कोणताही सण किंवा उत्सव म्हटला की ग्राहक आणि व्यापारी यांच्यासाठी ती खास पर्वणी असते. उत्सवाच्या निमित्ताने बाजारपेठेत मोठी आर्थिक उलाढाल आणि खरेदी केली जाते. या दिवसात बाजारपेठाही गर्दीने ओसंडून वाहात असतात. हिंदूू संस्कृतीत गणपती, दसरा, नवरात्र, दिवाळी या सणांना जे महत्व आहे तेवढेच महत्व मुस्लिमांमध्ये ईदच्या सणाला आहे. मात्र ईदनिमित्त बाजारपेठेत दरवर्षीप्रमाणे खरेदीचा फारसा उत्साह जाणवत नसल्याचे तसेच गेल्या वर्षीच्या तुलनेत खरेदी करण्याच्या प्रमाणात घट झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
रमजानच्या दिवसांत भायखळा, कुर्ला, भेंडीबाजार आणि अन्य मुस्लिमबहुल परिसरात छोटे-मोठे दुकानदार, व्यावसायिक यांच्याकडे ग्राहकांची मोठय़ा प्रमाणात वर्दळ असते. सुकामेवा, फळांचे विक्रेते याचीही मोठी खरेदी होत असते. उपाहारगृहे आणि रस्ते व पदपथावर थाटलेल्या खाद्यपदार्थानाही मोठी मागणी या दिवसात असते. ग्राहकोपयोगी वस्तू, दागिने आणि नव्या कपडय़ांचीही खरेदी केली जाते. महिला, मुले, युवक यांच्याकडून ही खरेदी जोमाने होते.
गेल्या काही दिवसांत सर्वच क्षेत्रात झालेल्या महागाईचा फटका रमजान आणि ईदच्या सणाला बसला असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. या दिवसात कुटुंबासह खरेदी करण्यासाठी येणाऱ्या लोकांचे प्रमाण जास्त असते. मात्र दरवर्षीपेक्षा वेगळा अनुभव यंदा येत आहे. खरेदीवर आकर्षक सवलत देऊनही गेल्या वर्षीच्या तुलनेत कपडय़ांच्या खरेदीत घट झाली आहे. कपडे, दागिने अशा खरेदीपेक्षा जीवनावश्यक आणि गरजेच्या गोष्टी खरेदी करण्यावर लोकांचा यावेळी भर असल्याचे तयार कपडय़ांचे व्यापारी मोझी लोखंडवाला यांनी सांगितले. तर ‘इमिटेशन ज्वेलरी’चा व्यवसाय करणारे व्यापारी अदिल म्हणाले की, दागिन्यांची खरेदी करताना या वेळी महिलांचा हात आखडता आहे.
खरेदीदारांच्या अभावामुळे बाजारपेठेतही फारसा उत्साह नाही. ईदपाठोपाठ येणाऱ्या गणपती उत्सवातही हेच चित्र राहिले तर आर्थिक हानी होईल, या धास्तीने मोठय़ा व्यापाऱ्यांसह छोटे दुकानदार आणि  व्यावसायिकही चिंतित आहेत.