बनावट सुरक्षा एजन्सींवर पोलिसांचा दट्टय़ा
अन्न, वस्त्र आणि निवारा या मुलभूत गरजांबरोबर सुरक्षा ही मुलभूत गरज निर्माण झाली आहे. परंतु मुंबईकर ज्यांच्या जीवावर सुरक्षा सोपवून निर्धास्त झोपतात, त्या सुरक्षा एजन्सी तकलादू असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबई पोलिसांनी बोगस सुरक्षा रक्षकांविरोधात मोहीम उघडली असून त्यापैकी अनेक सुरक्षा एजन्सी बनावट असल्याचे आढळून आले आहे. पोलिसांच्या कारवाईमुळे अनेकांनी मुंबईबाहेर पलायन केले आहे.
सर्वसाधारणपणे निवासी संकुल आणि सोसायटय़ा भरपूर पैसे मोजून सुरक्षा एजन्सी नेमतात. मुंबई पोलिसांच्या ताज्या आकडेवारीनुसार, मुंबईत सुमारे ३५० सुरक्षा एजन्सी कार्यरत आहेत. बोगस सुरक्षा रक्षकांची तपासणी सुरू केल्यानंतर तब्बल ४० पेक्षा जास्त सुरक्षा एजन्सी बोगस असल्याचे आढळून आले आहे. या बाबत पोलीस उपायुक्त (मुख्यालय – १) शारदा राऊत यांनी सांगितले की, मुंबईत केवळ ३५६ सुरक्षा एजन्सींना मान्यता आहे. परंतु अनेक सुरक्षा एजन्सी मुंबईत बनावट परवाने घेऊन आणि बेकायदेशीरपणे कार्यरत होत्या. पोलिसांच्या कारवाईत ४० पेक्षा अधिक सुरक्षा एजन्सी बोगस असल्याचे आढळून आले आहे. त्यांच्याकडे कसलेही परवाने नव्हते आणि भरती केलेल्या सुरक्षा रक्षकांची माहितीही नव्हती. धक्कादायक बाब म्हणजे, मुंबईत केवळ १८ ते २० जणांनाच बंदुकीचा परवाना मिळालेला आहे. पंरतु इतर राज्यातील आणि जम्मू-काश्मीरमधील बंदुकीचा परवाना घेऊन मुंबईत ही मंडळी सुरक्षा रक्षकाचे काम करीत आहेत.
मध्यंतरी मुंबई पोलिसांच्या मालमत्ता विभागाने बनावट सुरक्षा रक्षकांच्या टोळीला अटक केली होती. जम्मू-काश्मीरचा शस्त्र परवाना घेऊन मुंबईत सुरक्षा रक्षकांचे काम केले जात होते. या विरोधात पोलिसांनी मोहीम सुरू केल्यानंतर आतापर्यत तीन हजारांहून अधिक बनावट सुरक्षा रक्षकांनी मुंबईतून पळ काढल्याची माहिती पोलिसांनी दिली. देवनार येथे कचऱ्याच्या डब्यात आढळलेल्या दोन रायफलीही याच कथित सुरक्षा रक्षकांच्या होत्या त्यांनी कारवाई सुरू झाल्यानंतर त्या कचऱ्याच्या डब्यात टाकून पळ ठोकला होता. सुरक्षा रक्षक एजन्सीबाबत कठोर कारवाई करण्यास सुरुवात केल्यामुळे ज्यांच्याकडे शस्त्र परवाना नाही वा बनावट परवाने आहेत अशांनी मुंबईबाहेर पलायन केल्याच्या वृत्तास अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) निकेत कौशिक यांनीही दुजोरा दिला.

जम्मू-काश्मीरमधील माजी मंत्र्याचा दबाव!
मुंबईतील बहुतांश सुरक्षा एजन्सी  अन्य राज्यांतील आणि त्यातही जम्मू-काश्मीरमधील असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांच्या कारवाईमुळे यापैकी अनेकांनी गाशा गुंडाळत जम्मू-काश्मीरला पलायन केले आहे. त्यांच्यावरील ही कारवाई थांबविण्यासाठी जम्मू-काश्मीरच्या एका माजी कॅबिनेट मंत्र्याने मुंबईच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. काश्मीरमध्ये सहा महिने बर्फ असतो. अशावेळी या लोकांनी रोजगारासाठी कोठे जायचे, असा युक्तिवाद या मंत्र्याने यावेळी केला होता.

विश्वासार्हतेबाबत प्रश्नचिन्ह!
वडाळ्याच्या भक्ती पार्कमधील पल्लवी पुरकायस्थ हिची हत्या करणारा सुरक्षा रक्षक सज्जाद खान जम्मू-काश्मीरचा होता. लैला खान प्रकरणातील फरारी सुरक्षा रक्षक देखील जम्मू-काश्मीरचाच आहे. सुरक्षा रक्षकासाठी केवळ आठवी पास, अशी अट आहे. सध्या मुंबईत काम करणारे ७० टक्के सुरक्षा रक्षक अन्य राज्यांतील असल्याचे पोलिसांनी सांगितले. या सुरक्षा रक्षकांची पाश्र्वभूमी तपासली जात नसून त्यांना बिनधास्तपणे कामावर ठेवले जाते. रात्रीच्या वेळी हे सुरक्षा रक्षक झोपलेले असतात. त्यामुळे चोरीच्या अनेक घटना घडल्या होत्या. त्यामुळे पोलिसांनी झोपाळू सुरक्षा रक्षकांविरोधात मोहीमही उघडली होती.

मुंबईत खासगी शस्त्र परवाना मिळणे कठीण
मुंबई शहरात स्वसंरक्षणासाठी पूर्वी दर महिन्याला ६० ते ७० अर्ज यायचे. पंरतु पोलिसांनी शस्त्र परवाना देण्याबाबत कडक नियमावली लागू केल्याने हे प्रमाण आता अवघ्या २० ते २५ इतके झाले आहे. त्यातही पडताळणी केल्यानंतर अवघ्या दोन ते तीन जणांनाच शस्त्र परवाना दिला जातो. मुंबईत १६ हजार व्यक्तींकडे शस्त्र परवाना असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांना नुकताच शस्त्र परवाना मंजूर करण्यात आला. ठाकरे घराण्याची पाश्र्वभूमी लक्षात घेऊन त्यांना शस्त्र परवाना मंजूर करण्यात आल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.