भांडे प्लॉट येथील तीन सख्ख्या भावांच्या खूनप्रकरणी सक्करदरा पोलिसांनी सातपैकी चार आरोपींना अटक केली असून त्यामध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. अन्य तीन आरोपी मात्र अजूनही पोलिसांच्या तावडीत सापडले नाहीत. दरम्यान, पोलीस बंदोबस्तात शुक्रवारी सायंकाळी तिन्ही उगले भावंडांच्या पार्थिवावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
गुरुवारी रात्री ९ वाजता संजय काशीनाथराव उगले (३०), केशव उगले (२७), एकनाथ उगले (३२) या तीन सख्या भावंडांचा भांडे प्लॉट झोपडपट्टीत राहणाऱ्या सात आरोपींनी शस्त्राने वार करून निर्घृण खून केला. आरोपींमध्ये रामेश्वर उर्फ रामा बाबुराव नागोसे, नेहाल धनराज नागोसे, शुभम सातपैसे, भूषण बहाड उर्फ बाल्या मांजरे, राजू बाबुराव नागोसे, मनोज उर्फ मन्या सोनटक्के या सात जणांचा समावेश आहे. घटनेनंतर सक्करदरा पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. शुक्रवारी पहाटे रामेश्वर उर्फ रामा बाबुराव नागोसे, राजू बाबुराव नागोसे, भूषण बहाट उर्फ बाल्या मांजरे आणि शूभम सातपैसे यांना अटक करण्यात आली. या चौघांनाही न्यायालयात हजर करून त्यांची पोलीस कोठडी प्राप्त करण्यात आली.  
आरोपी आणि मृतांमध्ये शत्रुत्व होते. गुरुवारी भंडारा मार्गावरील पारडी येथे मित्राकडे खासगी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात भांडण झाल्याने केशवने एकाच्या थोबाडीत मारली होती. यानंतर ‘देख लेंगे’ अशी भाषा दोन्ही गटांकडून वापरण्यात आली. तेथे हा वाद निवळला. रात्री सर्वजण आपल्या घरी परतले. आरोपींच्या घराशेजारी असलेल्या एका पानठेल्यावर उगले बंधू बसले होते. याचवेळी आरोपींनी तलवार, भाले आदी शस्त्र घेऊन तिघाही भावांवर हल्ला केला. त्यात तिघेही घटनास्थळीच ठार झाले. यानंतर आरोपी पसार झाले. माहिती कळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी आला. त्यांनी पंचनामा करून व खुनाचा गुन्हा नोंदवून मृतदेह शवविच्छेदन अहवालासाठी मेडिकलला पाठवले. यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. शुक्रवारी दुपारी पोलिसांच्या कडक बंदोबस्तात उगले भावंडांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.