १३० मोटारसायकल्स जळून खाक झाल्याचे निदर्शनास आले.
चालकाची केबिन व ट्रॉली आगीत भस्मसात झाल्यामुळे त्यांचाही शोध घेण्यात आला. परंतु, ते बचावासाठी आधीच पळाल्याचे लक्षात आले. आगीत नेमके किती नुकसान झाले ते स्पष्ट झाले नसले तरी कंटेनर व मोटारसायकल्सचा विचार करता हा आकडा एक कोटीहून अधिक असल्याचे सांगण्यात येते. या प्रकरणी पोलिसांकडून पंचनामा करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.