जगभरातील विद्यापीठ भारतातील विद्यापीठांपेक्षा खूप पुढे आहेत. जगातील पहिल्या २०० विद्यापीठांमध्ये भारतातील एकही विद्यापीठ नसण्याचे कारण त्या विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन हे आहे. भारतातील विद्यापीठांचा दर्जा सुधारावयाचा असेल, तर प्रत्येक विद्यापीठात आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन झाले पाहिजे, असे मत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांनी व्यक्त केले.
येथील श्री शिवाजी महाविद्यालयात सुरू झालेल्या विद्यापीठाच्या उपकेंद्राचे उद्घाटन पालकमंत्री प्रकाश सोळंके यांच्या हस्ते झाले. कुलगुरू डॉ. निमसे, मकृविचे कुलगुरू डॉ. के. पी. गोरे, मधुकरराव मुळे, सुरेश वरपूडकर, डॉ. दिलीप उके, डॉ. अंबादास कदम, डॉ. वसंत भोसले, डॉ. व्ही. एम. मोरे, डॉ. आर. बी. झटे, जी. बी. कतलाकुट्टे, अ‍ॅड. अशोक सोनी, डॉ. सुरेश सदावर्ते, डॉ. केशव देशमुख, प्रा. गणेश शिंदे, अशोक कदम आदींची उपस्थिती होती.
डॉ. निमसे म्हणाले की, भारतातील विद्यापीठांची संख्यात्मक प्रगती होत असली, तरी गुणात्मक प्रगती होत नाही ही दुर्दैवाची बाब आहे. विद्यापीठातून दिले जाणारे शिक्षण विद्यार्थ्यांना स्वत:च्या पायावर उभे करणारे असावे, बेकारी वाढवणारे नसावे. श्री शिवाजी महाविद्यालय परिसरातील भाषा शास्त्र विभागाच्या इमारतीत विद्यापीठातर्फे स्पॅनिश व फ्रेंच या दोन भाषांचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात आले. त्याचे उद्घाटन डॉ. निमसे यांच्या हस्ते करण्यात आले. पालकमंत्री सोळंके यांचेही भाषण झाले.