इचलकरंजी शहरातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनल्याने सत्ताधारी काँग्रेसचे माजी नगरसेवक प्रा. शेखर शहा यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना कचरा आणि पुष्पगुच्छ देऊन गांधीगिरी पद्धतीने स्वच्छतेच्या प्रश्नाची जाणीव करून दिली.
शहरातील स्वच्छतेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. स्वच्छतेबाबत नागरिकांतून तक्रारीही वाढतच आहेत. ठिकठिकाणी कचऱ्याच्या कंटेनरमधून कचरा तुडुंब भरून वाहात असताना ते कचऱ्याचे ढीग उचलले जात नसल्याने सत्ताधारी राष्ट्रीय काँग्रेसचे माजी नगरसेवक प्रा. शेखर शहा, रमेश पाटील, अनिल शिकलगार यांनी आरोग्य अधिकारी डॉ. श्रीकांत सूर्यवंशी यांना गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करताना पुष्पगुच्छ आणि कचऱ्याची थैली देऊन शहरातील स्वच्छतेच्या प्रश्नाची जाणीव करून दिली. या कार्यकर्त्यांनी सत्ताधारी म्हणून प्रशासनाच्या विरोधात बोलता येत नसल्याची जाणीवही नगराध्यक्ष सुप्रिया गोंदकर आणि आरोग्य सभापती संजय केंगार यांना करून दिली. सत्तारूढ गटातीलच कार्यकर्त्यांने केलेल्या गांधीगिरी आंदोलनाची चर्चा सुरू होती.