शिक्षणाने माणसाची विचारसरणी बदलते, त्यामुळे त्याच्या कुटुंबाचा विकास होतो, पर्यायाने देशाचा विकास होतो. या सर्वश्रुत सूत्राचा वापर करून लोकसंख्या वाढीची समस्या आणि ती सोडविण्यासाठीचे उपाय याची प्रभावीपणे मांडणी करणाऱ्या चिंचपोकळी येथील श्री. व्ही. एल. नपू माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक जयसिंग लोहार यांच्या ‘जागृती’ या प्रकल्पाला राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात लोकसंख्या शिक्षण विभागात प्रथम पारितोषिक मिळाले.

आजचा विद्यार्थी हा उद्याचा पालक समजून त्यांना जर लोकसंख्या वाढीमुळे नेमके काय होते याची जाणीव करून दिली तर भविष्यात अनेक समस्या आपोआपच सुटतील, असा विश्वास लोहार सरांना वाटतो. त्यानुसार त्यांनी जागृती नावाचा प्रकल्प साकारला. या प्रकल्पामध्ये एक मोठे कुलूप दाखविण्यात आले आहे. यामध्ये लोकसंख्या वाढीची कारणे कोणती, त्यामुळे उद्भवणाऱ्या समस्या कोणत्या याची माहिती देण्यात आली आहे. हा विषय आणखी सोप्या पद्धतीने समजावा म्हणून त्यांनी कॅरम या खेळाची निवड केली. कॅरम बोर्ड हा एक वर्ग म्हणून तेथे मांडला. त्यातील कॅरमच्या सोंगटय़ांवर विविध समस्या मांडल्या. या सर्व समस्यांवर उपाय कोणता तर तो शिक्षणाचा. म्हणून त्यांनी स्ट्रायकरवर शिक्षण असे लिहले. हा वर्ग कुणाच्या मदतीने चांगला चालू शकेल हे सांगण्यासाठी त्यांनी पावडरच्या डब्याला सरकार असे संबोधिले. एका कॅरमच्या खेळाच्या माध्यमातून त्यांनी लोकसंख्या वाढीवर नियंत्रण आणण्यासाठी शिक्षण किती महत्त्वाचे आहे हे अगदी सहजतेने सांगितले. याशिवाय त्यांनी सुशिक्षित कुटुंब आणि अशिक्षित कुटुंब यांच्या समाजजीवनातील फरकही या प्रकल्पामध्ये अगदी सहजतेने मांडत शिक्षणाचे महत्त्व पुन्हा एकदा पटवून दिले. आपल्या प्रकल्पात त्यांनी कॅमेरा रोलचा वापर करून त्यावर कोंबडीला दाणे घालणाऱ्या मुलीची कथा चित्ररूपात मांडून भविष्यात अन्नसमस्या कशी उभी ठाकणार आहे हे दाखवून दिले, तर चित्रकलेच्या वहीत चित्रांद्वारे राजू नावाच्या मुलाची गोष्ट सांगत शिक्षण घेतले नाही तर काय परिणाम होतात हे सांगितले. याचबरोबर कथेतून कमवा आणि शिकाचाही संदेश दिला आहे. अखेर त्यांनी तयार केलेल्या भित्तिचित्रावर अन्न, वस्त्र, निवारा याबरोबर शिक्षण ही आपली मूलभूत गरज असल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या या प्रकल्पला विभागीय, जिल्हास्तरीय आणि नंतर राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक मिळाले. आपल्या या प्रकल्पाला मुख्याध्यापक निखिल पंडय़ा यांचे सहकार्य लाभल्याचेही लोहार यांनी स्पष्ट केले.