महाराष्ट्रातील जल व ऊर्जा स्रोतापकी सर्वात बलाढय़ अशा कोयना धरण परिसरावर भविष्यात अतिरेकी हल्ला झाल्यास त्याला प्रतिबंध उपाय कशा प्रकारे करता येईल. संपूर्ण जिल्ह्यातून घटनास्थळी कशाप्रकारे मदत व किती वेळात मदत मिळू शकेल याचे प्रात्यक्षिक सातारा जिल्हा अधीक्षक प्रसन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलीस अधीक्षक तांबे यांनी प्रत्यक्ष कोयना धरण परिसरात थांबून घेतले.
मॉक ड्रील सकाळी १० वाजून १० मिनिट ते १० वाजून ४५ मिनिटांदरम्यान घेण्यात आले. कोयनानगर येथे अतिरेकी हल्ला झाल्याचे संपूर्ण जिल्ह्यातील मुख्य ठिकाणी कळविण्यात आले. त्यानंतर तत्काळ मदतकार्यास सुरुवात झाली. काही पथके ३० मिनिटांनी पोचली तर काही चाळीस मिनिटांनी पोहोचली.
मॉक ड्रीलमध्ये संपूर्ण जिल्ह्यातून सातारा मुख्यालय, कराड शहर व तालुका, पाटण शहर, ढेबेवाडी, तळबीड, उंब्रज, कोयनानगर या पोलीस ठाण्यांतून एक सहायक पोलीस निरीक्षक, जमादार व २३७ पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. भविष्यात कोयना धरणावर अतिरेकी हल्ला झाल्यास कोणता अधिकारी कशा तयारीनिशी कोणत्या शस्त्रास्त्रांनिशी किती कर्मचाऱ्यांसमवेत व किती वेळात घटनास्थळी पोचू शकेल याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. या मॉक ड्रीलमध्ये अतिरेकी हल्ल्याविरोधी पथक, बॉम्ब हल्ला विरोधी पथक, अंगुली मुद्रा पथक, श्वानपथक, बॉम्बशोधक पथक आदी पथकांचा समावेश होता. भविष्यात अतिरेकी हल्ला झाला तर मदत कार्यात कोणत्या त्रुटी येऊ शकतात व या येणाऱ्या त्रुटींवर काय उपाययोजना करता येतील यासाठी हे मॉक ड्रील घेण्यात आले.