गोरेगाव येथे बैलगाडा शर्यतींचा घाट बांधण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत पाच लाख रूपयांचा निधी देण्याची घोषणा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विठठलराव लंघे यांनी आज गोरेगाव येथे केली. येथे तब्बल तीन वर्षांनी बैलगाडा शर्यती रंगल्या.
गोरेगाव येथील श्री खंडेश्वराच्या यात्रोत्सवानिमीत्त आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतींना लंघे यांच्या हस्ते झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. अर्थ व बांधकाम समीतीचे सभापती कैलास वाकचौरे, महिला व बालकल्याण समीतीच्या सभापती हर्षदा काकडे, माजी
उपाध्यक्ष सुजित झावरे, सदस्य सुनिल गडाख व माधवराव लामखडे, जुन्नर बाजार समीतीचे सभापती व प्रसिद्घ गाडामालक धोंडीभाउ पिंगट यांच्यासह जिल्हयातील अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समीतीचे सभापती बाबासाहेब तांबे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
न्यायालयीन प्रक्रियेमुळे तब्बल तीन वर्षे मुकलेल्या शौकिनांनी आज मात्र हा आनंद लुटला.  जिल्हा तसेच बाहेरील हजारो शोकीनांनी गोरेगावात मोठी गर्दी केली होती. गोरेगावचा संपूर्ण माळ प्रेक्षकांच्या गर्दीमुळे फुलला होता. सकाळी दहा वाजता पालखी सोहळयास प्रारंभ झाला. गोरेगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थ, जिल्हाभरातील भाविक या सोहळयात सहभागी झाले होते.
गाडयांच्या शर्यतींनंतर भाविकांनी भरलेल्या बारा गाडय़ांना तेरावा गाडा जोडून रामदास नाबाजी नरसाळे यांनी कमरेला दोन बांधून ओढला. वंश परंपरागत नरसाळे कुटुंबियांकडे हा गाडा ओढण्याचा मान आहे. माजी सरपंच राजाराम नरसाळे, अभयसिंह नांगरे, दादाभाऊ नरसाळे आदींनी यात्रोत्सव यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.