एकेकाळी विदर्भातील नागरिकांना उच्च दर्जाच्या उपचारासाठी मुंबई, दिल्ली, हैदराबाद, मद्रास व बंगळुरू  या शहरात जावे लागत असे. परंतु आता नागपुरातच जागतिक दर्जाचे उपचार मिळत असल्याने बाहेर जाण्याची गरज भासत नाही. याउलट विदेशातील नागरिकच येथे येऊन उपचार करून घेत असल्याने नागपूरचे महत्त्व जागतिक स्तरावर वाढले आहे. एकटय़ा नागपुरात एका वर्षांला शंभराहून अधिक विदेशी नागरिक येऊन विविध शस्त्रक्रिया व उपचार करून घेत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
अमेरिकेमध्ये एखाद्या शस्त्रक्रियेसाठी २० ते २५ लाखाचा खर्च येत असेल तर नागपुरात ती शस्त्रक्रिया पाच लाखाच्या आत होत आहे. आफ्रिका खंडातील काही देश, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इराण, इराक, आदी देशातील नागरिक उपचारासाठी नागपूरला पहिली पसंती देत आहे. याशिवाय अनिवासी भारतीयांची संख्याही मोठी आहे. मूत्रपिंड प्रत्यारोपण, मेंदूच्या व हृदयरोगावरील अत्यंत क्लिष्ट शस्त्रक्रिया नागपुरात होत आहेत. शहरातील ऑरेंज सिटी, वोक्हार्ट, श्रीखंडे नर्सिग होम, डॉ. शिंगाडे हॉस्पिटल, शुअरटेक, शतायु, स्पंदन, आदी विदेशीयांचे आवडते रुग्णालये आहेत.
मागासलेला भाग म्हणून हिणवल्या जाणाऱ्या नागपुरात आंतरराष्ट्रीय दर्जाची सेवा देऊ शकतो, याची स्पर्धाही यानिमित्ताने सुरू झाली आहे. शहरातील रुग्णालयांमध्ये विदेशी रुग्णांना विदेशी दर्जाची उपचार पद्धती तर मिळतेच, शिवाय भारतीय समर्पित सेवेचा आगळा अनुभवही मिळतो. त्यामुळेच ते येथे येतात. वोक्हार्ट रुग्णालयात गेल्यावर्षी २० विदेशी नागरिकांनी उपचार करून घेतले. त्यामध्ये गुडघ्यावरील शस्त्रक्रिया, हृदयरोगाची शस्त्रक्रिया, मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, कर्करोगाच्या शस्त्रक्रियेचा समावेश आहे. गेल्यावर्षीपासून विदेशी नागरिक उपचारासाठी येण्याचे प्रमाण वाढले असल्याची माहिती वोक्हार्ट रुग्णालयाच्या व्यवस्थापिका के. सुजाता यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. हृदयाचे वाढलेले ठोके आणि केविलवाणा चेहरा घेऊन येथे येणारा रुग्ण तसेच प्रचंड मन:स्ताप भोगणारे त्यांचे नातेवाईक, परत जाताना त्यांच्या चेहऱ्यावरील फुललेले हास्य खूप काही सांगून जाते, असेही त्या म्हणाल्या.
ऑरेंज सिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. अनुप मरार म्हणाले, आमच्याकडे दरवर्षी २५ ते ३० विदेशी नागरिकांवर विविध शस्त्रक्रिया केल्या जातात. विदेशात शस्त्रक्रियेसाठी प्रतीक्षा यादी असते. जवळपास सहा महिने ते एक वर्षे वाट बघावी लागते. एवढा वेळ वाया घालवल्यापेक्षा विदेशी नागरिक येथे येऊन उपचार करून घेतात. विदेशात एका शस्त्रक्रियेला जो खर्च होतो, त्यापैकी एक चतुर्थाश खर्च नागपुरात होतो. त्यामुळे विदेशी नागरिकांच्या आर्थिक खर्चात बचत होते, तसेच वेळेवर शस्त्रक्रिया होत असल्याने व जागतिक दर्जाची सेवा मिळत असल्याने ते समाधानी असतात. सुरुवातीला ऑनलाईनद्वारे नोंदणी केली जाते तसेच कागदपत्रांची तपासणी केली जाते. यानंतर त्यांना बोलावण्यात येते. विदर्भात मोठय़ा प्रमाणात विदेशी नागरिक राहतात. त्यांची नियमित तपासणी आमच्याच रुग्णालयात होते. ही बाब ऑरेंजसिटीसोबतच विदर्भासाठी गौरवाची बाब असल्याचेही डॉ. मरार यांनी स्पष्ट केले.  
धंतोली येथील डॉ. श्रीखंडे नर्सिग होम येथे नुकतेच आफ्रिकेतील एक जोडपे उपचार करून गेले. या जोडप्याला मूल हवे असल्याने ते येथे आले होते. अजनी चौकातील डॉ. शिंगाडे हॉस्पिटलमध्ये नुकतीच दोन ऑस्ट्रेलियन नागरिकांवर अस्थिरोग शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे डॉ. विराज शिंगाडे यांनी सांगितले. विदेशी नागरिक पूर्वी मुंबई, दिल्ली, हैद्राबाद, मद्रास या शहरांना प्राध्यान्य देत होते. गेल्या दोन-तीन वर्षांपासून आता नागपूरला प्राधान्य देत आहेत. दरवर्षी शंभराहून अधिक विदेशी नागरिक नागपुरात येऊन उपचार करून घेत असल्याचा अंदाज या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला.